आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध
याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारच्या
आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका, तसंच शिंदे
गटातल्या आमदारांना ठाकरे गटानं अपात्र ठरवणं, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याबद्दल
शिंदे गटानं दाखल केलेली याचिका या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदिव्जचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्यात
बैठक झाली, तसंच मालदिवच्या प्रतिनिधीमंडळानंही पंतप्रधानांची
भेट घेतली. अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात तसंच सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांच्या
प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला, तसंच दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय करार आणि संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यात
आली.
****
प्रसारीत होणारे आक्षेपार्ह कार्यक्रम आणि जाहिरात संहितेचं उल्लंघन केल्याबद्दल
२०१७ ते २०२२ या कालावधीत नऊ दूरचित्रवाणी
वाहिन्या बंद करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग
ठाकूर यांनी काल लोकसभेत सांगितलं. तसंच ९४ युट्यूब चॅनल आणि १९ समाज माध्यम अकाऊन्ट्स, वेबसाईट्स आणि मोबाईल अप्लीकेशन्सवर डिजीटल माध्यम संहितेच्या
अंतर्गत कारवाई केल्याचं ते म्हणाले.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं काल दिल्लीतल्या नॅशनल हेरॉल्ड
वर्तमानपत्राच्या मुख्य कार्यालयासह अनेक ठिकाणी छापे टाकले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया
गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या
खरीप पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी, काल केंद्रीय
पथक सिरोंचा तालुक्यात दाखल झालं. या पथकातल्या अधिकाऱ्यांनी सिरोंचा, आरडा, मुगापूर आणि मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली.
सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. नुकसानीचा अहवाल केंद्र
सरकारकडं पाठवून आवश्यक ती प्रकिया तातडीनं करण्याची ग्वाही,
पथकातल्या अधिकाऱ्यांनी आपद्ग्रस्तांना यावेळी दिली.
//**********//
No comments:
Post a Comment