Friday, 4 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 04.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  04 November    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात समन्वय वाढवण्याच्या दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या सूचना.

·      राज्यात औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतल्या ‘मंथन-वेध भविष्याचा’ शिबिराला प्रारंभ.

·      पत्रकार ईशुदान गढवी आम आदमी पक्षाचे गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित.

·      मुंबईत हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याच्या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सतर्क.

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तावर तर न्युझीलंडचा आयर्लंडवर विजय.

****

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय असून तो वाढवण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. कोल्हापूर इथं आयोजित राज्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यात बेकायदेशीर लिंगनिदान, गुटखा पान मसाला विक्री याबाबत कडक निर्णय लागू करण्यात आले असून कर्नाटक राज्यातही सदर नियम लागू करावेत असं उस्मानाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितलं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सीमावर्ती भागातील वाळू उत्खनन, स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये परस्पर समन्वय आणि गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेत दिशादर्शक फलक लावावेत या निर्णयावरही या बैठकीत एकमत झालं.

****

राज्यात औद्योगिक गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प येणार असल्याचं सांगत, आगामी काळात होणाऱ्या सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात औद्योगिक धोरणात बदल झाला असून यामुळं विदेशी गुंतवणूकही वाढणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळं औरंगाबाद, ठाणे, रायगड, इथं उद्योग येतील याचबरोबर प्रवाशांच्या फायद्यासाठी आरेमध्ये कार शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यात आगामी काळात नैसर्गिक शेती मोहीम राबवण्यात येईल, यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालूक्यातल्या नंदूर इथल्या आवताडे साखर कारखाना प्रकल्पाच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्यात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळं आज ऊस कारखानदारी अस्तित्वात असल्याचं सांगत रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी गेल्या ९ वर्षात जवळपास एक हजार रुपयांनी वाढला असून आपण मुख्यमंत्री असतांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. साखर उत्पादनासोबतच इथेनॉल निर्मितीमुळे कारखानदारीला स्थिरता मिळाली असून निर्यातीबाबतचे नियम, अनुदान, कर्जाचं पुनर्वसन असे अनेक निर्णय केंद्रानं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आमदार समाधान आवताडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना उभारला असून याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना आणि कामगारांना होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत यासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या मराठी चित्रपटानं मराठीचं स्थान मोठं केलं, यासोबतचं श्यामची आई, पिंजरा यांसारख्या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय असून ही परंपरा आपण कायम ठेवू तसंच नाट्य मंदिरं उत्तम करुन ही रंगभूमी निश्चित संपन्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि सह कलाकारांचा सन्मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं मंथन-वेध भविष्याचा या शिबिराचं आज उद्घाटन झाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पक्षावर जेव्हा टीका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे, असा होतो. राज्यात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्यानं सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं टीका होत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. सत्ता असताना आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले, हे जनतेला सांगण्याची गरज आहे. ही कामं पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायला हवीत असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्तानं जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं घेण्यात येणाऱ्या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. यापूर्वी धरणगावमध्ये झालेल्या सभेत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं प्रशासनानं युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना भाषणबंदी तसंच जिल्हा बंदी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही आमदार आदित्य ठाकरे यांच्या येत्या ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड इथे नियोजित सभेला नगरपरिषदेनं परवानगी नाकारली आहे.त्यामुळे त्यांची ही सभा रद्द झाल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. शहरातील महावीर चौकात ठाकरे यांची ही सभा होणार होती. याच दिवशी शिवसेना बाळासाहेबांची पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे. दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे नगर परिषदेनं ही परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सभा रद्द झाली असली तरी ठाकरे यांचा दौरा रद्द झालेला नाही, ते बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं शिवसेनेच्या पक्ष सूत्रांनी सांगितलं.

****

आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये पत्रकार ईशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पक्षाचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. सध्या गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत.

मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वी केजरीवाल यांनी मोबाईल क्रमांक देऊन जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यानुसार गढवी यांना सर्वाधिक पसंती मिळाल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.

****

मुंबईत हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाला आल्यानंतर या परिसरातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या दूरध्वनीनंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रकल्प परीसर पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सदरील दूरध्वनी उल्हासनगरहून आला असल्याचं तपासात समोर आलं असून पोलिस दूरध्वनी करणाऱ्या इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.

****

कोविड लसीकरणावरून भेदभाव केल्यामुळं दाखल याचिके प्रकरणी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतल्या मुलुंड इथल्या कनिष्ठ न्यायालयानं समन्स जारी केलं आहे. या तिघांनाही ११ जानेवारीला प्रत्यक्ष किंवा वकिलांमार्फत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अंबर कोईरी यांनी याचिका दाखल केली होती. लस उत्पादक कंपन्यांचा फायदा करण्यासाठी सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या हेतूने हे लसीकरण सक्तीचे केल्याचा आरोप कोईरी यांनी दाखल याचिकेत केला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवरील दुभाजके तोडून जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार करणाऱ्या हॉटेल, ढाबा चालकांवर आणि व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पाचोड, करमाड इथल्या १५ व्यावसायिकांवर शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा चार धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारीत २० षटकांत आठ बाद १६८ धावा केल्या. उत्तरादाखल अफगाणिस्तानचा संघानं २० षटकांत सात बाद १६४ धावा केल्या. त्याआधी सकाळी झालेल्या अन्य एका सामन्यात न्युझीलंडनं आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव केला.

****

No comments: