Tuesday, 30 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 August 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबईत आरे कॉलनीतल्या सारीपुत नगर ते कुलाबा-वांद्रे सीप्झ मेट्रो लाईन तीनच्या चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला.

या मेट्रो मार्गामुळे प्रदुषण कमी होईल, साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, १७ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. यासारखी अनेक प्रकल्प राज्य सरकारने सुरु केली असून, ती लवकरच पूर्णत्वाला जातील, असं त्यांनी सांगितलं.

पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध करण्यात आला, त्यामुळे मेट्रोचं काम पूर्ण होण्यास उशीर होईल, मात्र नव्या सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

****

पुण्यातल्या दिमाखदार गणेशोत्सवातल्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीत सर्वप्रथम मानाच्या पहिल्या पाच गणपती मंडळांनाच जाण्याची संधी दिली जाते, याच विरोधात छोट्या गणेश मंडळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

****

राज्यातल्या ग्रंथालयांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्याची मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं. पुढच्या अर्थसंकल्पात ग्रंथालयाच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी १७ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २६ लाख ३६ हजार २२४ लसीच्या मात्रा देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत १०२ कोटी २८ लाखांहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा, ९४ कोटी २१ लाखांहून अधिक नागरीकांनी दुसरी, तर १५ कोटी ६३ लाखांहून अधिक नागरीकांनी वर्धक मात्रा घेतली असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, देशात काल नव्या पाच हजार ४३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २२ हजार ३१ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या ६५ हजार ७३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशातल्या काही महत्त्वाच्या शहरात येत्या दिवाळीपर्यंत फाईव्ह जी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स जीओनं, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इंटेल सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा या कंपनीबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानासाठी, तर गुगलबरोबर फाईव्ह जी साठी स्मार्टफोन विकसित करण्याच्या दृष्टीनं, रिलायन्स जीओनं भागीदारी केली आहे.     

****

औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. रामकिशन दहिफळे यांना, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ सप्टेंबरला पुणे इथं प्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे हे असतील, असं परिषदेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

मुंबई- गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर इथं शिवशाही बस आणि चारचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी नवी मुंबई इथल्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

तुळजापूर इथं होणारा श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वी करण्याच्या उद्देशानं विविध शासकीय विभागाकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामं वेळेत पूर्ण करून हा महोत्सव यशस्वी करावा असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शारदीय नवरात्र महोत्सवाचा पूर्व तयारीच्या बैठकीत ते बोलत होते.

****

आशिया चषक टी -ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना जिंकून भारत अ गटात पहिल्या स्थानावर आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात या सर्व विभागांमधे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

****

No comments: