Tuesday, 23 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी, कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मदत मिळणार

·      नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबतचं सुधारणा विधेयकं विधानसभेत मंजूर

·      शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तसंच शेतीच्या नुकसानाबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

·      राज्यातल्या तीन हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश जारी

·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करणार, आरक्षणाची स्थिती पाच आठवडे जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

·      शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवरची आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार १८३ रुग्ण, मराठवाड्यात २३ बाधित

·      समर्थ रामदास स्वामींच्या जांबसमर्थच्या राममंदिरातल्या मूर्तीं चोरीच्या शोधासाठी पाच पथकं रवाना

आणि

·      झिम्बॉब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात १३ धावांनी विचय मिळवत भारतानं तीन सामन्यांची मालिका जिंकली

 


सविस्तर बातम्या

राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यासंबंधीचा शासन निर्णय काल जारी झाला. या निर्णयानुसार कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत दिली जाईल, असं महसूल विभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबतची सुधारणा विधेयकं काल विधानसभेत मंजूर झाली. लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारासाठी लोकांमधून नगराध्यक्ष थेट निवडून येणं योग्य असून, त्यांना वाढीव अधिकार देण्याबद्दल विचार केला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. या विधेयकांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. दरम्यान, हे विधेयक लोकशाहीला घातक असून, सर्वसामान्य लोक इथे निवडून येऊ शकणार नाहीत, आर्थिक पाठबळ आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना यामुळे मोकळं रान मिळणार असल्यानं, हे विधेयक मागं घेण्याची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या विधेयकाच्या चर्चेत केली.

या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ हजार ग्रामपंचायतींनी थेट सरपंच निवडून देण्याची मागणी केल्याचं सांगितलं.

दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीत जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याची तरतूद असणारं विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या कारभारात स्थैर्य आणणं हा याचा मुख्य उद्देश आहे असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं केलेल्या उपाययोजना लागू करण्यासंदर्भातलं, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, २०२२ काल विधान परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं.

****

शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असून, शेतीच्या नुकसानाबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये, शंखी गोगलगायी मुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान नेमकं किती आहे, तसंच नुकसान भरपाई किती द्यावी लागेल याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असं सत्तार यांनी सांगितलं.

****


मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. एका लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक वाढली असून, या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ मिळेल असं त्यांनी सांगितलं. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा विकसित करण्यात येईल असं सांगून अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

****

राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्यासाठी लवकरच राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या सर्व २२ वैद्यकीय महाविद्यालयातील ही रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत असल्याचंही महाजन यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या तीन हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, विधान भवनातील दालनात जारी करण्यात आले. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं बदल्या करण्यात आल्या असल्याचं महाजन यांनी सांगितलं. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसंच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेले योग्य निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतल्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदल्यासाठी एकूण  ११ हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले होते, ३४ जिल्हा परिषदेअंतर्गत या बदल्या करण्यात आल्या.

****

कोरोनामुळे दोन्ही पालकांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचं, वैद्यकीय, अभियांत्रिकी अथवा अन्य कोणताही सुरू असलेला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत केली. यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोविडमध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं पदवी तसंच पदव्युत्तरपर्यंतचं संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी आतापर्यंत २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रूपये वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या पुढील पाच आठवडे आरक्षणाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला, मात्र ज्या ९२ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया या निर्णयापूर्वीच सुरू झाली होती, अशा नगरपालिकांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्याबाबत सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

****

शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालायत आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातल्या पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन आणि पुरवणी कार्यसूचीत काल रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीबाबतही अनिश्चितता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईतल्या विशेष पी एम एल ए न्यायालयानं काल हा निर्णय दिला. ३१ जुलै रोजी राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली, त्यानंतर आठ ऑगस्टपर्यत ते संचालनालयाच्या कोठडीत होते, नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या सेवालय बालगृह या संस्थेनं एच आय व्ही बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचं प्रातिनिधिक अनावरण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल मुंबईत  झालं. या कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसंच सूर्योदय फाउंडेशनच्या संस्थापक अनुराधा पौडवाल, ॲम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी आणि प्रवीण छेडा, 'सेवालय'चे संस्थापक रवी बापुटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी मुलं उपस्थित होते. यावेळी एच आय व्ही बाधित मुलांनी सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखवणारं लघुनाट्य सादर केलं. सूर्योदय फाउंडेशन तसंच एम्पथी फाउंडेशन या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम करण्यात आलं आहे.

****

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग -सी आय डी कडून, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक -ए टी एस कडे वर्ग करण्यात आला आहे. कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर कोल्हापूर इथं, १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान पानसरे यांचं चार दिवसांनी २० फेब्रुवारी रोजी निधन झालं. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. हत्येला सात वर्षे उलटूनही सीआयडीच्या विशेष तपास पथकाचा तपासात अपेक्षित प्रगती नसल्याने, हा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती, त्यानुसार एटीएसच्या पुणे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १८३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८५ हजार ५६६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ९८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २५ हजार ६४५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १२, लातूर सहा, औरंगाबाद तीन, तर नांदेड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

जालना जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ इथल्या राममंदिरातल्या मूर्तींची चोरी प्रकरणी पोलिसांची पाच तपास पथकं रवाना करण्यात आली आहेत. घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी काल ही माहिती दिली. श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत आणि जांबुवंत या देवतांच्या पंधराव्या शतकातल्या पंचधातूच्या सहा ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. समर्थ रामदास स्वामी स्वत: या मूर्तींची पूजा करत होते. या घटनेचे पडसाद काल विधीमंडळातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता .

****

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं काल यजमान झिम्बॉब्वे संघावर १३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. काल हरारे इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं आठ बाद २८९ धावा केल्या. शुभमन गिलच्या १३० धावांना इशान किशनच्या ५० आणि शिखर धवनच्या ४० धावांची साथ लाभल्यानं, भारत ही धावसंख्या उभारू शकला. कर्णधार के एल राहुलने ३० धावा केल्या. संजू सॅमनसच्या १५ धावा वगळता, इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला झिम्बॉब्वेचा संघ २७६ धावांवर सर्वबाद झाला. शतकवीर शुभमन गील सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी पावणे दहा वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरच्या हिरवळीवर ध्वजारोहण होईल, त्यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात जीवनसाधना पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना प्रदान केला जाणार आहे. प्रसिध्द साहित्यिक बाबा भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आल्याचं, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १३० ग्रामपंचातींच्या इमारतींचं बांधकाम, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना - मनरेगा च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी मनरेगा आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी कुशल अकुशल कामगार आणि पंचायत समिती गणावरती एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीओटी अर्थात बांधा, वापरा, हस्तांतरीत करा यामाध्यमातून काही ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनासाठी गाळे काढण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळणार असल्याचं गटणे यावेळी म्हणाले.

****

शेवटच्या श्रावणी सोमवारमुळे काल ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.

नाशिकमध्ये श्री त्रंबकेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळच्या घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथाच्या दर्शनासाठी काल पहाटेपासूनच शिवभक्त मोठ्या संख्येनं दाखल झाले होते.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...