Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५
नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
संयुक्त
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त
आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं
प्रितीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी अभिवादन केलं. मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, माजी मंत्री बाळासाहेब
पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश
शिंदे यावेळी उपस्थित होते.
शेती,
सहकार, शिक्षण, औद्योगिक या क्षेत्रांत अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
करत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा विकास केला, अशा शब्दात राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, यशवंतराव चव्हाण यांना ट्.विट संदेशाद्वारे
अभिवादन केलं आहे .
****
नागपूरच्या
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं
अग्रीकल्चर कन्वेशन सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर इथं आज १३व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं आज
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. अग्रीकल्चर कन्वेशन सेंटरसाठी दिडशे कोटी
रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, यासंदर्भात
आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिल्याचं
गडकरी यांनी सांगितलं. विदर्भातल्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातल्या नवीन
तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी, त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न
वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूनं हे प्रदर्शन भरवण्यात
आलं आहे.
****
आगामी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहचला
असून, सर्वच पक्षांचे नेते प्रचारसभा, रोड शो आदी माध्यमातून उमेदवारांचा जोरदार
प्रचार करत आहेत. पहिल्या टप्प्यात गुजरात विधानसभेच्या ८९ जागांसाठी येत्या एक
डिसेंबरला मतदान होणार असून, यासाठी विविध
पक्षांचे ७८८ उमेदवार निवडणूकीचा रिंगणात आहेत.
****
केंद्र
सरकारच्या महत्वाकांक्षी जल जीवन अभियानाअंतर्गत राज्यातली शंभर टक्के कामं येत्या
दोन वर्षात पूर्ण होतील आणि राज्याच्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात नळाद्वारे
स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वास, केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया
उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यात शिरुर
लोकसभा मतदार संघाचा दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात कांदा आणि बटाट्याचं पीक मोठ्या प्रमाणावर येतं, हे
लक्षात घेऊन त्यावरील प्रक्रिया उद्योग पुणे जिल्ह्यात सुरु व्हावेत अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली.
****
जी-20
राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३
आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर
विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी अस्तिक
कुमार पाण्डेय यांनी काल आढावा घेतला. जगभरातले सुमारे ५०० प्रतिनिधी औरंगाबाद इथं
येणार असून, त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
****
उस्मानाबाद
इथं उद्या भारतीय संविधान दिनाच्या औचित्यानं मतदार जनजागरण समिती आणि संविधान
जनजागरण समितीच्या वतीनं, संविधान जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे. बार्शी नाका
जिजाऊ चौक इथं जिल्हाधिकारी सचीन ओम्बासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रॅलीला
सुरुवात होईल.
****
राज्य
शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित ग्रंथोत्सव २०२२ चं
उद्या ज्येष्ठ साहित्यिक आणि समिक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यानिमित्तानं उद्या सकाळी नऊ वाजता क्रांती चौक इथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार
आहे. शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात आयोजित या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन,
विक्री तसंच विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
कतार इथं
सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने होणार आहेत. भारतीय
वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता वेल्स आणि इराण, संध्याकाळी साडे सहा वाजता कतार
आणि सेनेगल, तर रात्री साडे नऊ वाजता नेदरलँड आणि इक्वेडोर यांच्यात सामना होणार
आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना
ऑकलंड इथं सुरु असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या तीन बाद ११२
धावा झाल्या होत्या. उमरान मलिकनं दोन, तर शार्दुल ठाकुरनं एक गडी बाद केला.
तत्पूर्वी भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सात बाद ३०६ धावा केल्या.
****
No comments:
Post a Comment