Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 August 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्याचा ठराव
विधीमंडळात एकमतानं मंजूर
· राज्य विधीमंडळाचं अधिवेशन संपल. १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये पुढचं हिवाळी
अीधवेशन
· अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
· राज्यात, ‘माझा एक दिवस बळीराजासोबत’, अभियान राबवून कृषी धोरण तयार करणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
· राज्यातल्या सत्तासंघर्षावर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
· बीड जिल्ह्यातील शशिकांत कुलथे आणि सोमनाथ बलके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
घोषित
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८८७ रुग्ण, मराठवाड्यात ५२ बाधित
आणि
· नाशिकमध्ये २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बांधकाम विभागाचा कार्यकारी
अभियंता दिनेशकुमार बागुलला अटक
सविस्तर बातम्या
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा, तसंच नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील
यांचं नाव देण्याचा ठराव, काल विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आला. औरंगाबादचं नाव
छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव, धाराशीव करण्यात येणार आहे. विधीमंडळात नामांतराचा
मंजुर झालेला हा ठराव आता केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे पाठवत असल्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. ते म्हणाले....
Byte
…
औरंगाबादचे
छत्रपती संभाजीनगर विभाग जिल्हा तालुका तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा
असे नामांतर करण्यास १६ /७/२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे.
आणि ज्याअर्थी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव जिल्हा असे नामांतर
करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्यविधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता
मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्याअर्थी
आता महाराष्ट्र विधानसभेच्या ११० नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नामांतर
करण्याची शिफारस भारत सरकारला करते.
नवी मुंबई विमानतळाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवला
जाणार आहे. नामांतराचे हे ठराव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विधानपरिषदेत
सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आणि ते मंजुर करुन घेतले.
****
राज्य विधीमंडळाचं अधिवेशन काल संस्थगित झालं. पुढचं हिवाळी अीधवेशन १९ डिसेंबरपासून
नागपूरमध्ये होईल. कोविडच्या निर्बंधानंतर यावेळी राज्य विधिमंडळाचं नऊ दिवसांपैकी
सहा दिवसाचं कामकाज झालं. आपल्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी झाल्याचं, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे
निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्वपूर्ण अशी एकूण
१० विधेयकं अधिवेशनात मंजूर झाल्याचं मुख्यमंत्री सांगितलं.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ हजार रिक्त
पदांची भरती केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातल्या विविध विभागांमधल्या
रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून, ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या
पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं कारशेड आरे इथंचं उभारलं जाणार असल्याचंही त्यांनी
स्पष्ट केलं. आरेत वन विभागाची एकूण एक हजार २८५ हेक्टर जमीन असून, त्यामध्ये आणखी
३२६ हेक्टर जमिनीचा वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन
लागणार असल्याचं, ते म्हणाले.
राज्यातल्या गुन्हेगार शोधण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, पोलिसांनी मुस्कान
अभियानामधून राज्यातली ३७ हजार ५११ मुलं आणि मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांकडे सुपूर्द
केलं आहे.
पोलिसांना अधिक घरं उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली
जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वी
केवळ पाच हजार रुपये मदत होती, ती आता पंधरा हजार रुपये दिली जात असल्याचं त्यांनी
सांगितलं. गावांचं शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्यानं
काम केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे
प्रलंबित असून, त्यास लवकरात लवकर मंजूरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. यासाठी राज्य शासनानं
तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. त्यानुसार अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची
पूर्तता करत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीनं काढला असून, त्याबाबत सातत्यानं पाठपुरावा
करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यात, ‘माझा एक दिवस
बळीराजासोबत’, हे अभियान
राबवून कृषी धोरण तयार करणार असल्याची घोषणा, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत
केली. या अभियानात शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं यासाठी,
कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्यानं एकत्रितरित्या हे अभियान येत्या
एक सप्टेंबरपासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी दिवसभर राहणार असून,
त्यांची दिनचर्या जाणून घेणार आहेत. या दरम्यान त्यांच्या अडीअडचणी जाणून आत्महत्यांच्या
कारणांची मीमांसा देखील करणार आहेत, असं ते म्हणाले. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करुन कृषी धोरण तयार करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी
सांगितलं.
****
अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदं लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री
संदीपान भुमरे यांनी काल विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेस उत्तर देताना
ते बोलत होते. अल्पसंख्याक विभागातल्या रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या विभागाच्या
अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत तसंच निधीसाठी विविध
विभागाशी समन्वय ठेवण्यात येईल अशी माहितीही भुमरे यांनी यावेळी दिली.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केंद्रीय भूसंपादन कायद्यापेक्षा अधिक
मोबदला आणि सुविधा देण्याचा ठराव, काल विधीमंडळात मंजूर करण्यात आल्याची माहिती, उद्योगमंत्री
उदय सामंत यांनी दिली. तत्कालीन भूसंपादन कायदा १८९४ च्या कलम १०७ नुसार राज्यांना
दिलेल्या अधिकारानुसार राज्य शासनानं भूसंपादन करण्यासाठी उचित बदल केले आहेत. या बदलांमुळे
भूधारक आणि प्रकल्पग्रस्तांना अधिकचा मोबदला मिळणार असून, जास्तीच्या सुविधा मिळणार
आहेत. तसचं औद्यौगिकरणासाठी जमिनी उपलब्ध होणं अधिक सोयीचं होणार असल्याची माहिती सामंत
यांनी दिली.
****
आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे
राबवणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. कुपोषणमुक्तीसाठी
महिला आणि बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या समन्वयानं विविध योजना राबवण्यात
येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेत कुपोषणाच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये
शाब्दिक चकमक झाली. कुपोषणामुळे मृत्यू झाले नाही, या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार
गावित यांच्या दाव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं
विरोधकांनी सभात्याग केला.
****
कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी लवादाकडे पाठपुरावा करणार असून, प्रकल्पाचं
काम थांबवलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत
दिली.
****
विधानपरिषदेतल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल विधानपरिषदेत दरेकर यांच्या नियुक्तीची
घोषणा केली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे
यांचं तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पुढील तीन
महिन्यात हे तैलचित्र लावण्याचं काम पूर्ण करणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष
ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
****
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत
मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या एक हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात
येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांच्या
बाबतीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा आरक्षणा संदर्भातली मंत्रिमंडळ
उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. मराठा समाजासाठी
स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार
नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांशी
बोलतांना हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे, असे आदेश काल वनविभागानं जारी केले. सांस्कृतिक
कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतची घोषणा
केली होती.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली नाही. येत्या
सोमवारी २९ तारखेला शिवसेनेचे वकील न्यायालयात आपलं म्हणणं सादर करतील, त्यानंतर सुनावणी
कधीपासून सुरु होणार हे निश्चित होईल.
****
शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देशातल्या ४६ शिक्षकांना २०२२चा
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. यामध्ये राज्यातले शशिकांत कुलथे, सोमनाथ
बलके आणि कविता संघवी या तीन शिक्षकांचा समावेश आहे. कुलथे हे बीड जिल्ह्यातल्या गेवराई
इथल्या दामु नाईक तांडा शाळेचे, तर बलके हे आष्टी तालुक्यातल्या पारगाव इथल्या जोगेश्वरी
शाळेचे शिक्षक आहेत. येत्या शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे .
****
अमृत महोत्सवानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग
परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना सुरु करण्यात आली आहे. ७५ वर्षांवरील
या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्रांचं वितरण आणि योजनेचा शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत
झाला. या योजनेचा १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार असून, शिवनेरीसह सर्व सेवांसाठी
ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आधारकार्ड, पॅनकार्ड,
वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र आणि केंद्र आणि राज्य शासनाचं ओळखपत्र, यापैकी
कुठलंही एक ओळखपत्र वाहकाला दाखवल्यास या योजनेअंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेव अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबाद
इथं केलेल्या भाषणात चौदा चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी दोषारोपपत्र तयार करण्यात आलं
आहे. ते दाखल होताच न्यायालयानं आदेश दिल्यानंतर हजर राहण्याची नोटीस राज ठाकरे यांना
बजावण्यात आली आहे.
****
साखर सम्राट अभिजित पाटील यांच्या नाशिक, उस्मानाबाद, पंढरपूर आणि परभणी इथल्या
साखर कारखान्यांवर आयकर विभागानं काल छापे मारले. या चौकशीत काय निष्पन्न झालं, हे
अद्याप कळू शकलं नाही.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८८७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९१ हजार २७६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात
सहा रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख ४८ हजार २१४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल
दोन हजार १९० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत,
७९ लाख ३० हजार ७९३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक
शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
१६, औरंगाबाद १२, लातूर नऊ, जालना आठ, नांदेड चार, तर बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
नाशिक मधल्या बांधकाम विभागातला कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला २८
लाख ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या
माध्यमातून सेंट्रल किचनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली
होती. जिल्ह्यातल्या हरसूल या आदिवासी गावात असलेल्या वसतीगृहात सेंट्रल किचन बांधण्याचं
काम आर के इन्फ्रा कॉन्स्ट्रो लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं आहे. दोन कोटी ४० लाख
रुपयांच्या या कामासाठी आरोपी अभियंता बागुल यानं एकूण खर्चाच्या १२ टक्के या प्रमाणे
लाच मागितली होती.
****
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचं
काल मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. चार दशकांहून
अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत सावन कुमार यांनी संजीव कुमार ते सलमान खान अशा
सर्व मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. त्यांनी
अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. यामध्ये सौतन, साजन बिन सुहागन, सनम
बेवफा, खलनायका, माँ, चांद का तुकडा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सावन कुमार
हे महिलांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते.
****
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल जालना शहरात नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन
केलं. दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला मूर्तीवेस रस्ता तातडीनं सुरू करण्यात यावा,
तसंच कन्हैय्यानगर रस्त्याचं रखडलेलं काँक्रिटीकरण पूर्ण करावं या प्रमुख मागण्या या
वेळी करण्यात आल्या. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं.
****
No comments:
Post a Comment