Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 30 August 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यातल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीनं आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
· केंद्र सरकारने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आरोप
· शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांचं स्पष्टीकरण
· देशातल्या प्रमुख शहरात दिवाळीपर्यंत फाईव्ह जी इंटरनेट सेवा सुरु होणार- रिलायन्स
इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा
· राज्यात यंदा ऊस गाळप हंगाम एक ऑक्टोबरलाच सुरु करणार - सहकार मंत्री अतुल सावे
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित २१ महाविद्यालयातल्या
अतिरिक्त तुकड्या, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय
· मुंबईत मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान
मृत्यू
आणि
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे ८१० रुग्ण, मराठवाड्यात १९ बाधित
सविस्तर बातम्या
राज्यातल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीनं आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी
युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावं, तसंच प्रलंबित बाबी आणि आवश्यक परवानग्या
तातडीनं मिळवून घेण्याचे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातल्या वॉर रूम मधून, राज्यातल्या
महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय
३० सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पंढरपूर, तुळजापूर
मंदिरांचा विकास आराखडा दोन महिन्यात सादर करावा, जेणेकरुन या ठिकाणी भाविकांना मोठ्या
प्रमाणावर सुविधा देता येणं शक्य होईल, जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विभागाच्या समन्वयानं
या संदर्भातली कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा
प्रशासनामार्फत करावी, तसंच आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देश, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना
पत्र लिहिलं होतं. औरंगाबाद इथं अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, एका तरूणाचा मृत्यू
झाला. ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तिथल्या जिल्हा प्रशासनामार्फत, जिल्हा
परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य
सुविधा द्याव्यात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते काल ठाण्यात पत्रकार
परिषदेत बोलत होते. अच्छे दिन, न्यू इंडिया - २०२२, ५ बिलियन इकॉनॉमी, ग्रामपंचायतींना
इंटरनेट जोडणी, सर्वांना घर, प्रत्येक नागरिकाला शौचालय, प्रत्येक घरात वीज, अशी अनेक
आश्वासनं केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळात दिली, मात्र यापैकी एकही आश्वासन पूर्ण
झालेलं नाही, असं पवार यांनी नमूद केलं. आपली सत्ता नसलेल्या राज्यात ईडी तसंच सीबीआयचा
वापर करून, सत्तांतर करण्याचा उपक्रम भाजपने अनेक राज्यात राबवल्याचा आरोपही त्यांनी
केला. ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करून सत्ता काबीज करणं, हे गंभीर चित्र आज देशासमोर
दिसत आहे, हे चिंताजनक असल्याचं मत, शरद पवार यांनी व्यक्त केलं.
****
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार,
असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत
होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली
असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, बजरंग दलाचे उद्धव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल शिवसेनेत प्रवेश
केला. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर
यांनी देखील आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
फाईव्ह जी इंटरनेट सेवा दिवाळीपर्यंत देशातल्या प्रमुख शहरात सुरु केली जाईल,
अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी काल केली. रिलायन्सच्या
४५व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ते काल बोलत होते. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत संपूर्ण
देशभरात फाईव्ह जी सेवा सुरु केली जाईल, प्रत्येक गाव, तहसिलपर्यंत या सेवेचा विस्तार
केला जाईल, असं अंबानी यांनी सांगितलं.
****
मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क हे राज्याची प्रगती आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका
पार पाडणार असून, या पार्कच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती
होणार असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं
आहे. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत
काल दूरदृश्य प्रणालीद्वारे याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात जालना,
जळगाव, सोलापूर, नाशिक सह आठ ठिकाणी हे मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार
असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या पार्क साठी आवश्यक असणारी जागा राज्य शासन उपलब्ध
करून देणार आहे.
****
राज्यात गेल्या हंगामात ऊस गाळप उशिरापर्यंत चालल्याचं लक्षात घेऊन यंदा ऊस
गाळप हंगाम एक ऑक्टोबरलाच सुरु करणार असल्याचं, सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
काल पुण्यात साखर आयुक्तालयाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ‘महा-ऊस नोंदणी’ ॲपचं यावेळी लोकार्पण करण्यात
आलं. कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर
आयुक्तालयानं विकसित केलेलं हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास, सावे यांनी यावेळी व्यक्त
केला. हे ॲप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी या ॲपमध्ये
ऊस लागवडीची, जिल्हा, तालुका, गाव तसंच गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह
ऊस क्षेत्राची माहिती भरावी. ऊस नोंदणीसाठी कारखान्यांचे तीन पर्याय शेतकऱ्यांना भरता
येतील. या ॲपच्या माध्यमातून राज्यातल्या १०० सहकारी तसंच १०० खासगी अशा एकूण २०० कारखान्यांकडे
ऊस नोंदणीची माहिती साखर आयुक्तालयाला पाठवता येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित २१ महाविद्यालयातल्या
अतिरिक्त तुकड्या, पदव्यूत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत
घेण्यात आला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ही माहिती दिली. पाच वर्ष पूर्ण न झालेल्या
५५ पैकी २१ महाविद्यालयांची तपासणी केली असता, भौतिक सुविधा, प्राचार्य, अध्यापक नसल्याचं
आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. २०२२-२३ मध्ये ४४ अभ्यासक्रमात श्रेणी श्रेयांक
पद्धत लागू करण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान
आणि व्यवस्थापन शाखेतल्या विषयातही ही पद्धत लागू होणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.
****
मुंबईत मंत्रालयासमोर पेटवून घेतलेले सुभाष देशमुख यांचा काल मुंबईत उपचारादरम्यान
मृत्यू झाला. उस्मानाबाद इथले रहिवासी असलेले सुभाष देशमुख यांनी २३ तारखेला मंत्रालयासमोर
पेटवून घेतलं होतं. सुमारे ४५ टक्के भाजलेल्या अवस्थेत त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं.
****
रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक असल्याचं मत, राज्याचे उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात काल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, कौशल्य विकासावर
आधारित विविध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पाटील यांच्या हस्ते पदवी
प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून
प्रमाणपत्र न घेता, विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा,
असं आवाहन त्यांनी केलं. महात्मा बसवेश्वर यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करून,
त्यासाठी चार कोटी रूपयाचा निधी देण्यात येईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राच्या परिसरात
कुलगुरु निवासस्थान तसंच मुलांच्या नियोजित वस्तीगृहाचं भूमिपूजन आज करण्यात येणार
आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मनोहर ज्ञानदेवराव देशमुख यांना जीवन साधना पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात येणार
असल्याचं, त्यांनी सांगितल. विद्यापीठात निधीतून गेल्या पाच वर्षांत उपकेंद्र परिसरात
३९ कोटी रुपयांची विकास कामं केल्याची माहितीही निंबाळकर यांनी दिली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८१० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९७ हजार २९४ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात
पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख ४८ हजार २२९ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल
१ हजार १२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३७ हजार ५८८ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या ११ हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या
सात, उस्मानाबाद सहा, नांदेड तीन, औरंगाबाद दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
****
औरंगाबाद शहरात सीएनजी गॅस पंप तत्काळ सुरु करण्याची मागणी, रिक्षा चालक, टॅक्सी
कारचालक आणि खाजगी सीएनजी वाहन धारकांनी केली आहे. यासर्वांच्या एका शिष्टमंडळांनं
काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन सादर केलं. शहरात सीएनजी गॅस वाहनांची
संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना शहराच्या बाहेर
२० ते २५ किलोमीटर अंतरावर जावं लागतं, तसंच सीएनजी भरण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत
रहावं लागतं, त्यामुळे शहरामध्ये तत्काळ सीएनजी पंप सुरु करावेत आणि त्यांच्या संख्येतही
वाढ करण्याची मागणी या शिष्टमंडळानं केली आहे.
****
दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनता दलाच्या वतीनं
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रवेशद्वार बंद करून आंदोलन करण्यात आलं. दिव्यांगांच्या
विविध मागण्यांसाठी या संघटनेनं यापूर्वीही निवेदनं दिली होती, मात्र कोणीच दखल घेत
नसल्यानं काल हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रवेशद्वार
उघडण्यात आलं. घरकुल योजनेत प्रपत्र ड मध्ये दिव्यांगांना प्राधान्यानं लाभ द्यावा,
शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग करावा, ग्रामपंचायतीतल्या पाच टक्के निधीचं
वेळेत वाटप करावं, पंचायत समितीत अपंग तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, आदी मागण्या
संघटनेनं केल्या आहेत.
****
लातूरचे पत्रकार पत्रकार अरुण समुद्रे यांनी विविध नियतकालिकांमधून लिहिलेले
लेख आणि बातम्यांचा संग्रह असणाऱ्या 'लक्षवेधी' या ग्रंथाचं काल लातूर इथं प्रकाशन
झालं. प्रसिद्ध कवी दासू वैद्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अनेक मान्यवरांनी
या कार्यक्रमाला हजेरी लावून समुद्रे यांना शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड इथं ४९ व्या विज्ञान प्रदर्शनाचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती
असते, शिक्षकांनी त्याचा उपयोग करून घेणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं. विज्ञान विषयात विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा,
विज्ञान प्रदर्शनातून देशाला अनेक शास्त्रज्ञ मिळू शकतात, असा विश्वासही वर्षा ठाकूर
यांनी व्यक्त केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातला भूमापक संजीत कवटकर
याला दोन हजार रुपये लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली. जमिनीची हद्द
कायम मोजणी करून मोजणी नकाशा देण्यासाठी, त्यानं ही लाच मागितली होती.
****
गणेश उत्सव उत्साहात साजरा करताना घरापासून ते गणेश उत्सव मंडळापर्यंत पर्यावरणपुरक
हिताला अधिक प्राधान्य देण्याचं आवाहन, नांदेडचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी
केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन इथं आयोजित
शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
No comments:
Post a Comment