Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
शिवसेनेच्या
ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे
सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. यासंदर्भात पुढची सुनावणी गुरुवारी
होणार आहे.
****
राज्यात
सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर पंचनामे करुन नुकसान
भरपाई देण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. अतिवृष्टीसंबंधी
सभागृहात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या
नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, बाधित शेतकर्यांना
नुकसान भरपाई दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या
नुकसानीसाठी तातडीची मदत म्हणून दिली जाणारी रक्कम पाच हजार रुपयांवरुन १५ हजार रुपये
करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
अंबाजोगाई
नगरपरिषदेत नालीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात
आला. याप्रकरणी मुख्याधिकार्यासह तीन अधिकार्यांची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री
शिंदे यांनी दिलं.
भंडारा जिल्ह्यात
एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात
अल्पकालिन चर्चा झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ही घटना
पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात
शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
महाविकास
आघाडीची आज मुंबईत बैठक होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित
राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधीमंडळातली
रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अंधश्रद्धांच्या
विरोधात धोरण तयार करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी
राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं
आहे. महिलांविषयक विविध अत्याचाराच्या घटनांमध्ये अंधश्रद्धेतून महिला आणि मुलींची
विटंबना, प्रसंगी हत्या अशा अनेक घटना समाज माध्यमातून समोर येत असून, या घटनांचा गांभीर्यपूर्वक
विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाजातल्या अशा मानसिकतेमध्ये जनजागृतीच्या
माध्यमातून बदल घडवणं आवश्यक असल्याचं चाकणकर यांनी पत्रात नमूद केलं आहे. अंधश्रद्धेच्या
विरोधात सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी आपल्या स्तरावरून संबंधितांना सूचना द्याव्यात,
अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरच्या
हिरवळीवर ध्वजारोहण झालं. वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा
जीवन साधना पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संशोधनाचा दर्जा खालावलेला असल्याचं मत डॉ. रसाळ
यांनी यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना व्यक्त
केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगलं हवं,
त्यामुळे विद्यापीठात राजकारण आणि सहकारांच्या कामात अडथळा निर्माण होईल, अशी कामं
होता कामा नये, तरच त्या विद्यापीठाची ज्ञानात्मक प्रगती होवू शकते, असं मत त्यांनी
व्यक्त केलं.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २९ लाख २५ हजार
३४२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१० कोटी ३१ लाख ६५ हजार ७०३
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या आठ हजार ५८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार
६८० रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९६ हजार ५०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मतदार यादीत
नावनोंदणीकरता फॉर्म सहा ब मधे आधार क्रमांक देणं पूर्णपणे ऐच्छिक असल्याचं, केंद्रीय
निवडणूक आयोगानं पुन्हा स्पष्ट केलं आहे. मतदार यादीच्या पडताळणीसाठी एक ऑगस्टपासून
निवडणूक आयोगाने आवश्यक नोंदींमधे हा फॉर्म समाविष्ट केला आहे. मात्र आधार क्रमांक
दिला नाही या कारणास्तव कोणाही मतदाराचं नाव यादीतून वगळणार नाही असं निवडणूक आयोगानं
सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment