Wednesday, 24 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तसंच तातडीची मदत १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·      अतिवृष्टीबाबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधी पक्षाचा सभात्याग

·      नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्याची तरतूद असणारं, विधेयक विधानपरिषदेतही मंजूर

·      अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दाखल याचिका पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय, उद्या सुनावणी

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ९१० रुग्ण, मराठवाड्यात २१ बाधित

आणि

·      जालना औद्यगिक वसाहतीमधल्या काही स्टील कंपन्यांवर वस्तु आणि सेवा कर विभागाच्या छापे

 

सविस्तर बातम्या

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत सभागृहात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम पाच हजारावरून १५ हजार रुपये करण्यात येणार असून, ही रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

Byte

सततच्या पावसामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं असेल, तर ते देखील त्याचे पंचनामे करून त्याला देखील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. गोगलगाई, यलो मोजॅट यासारख्या किड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारं नुकसान याबाबत देखील पंचनाम्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे जी आपण तातडीची मदत देतो, आकस्मिक, जी पाच हजार रूपये आहे, जी म्हणजे कपडे, भांडीकुंडी यांचं जे नुकसान होतंय, ती तातडीची मदत आपण पाच हजारांवरून पंधरा रूपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात. तसेच कृषी कार्यालय, तहसिल कार्यालय, किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना, अर्जदेखील स्वीकारले जातील. म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये आणि ते अर्ज ग्राह्य धरले जातील, अशा लेखी सूचना देखील विमा कंपन्यांना देण्यात येतील.

 

राज्यात सरासरीपेक्षा १२१ टक्के अधिक पाऊस झाला असून, १८ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाली आहे. ऑगस्टमध्ये ८६ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचं नुकसान झालं. याठिकाणी पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नियमित विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर पासून विम्याची मदत मिळेल, विमा नुकसान भरपाईचे अर्ज बँकेत जमा करता येतील, स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येईल, असं त्यांनी सांगितलं. शेतपिकांमध्ये वैविध्य वाढवणं, सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीला प्राधान्य देणं, तसंच कृषी विद्यापीठ बळकट करण्याची घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, ही मदत जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना भावनिक साद घातली. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी विविध विभागांच्या मदतीने सर्वंकष धोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन त्यांनी केलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने सभात्याग केला. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतमजुरांना एकरकमी मदत जाहीर करावी, अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, आदिवासींना खावटी अनुदान द्यावं, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्या. ते म्हणाले...

 

Byte

जवळपास १८ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे पेरणीलायक आता राहिलेलं नाही. तिथली पेरणी केलेली सगळी कुजून गेली. पिकं सडून गेली. ते एकदम काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या. वाहून गेल्या. माती वाहून गेली. अशी सगळी परिस्थिती. शेतकऱ्यांला पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही. दुसरी गोष्ट या काळामध्ये आमच्या आदिवासी समाजाला बाहेर कुठे काम मिळत नाही, ते घरीच असतात. म्हणून खवटी अनुदान द्या अशी आमची मागणी होती, ती त्यांनी मान्य केली नाही. आता त्या शेतकऱ्यांला भरीव अशी आर्थिक मदत ७५ हजार रूपये हेक्टरी आणि फळबागांना दीड लाख रूपये हेक्टरी तशी पण ती मदत त्यांनी जाहीर केली नाही.

 

यासंर्भात बोलतांना बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आदिवासींना खावटी अनुदान देणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर सदनात काल अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्याची तरतूद असणारं, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक २०२२, काल विधानपरिषदेत बहुमताने मंजूर झालं. या विधेयकाला विरोध दर्शवत विरोधकांनी सभात्याग केला. हे विधेयक दोन्ही सदनाच्या ७५ सदस्यांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं, असा प्रस्ताव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला होता, मात्र हा प्रस्ताव बहुमातने फेटाळण्यात आला, त्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं.

****

अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी एका महिन्याच्या आत सर्वंकष धोरण आणलं जाईल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या जरिकोट इथं, वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनामुळे घराची पडझड झाल्यासंदर्भातला तारांकित प्रश्न काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर यांनी विचारला होता. या प्रकरणी संबंधित तहसीलदार आणि तलाठी यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, आणि संबंधित चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई नगर परिषदेत गैरप्रकारांत दोषी आढळणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्या नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. याबाबत नगर प्रशासनाची उपायुक्त यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली असून, या कामात प्रशासकीय आणि वित्तीय अनियमितता झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार अंबाजोगाई नगर परिषदेतले गणेश सरोदे आणि अशोक साबळे हे वर्ग दोनचे अधिकारी तसंच उदय दीक्षित आणि अजय कस्तुरे या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. ही चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्यात आल्या आहेत. या प्रकरणात महत्वाचे घटनात्मक प्रश्न उपस्थित झाले असल्याचं मत नोंदवत, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठानं अकरा प्रश्नांसह हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं. याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेवर अधिकृतपणे दावा करणार्या एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावं, अशी विनंती उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं काल न्यायालयात करण्यात आली. त्यावर अंतरिम दिलासा देण्याविषयी घटनापीठाकडे सुनावणी करण्यात येईल, असं न्यायालयानं सांगितलं.

****

महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्रच आहोत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल विधिमंडळात बैठक पार पडली, त्यानंतर ते वात्राहरांशी बोलत होते. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळत सांगू असं ठाकरे म्हणाले.

****

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण कधीच नव्हतं, हे राजकारण नसून, तात्पुरती आर्थिक तडजोड असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत मनसे पदाधिकार्यांच्या मेळाव्यात बोलत होते. आपल्याकडे वास्तू नसली तरी विचारांचा वारसा आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत, ते विचार पुढे न्यायचे असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

****

शिक्षण, संशोधन, प्रशासन तसंच संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने भरीव वाटचाल करण्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, साहित्यिक तथा ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना, जीवन साधना पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी कुलगुरु बोलत होते. विद्यापीठाची प्रगती आणि विस्तार होत आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद - नॅकचा ए ग्रेड विद्यापीठाला मिळाल्याचं सांगतानाच, विद्यापीठाच्या कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेतला. सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि विद्यापीठात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दरानं तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी, तसंच वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्यानं दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असं आवाहन महावितरणनं केलं आहे. अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांविरूध्द महावितरणच्या नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी दिला आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९१० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८७ हजार ४७६ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार २७३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २६ हजार ९१८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ३५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११, लातूर चार, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

****

जालना औद्यगिक वसाहतीमधल्या काही स्टील कंपन्यांवर वस्तु आणि सेवा कर विभागाच्या पथकानं काल छापे मारले. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****

सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी सध्या सरकारी खात्याकडे आहे, ती सरकारनं या विषयात रस असणाऱ्या लोकांकडे सोपवावी, असं मत, राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा जतन संस्था - इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष, मेजर जनरल एल. के. गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' आणि 'जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त', इंटक आणि कलर्स ऑफ औरंगाबाद तर्फे, 'अनसीन एलोरा', या छायाचित्रण स्पर्धेची पारितोषिकं गुप्ता यांच्या उपस्थितीत काल प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेतले विजेते छायाचित्रकार संकेत कुलकर्णी, सोमेश जगधने, हृषीकेश होशिंग, सचिन सोमवंशी, प्रवीण देशमुख आणि परिमल पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. या प्रसंगी स्पर्धेतल्या निवडक छायाचित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सकारात्मक असल्याचं, आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एका शिष्टमंडळानं महसूल मंत्र्यांची भेट घेतली. गेल्या अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती शिष्टमंडळाने विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

****

विधान भवनाच्या परिसरात काल दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. उस्मानाबाद इथले शेतकरी सुभाष देशमुख या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर सायंकाळी एका तरुणाने मंत्रालयाच्या गच्चीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुभाष देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

****

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस ‘महाविकास आघाडीचा विरोध असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाचे औरंगाबादचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केला आहे. यासंदर्भातलं प्रसिद्धीपत्रक त्यांनी काल जारी केलं. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्यांची राजकारणातली मक्तेदारी संपुष्टात येईल, या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी सरकारनं हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा आदर केला आहे, अशा शब्दांत औताडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

मुंबई इथं दहीहंडी दरम्यान मृत्यू पावलेले गोविंदा - संदेश दळवी यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्मशानभूमीत जाऊन संदेश दळवी यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. दळवी कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

****

No comments: