Wednesday, 31 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  31 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ; ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना.

·      राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला केंद्र सरकारची मंजुरी.

·      देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली मर्यादा रद्द.

आणि

·      प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ.

****

गणेशोत्सवाला आज सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यत आली. या वर्षी हा उत्सव कोविड प्रतिबंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव देशवासियांवर राहील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं राजभवनातलं निवासस्थान ‘जलभूषण’ इथे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्यासह राज्यातल्या जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी गणरायाला मागितलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय आणि मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसंच पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करून प्रार्थना केली तसंच सर्वांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशमूर्तीचं पूजन करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही आज ढोल ताशांच्या ठेक्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

राज्यभरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरवात झाली. महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननं यंदा पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा साकारली आहे. आठ प्रकारची रोपं वापरत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ही गणेश प्रतिमा साकारली आहे.

औरंगाबाद शहरातही घरगुती गणपतींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निवासस्थानी गणपतीची षोडशोपचारे स्थापना केली. राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, महागाई कमी होऊ दे, असं साकडं दानवे यांनी गणरायाला घातलं आहे. ते म्हणाले –

 

गणरायाला हीच प्रार्थना आम्ही केली की, अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकर मदत मिळू दे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जी एस टी पीठावर लागलेला आहे. पेट्रोल-डिझेल महागलेलं आहे. याचे सुद्धा दर कमी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी गणपती बाप्पाला केलेली आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला मंजुरी दिली आहे. ही डाळ, माध्यान्ह भोजन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह विविध कल्याणकारी योजनांमध्ये वापरली जाईल. या योजनेतून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या भांडारांमधून आठ रुपये प्रति किलो दरानं पंधरा लाख मेट्रिक टन हरभरा डाळ घेता येईल, प्रथम येणाऱ्यास प्रथम, या तत्वावर ही डाळ मिळणार आहे. ही योजना फक्त एकदा राबवण्यात येणार असून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेचा लाभ बारा महिन्यांच्या आत किंवा डाळीचा साठा संपेपर्यंत घेता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकार बाराशे कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या तीन वर्षात देशात हरभऱ्याचं सर्वाधिक उत्पन्न झालं आहे. केंद्र सरकारनं किमान हमी भाव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून तीस लाख पंचावन्न हजार मेट्रिक टन हरभरा खरेदी केला आहे. आगामी रब्बी हंगामातही हरभऱ्याचं उत्पादन चांगलं असेल, असा अंदाज आहे. याशिवाय या समितीनं किमान हमीभाव योजनेत तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या खरेदीची सीमा पंचवीस टक्क्यांवरून वाढवून चाळीस टक्के केली आहे.

****

सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथीयांच्या संमेलनात बोलत होते. सुटं तेल विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं कराड यांनी सांगितलं.

****

काँग्रेस अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटाचे सदस्य मनीष तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसनं मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी तिवारी यांनी काल एका ट्विट संदेशातून केली. मतदार यादी जाहीर न करता निवडणूक कशी होऊ शकते आणि अशा पद्धतीनं होणारी निवडणूक निष्पक्ष कशी असेल, असा प्रश्न तिवारी यांनी काँग्रेस पक्ष निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांना विचारला. यावर, काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सदस्याला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन मतदार यादी पाहता येईल, असं उत्तर मिस्त्री यांनी दिल्यावरही तिवारी यांनी यावर टीका करत पारदर्शक निवडणुकीसाठी मतदारांची यादी जाहीर करण्याची पुन्हा मागणी केली.

****

देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली सीमा आज हटवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सरकारनं या दराची सीमा ठरवली होती. आजच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांचे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात स्वस्त तिकिटांच्या ऑफर्स देता येतील. विमान सेवांची रोजची मागणी आणि विमान इंधनाची किंमत यांचं काळजीपूर्वक विश्लेषण करून देशांतर्गत विमान तिकिटांच्या दरावरची सीमा हटवण्यात येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ही मुदतवाढ देण्याची मागणी केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मागणी मान्य ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डेटा अपलोड करण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. राज्यातल्या पात्र पीएम किसान लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबवली जात असून आतापर्यंत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरीत एकोणचाळीस लाख तेरा हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी या बैठकीत दिली.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

****

जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे.

****

No comments: