Sunday, 28 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      ऊसापासून साखर निर्मितीऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा साखर कारखान्यांना सल्ला

·      सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळित यांना शपथ

·      शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील हार फुलं बंदी निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ७२३ रुग्ण, मराठवाड्यात ४१ बाधित

·      बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला कांस्य पदक

·      फिलिपिन्स मधल्या लुसाने डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत भालाफेकपटू नीरज चोप्रानं रचला इतिहास

आणि

·      आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना

***

आता सविस्तर बातम्या

****

ऊसापासून साखर निर्मिती कमी करून इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची वेळ आली असल्याचं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. सरकारनं पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतलेला आहे, इथेनॉलची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या वर्षी देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ४०० कोटी लिटर एवढी होती, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारनं कृषी उद्योगा बरोबरच वीज आणि ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. वीज खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं काही राज्य आपली दर निश्चिती करत नसल्याकडे गडकरी यांनी यावेळी लक्ष वेधलं.

****

मुंबईत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दीक्षांत समारंभालाही गडकरी उपस्थित होते. ज्ञानाचं रूपांतर अभिनवतेत करणं म्हणजे देशाच्या संपत्तीत वाढ करण्यासारखं आहे, अनेकदा महानगरपालिकांच्या कामकाजात गुणवत्तेचा आणि दर्जाचा अभाव जाणवतो, त्यावर उपाय म्हणून आपल्याला उत्कृष्ट आणि प्रगत तंत्रज्ञान तसंच प्रकल्प व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, असं गडकरी म्हणाले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांचं आर्थिक सक्षमीकरण आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. भविष्यात सामाजिक स्तरावर केलं जाणारं प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यासाठी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण द्यायला हवं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

****

देशाचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळित यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ आठ नोव्हेंबर पर्यंत राहील. न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा काल सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय लळीत याचं अभिनंदन केलं आहे. "महाराष्ट्राचे सुपुत्र  न्यायमूर्ती लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल," असंही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात असलेली हार फुलं बंदी तूर्तास कायम असून या निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत शासन स्तरावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून भाविकांच्या भावना आणि श्रद्धेचा विचार करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्र्यानी काल शिर्डी इथं साईबाबा संस्थान विश्वस्त आणि शिर्डीच्या ग्रामस्थांची चर्चा केली. शिर्डी शहर आणि परिसर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेतेपदी तर पराग डाके यांची शिवसेना सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या ५० यशस्वी उमेदवारांचा काल मुंबईत पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पात्र आणि प्रमाणित पर्यटक मार्गदर्शकांची ही नवीन तुकडी पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी तसंच आपली शैली आणि नवीन तंत्राची सांगड घालून पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास वल्सा नायर यांनी व्यक्त केला.

पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर यांनी यावेळी सर्व प्रशिक्षित उमेदवारांचं अभिनंदन केलं. आतापर्यंत राज्यात १५ वेगवेगळ्या ठिकाणी ऑफलाईन टूर गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये एकूण साडे चारशे मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती बोरीकर यांनी दिली.

****

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नव प्रक्रिया उद्योजकांनी मार्केटिंगचं तंत्र आत्मसात करावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेत चव्हाण मार्गदर्शन करत होते. जिल्हास्तरीय संसाधन व्यक्ती -डीआरपी यांनी संबंधितांना मार्गदर्शन करावं, अशी सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. यासह बँकांनी या योजनेतील प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आदेशही चव्हाण यांनी बँकांना दिले.

****

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची रक्कम १० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे, ज्या शेतकऱ्यांचं बँकेत बचत खातं नाही त्यांनी प्राधान्याने ते उघडावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज खात्याशी आधार कार्ड जुळवून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असंही चव्हाण म्हणाले. सन २०१७ -१८ ते २०१९-२० या तीन वर्षात घेतलेल्या अल्पमुदती पीक कर्जाच्या परतफेडीचा देय दिनांक विचारात घेऊन पीक कर्जाची मुद्दल आणि व्याजासह पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल रकमेवर पन्नास हजारपर्यंतचा प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे.

****

 

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या वाई - गोरखनाथ इथं सातशे वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक महापोळा काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठवाडा, विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांनी या महापोळ्याला मोठी गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे हिंगोलीचे वार्ताहर

वाई येथील गोरखनाथाच्या मंदिराला तब्बल ४० हजार बैलजोड्यांनी प्रदक्षिणा घातली. बैलपोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे कराच्या दिवशी गोरखनाथांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. येथे प्रदक्षिणा घातल्यानंतर बैलांना कोणताच आजार होत नाही अशी आख्यायिका आहे. कोरोनाच्या साथीनंतर प्रथमच मोठ्या उत्साहात महापोळा साजरा झाला आहे. या निमित्ताने हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मोफत पशुचिकित्स्याचे स्टॉल थाटले होते. तर ग्रामस्थांनी बैलांसाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था केली होती. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा होतो. बैलांचे सजवलेले पुतळे वाजत गाजत मिरवले जातात. या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बडग्याच्या प्रतिकृतीद्वारे समाजातल्या अनिष्ट रूढी, सामाजिक राजकिय मुद्यांवर लक्ष वेधलं जातं. नागपूर, गोंदियासह अनेक ठिकाणी काल मारबतचा जल्लोष पहायला मिळाला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य जपत आणि विश्वस्तांसमवेत चर्चा करुन केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत विकास केला जात आहे असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या तब्बल २६ तीर्थक्षेत्रांच्या विविध विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन येत्या १० दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश खासदार प्रताप चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात राहेर इथल्या नृसिंह मंदिरापासून माहूरच्या दत्त शिखर संस्थानापर्यंत प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या तीर्थस्थळांवर नागरिकांची मोठी श्रध्दा आहे. कंधार तालुक्यातील बोरी इथं लोअर मनार प्रकल्पाच्या जलाशयाच्या काठावर असलेलं महादेव मंदिर आणि धरणाच्या पाण्यात साकारलेलं बेट, हे पर्यटनाच्या मोठ्या संधी घेऊन उभं असल्याचं खासदार चिखलीकर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असं आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, उपस्थितीहोते. गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचं पालन करावं, सं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. केंद्रीय राज्य मंत्री डॉ. कराड यांनीही पोलिस आणि महापालिका प्रशासन त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. त्याचवेळी  गणेश भक्तांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडावी, सं आवाहन केलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा ४१ व्या वर्धापन दिन काल न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना त्यांनी संविधानाला अपेक्षित असलेल्या शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन वकीलांना केलं. औरंगाबाद खंडपीठात आजपर्यंत ८ लाख १९ हजार ५१९ खटले दाखल झाले असून त्यापैकी ६ लाख ५३ हजार ९७० प्रकरणं निकाली काढली असल्याची माहिती न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी यावेळी दिली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ७२३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९ हजार ८४५ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २२४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल हजार ८४५ रुग्ण बरे झाले.  राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३ हजार ८७८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  यात लातूर जिल्ह्यातल्या १५, उस्मानाबाद ८,  जालना जिल्ह्यातल्या ५, आणि औरंगाबाद  जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश आहे.  बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यु झाला.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. काल सकाळी झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सात्विक - चिराग जोडीला मलेशियाच्या जोडीकडून २२ - २०, १८- २१, १६ - २१ असा पराभव पत्करावा लागला.

****

भालाफेकपटू नीरज चोप्रानं फिलिपिन्स मधल्या लुसाने डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक शून्य आठ मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं ही कामगिरी केली असून, ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या विजयामुळे नीरज डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, ही स्पर्धा सात आणि आठ सप्टेंबरला स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे. 

****

संयुक्त अरब अमिरातीत सुरू झालेल्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता या सामन्याला प्रारंभ होईल.

दरम्यान, काल झालेल्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा आठ गडी आणि ५९ चेंडू राखून दणदणीत पराभव करत, विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेला श्रीलंकेचा संघ अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला नाही, श्रीलंकेचा संघ १९ षटकं आणि चार चेंडूत १०५ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तान संघानं १०६ धावांचं उद्दीष्ट दहा षटकं आणि एका चेंडूत साध्य केलं.

****

औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार खो खो खेळाचे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना जाहीर झाला आहे. आज भंडारी यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय खेळाडू तसंच क्रीडा शिक्षकांचाही गौरव होणार आहे. खेळासाठी योगदान देणारे खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि संघटकांना दरवर्षी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने संघटनेतर्फे गौरव करण्यात येतो.

****

No comments: