Thursday, 25 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी लवादाकडे पाठपुरावा करणार असून, प्रकल्पाचं काम थांबवलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यातल्या राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण तसंच संवर्धन करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत तीन वर्षांची योजना आखणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यान, विधानसभेत कुपोषणाच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुपोषणामुळे मृत्यू झाले नाही, या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या दाव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. या मुद्यावर चर्चा घेण्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं. विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २३ लाख ५० हजार ६६५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१० कोटी ८२ लाख ३४ हजार ३४७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दहा हजार ७२५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ८४ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९४ हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर नजिक असलेल्या शरीफपूर - आंबेवाडी या रस्त्याचं काम तात्काळ करण्याच्या मागणीसाठी, ग्रामस्थांनी आज जळत्या सरणावर उड्या घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बाजूला केलं. रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदनं देऊनही दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे हे आक्रमक आंदोलन करत असून, याचीही दखल सरकारनं घेतली नाही तर काही अनुचित प्रकार घडल्यास यास शासन जबाबदार राहील, असा इशारा, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव पाटील यांनी यावेळी दिला.

****

औरंगाबाद स्मार्ट सिटीने आपल्या हेरिटेज संवर्धन प्रकल्पाचा एक भाग म्हणून शहरातले सहा ऐतिहासिक दरवाजे आणि शहागंज क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी दर्शनी दिवे बसवले आहेत. या प्रकल्पात ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचा समावेश होता. औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत या वास्तूंवर रोषणाई करण्यात येत आहे. नागरिकांनी दिवाबत्ती सुरक्षित राहावी यासाठी जबाबदार रहावं, या वास्तुंचं नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचं उद्घाटन काल कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झालं. २०२२-२३ या वर्षातला प्री.पीएच.डी कोर्स २४ ऑगस्ट ते सहा ऑक्टोबर दरम्यान चालू राहणार आहे.

****

 वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवहान महावितरणनं ग्राहकांना केलं आहे. वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असं महावितरणनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. असे मेसेज आल्यास ग्राहकांनी एक नऊ एक दोन या नि:शुल्क क्रमांकावर किंवा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड - येशवंतपूर - नांदेड  आणि काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा या दोन विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या चालवणार आहे. यात, नांदेड-येशवंतपूर ही विशेष गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून येत्या ३० ऑगस्टला तर परतीच्या प्रवासात ही गाडी येशवंतपूर रेल्वे स्थानकावरून येत्या ३१ ऑगस्टला सुटेल. काचीगुडा-नगरसोल ही विशेष गाडी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून २८ ऑगस्टला, तर परतीच्या प्रवासात नगरसोल इथून येत्या २९ ऑगस्टला सुटेल. याशिवाय जालना-मालकाजगिरी-जालना डेमू गाडीला मुदतवाढ देण्यात आली असल्याचंही दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतंर्गत माजी सैनिकांची पदभरती होणार आहे. यामध्ये जड वाहन वाहतूक परवाना असलेल्या वीस अनुभवी माजी सैनिकांना, कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टर या पदाची संधी आहे. यासाठीची प्राथमिक निवड चाचणी उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नंदनवन कॉलनीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणार आहे.

****

No comments: