Thursday, 25 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  25 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याचा ठराव विधीमंडळात मंजूर, प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे.

·      मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची पतंप्रधानांना विनंती.

·      विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनास मनाई करण्याची शेतकरी कामगार पक्षाची विधान परिषदेत मागणी.

आणि

·      अल्पसंख्याक विभागाची रिक्त पदं लवकरच भरली जाणार - मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती.

****

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव आज विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आला. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आलं. हा प्रस्ताव आता केंद्र सरकराच्या गृह विभागाकडे पाठवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. ते म्हणाले –

 

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर विभाग जिल्हा तालुका तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतर करण्यास १६/७/२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्याअर्थी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव जिल्हा असे नामांतर करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्यविधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करते.

 

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा ठरावही आज विधीमंडळात मंजूर करण्यात आला.

****

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजूरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. यासाठी राज्यशासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. त्यानुसार अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीनं काढला असून त्याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या मुद्यावर आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर आंदोलन करायला आणि प्रसारमाध्यमांना तिथं चित्रीकरण करायला बंदी घालावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी यावेळी केली. आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडावेत, पायऱ्यांवर बसून मांडू नयेत असं पाटील म्हणाले. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी या मागणीला विरोध दर्शवला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर आचारसंहिते संदर्भात ज्येष्ठ सदस्यांची बैठक बोलावण्याची तयारी दर्शवली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही विधिमंडळातील आमदारांचं वर्तन कशाप्रकारे असलं पाहिजे यासंदर्भात आचारसंहिता करण्याची गरज व्यक्त केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता.

****

अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदं लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. अल्पसंख्याक विभागातल्या रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत तसंच निधीसाठी विविध विभागाशी समन्वय ठेवण्यात येईल अशी माहितीही भुमरे यांनी यावेळी दिली. सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

****

राज्यातल्या रात्र शाळांसाठी सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात आणलं जाईल, असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. शिक्षक सदस्य नागोराव गाणार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. रात्र शाळेच्या नव्या निर्णयानुसार, या शाळांमध्ये अडीच तास शिक्षण देण्याचा तसंच अर्धवेळ शिक्षकांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं, त्यांनी सांगितलं. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी नव्यानं अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून ते टप्प्याटप्यानं सोडवणार असल्याची ग्वाही केसरकर यांनी यावेळी दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं दिवंगत माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं टेक्सटाईल पार्कच स्वप्न प्रत्यक्षात साकारुन सरकारनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्रातर्फे फुंडकर यांच्या जीवनकार्य आणि त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित ‘भूमिपूत्र’ या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी दानवे बोलत होते. सरकार याबाबत नक्की विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. त्यात १४ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. आज देशभरात सकाळपासून सुमारे २० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. राज्यात आज सकाळपासून ५१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८० लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे.

****

सोलापूर इथल्या सोनके गावाजवळ आज राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक दरम्यानच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस पंढरपूरहून आटपाडीकडे जात होती. समोरुन येणाऱ्या ट्रकनं या बसला धडक दिली. पंढरपूर ग्रामीण पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

****

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जालना शहरात नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला मूर्तीवेस रस्ता तातडीनं सुरू करण्यात यावा, तसंच कन्हैय्यानगर रस्त्याचं रखडलेलं काँक्रिटीकरण पूर्ण करावं या प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं.

****

सर्व दिव्यांगाच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग करावा या प्रमुख मागणीसाठी आज प्रहार दिव्यांग संघटनेनं औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे आणि इतरांनी यावेळी उपोषणादरम्यान स्वाक्षरी मोहिमही राबवली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील रहाटगाव इथं पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या वतीनं आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या गारखेडा प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीचे श्रीगणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आज घेण्यात आली. तिसरी ते आठवी पर्यंतच्या १०० विद्यार्थ्यांना श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. तसंच या मूर्ती कशा पर्यावरण पूरक आणि पर्यावरण संवर्धक आहेत याचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं.

****

औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतंर्गत माजी सैनिकांची पदभरती होणार आहे. यामध्ये जड वाहन वाहतूक परवाना असलेल्या वीस अनुभवी माजी सैनिकांना, कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टर या पदाची संधी आहे. यासाठीची प्राथमिक निवड चाचणी उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नंदनवन कॉलनीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणार आहे.

****

No comments: