Sunday, 27 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

·      मराठवाड्यात संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा

·      शेतकऱ्यांचं वीज बील माफ करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार-खासदारांसह घेतलं गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचं दर्शन

·      ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीसाठी सरासरी ४४ टक्के मतदान

·      एमजीएम विद्यापीठाचा आज पहिला दीक्षांत समारंभ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद डि लिट पदवी प्रदान करणार

आणि

·      न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी

 

सविस्तर बातम्या

न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया कमी खर्चात उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. संविधान दिनानिमित्त काल नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचा राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मुलभूत अधिकारांवर काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. न्यायपालिकेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या आवश्यकेतवरही त्यांनी भर दिला. स्थानिक भाषेत कामकाज चालवणाऱ्या आणि अशा कामकाजातून महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसामान्यांसाठी सुलभ करणाऱ्या न्यायालयांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही समारोप सत्रात उपस्थितांना संबोधित केलं. भारत हा अशा देशांपैकी एक आहे, ज्याचं संविधान त्याच देशाच्या नागरिकांनी लिहिलं असल्याचं, सरन्यायाधीशांनी सांगितलं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी केलेल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयात ७० हजार तर उच्च न्यायालयांमध्ये ७० लाख प्रकरणं प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधलं.

दरम्यान, काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. संविधानाच्या प्रस्तावनेतली 'आम्ही लोक' ही संकल्पना, वचनबद्धता, प्रतिज्ञा आणि विश्वास आहे, त्यामुळेच भारत हा लोकशाहीची जननी झाल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांनी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ई - न्यायालय प्रकल्पातल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल. आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेचा हा ९५ वा भाग आहे.

****

संविधान दिनाचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ केला. या पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचं आयोजन करण्याचा मानस असल्याचं फडणवीस म्हणाले.

नागपूर इथंही डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा काल शुभारंभ झाला. नागपूर शहरातली दीक्षाभूमी, चिंचोली इथलं शांतीवन, कामठी इथला ड्रॅगन पॅलेस, तसंच कामठी परिसरातलं नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिझम या चार ठिकाणांचा यात समावेश आहे.

****

मराठवाड्यात संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथल्या संत जर्नादन स्वामी महाराज आश्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संविधान पूजन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल पक्ष कार्यालयात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.

जालना इथं समाजकल्याण विभागाच्यावतीनं शहरातून संविधान फेरी काढण्यात आली.

परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानातून संविधान फेरी काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. हिंगोली इथंही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.

नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान फेरी काढण्यात आली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

उस्मानाबाद इथं संविधान जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागरण फेरी काढण्यात आली. या फेरीत शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता. या फेरीचं विविध संस्था, संघटना, तसंच पक्षांच्या वतीनं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.

बीड इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत संविधान फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

****

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त काल या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट संदेशातून अभिवादन करत, आपलं कर्तव्य बजावताना पराक्रमाची शर्थ करणाऱ्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना संपूर्ण राष्ट्र आदरांजली वाहत असल्याचं म्हटलं आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.

औरंगाबाद इथं काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ वाळूज पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी रक्तदान केलं.

****

हुतात्म्यांना अभिवादन करताना, पादत्राणं न काढल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला, असं म्हणणं हे द्वेष पूर्ण आणि खोडसाळपणाचं आहे, असं राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. काल २६/११ च्या हुतात्म्यांना अभिवादनासाठी राज्यपाल मुंबईत पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले असता, या ठिकाणी पादत्राणं काढणं आवश्यक नसल्याचं, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते, असंही या पत्रात म्हटलं आहे. कालच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव तसंच इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केलं, याकडेही या पत्रातून लक्ष वेधलं आहे.

****


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं शेतकरी मेळावा घेतला. महाराष्ट्रातले सर्व उद्योगधंदे गुजरातकडे वळवून राज्यात बेरोजगारी वाढवण्याचं भाजपाचं धोरण असल्याचं ठाकरे म्हणाले. वीजबिलाबाबत मध्यप्रदेश पॅटर्न राबवण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसतांना केली होती, आता त्यांनी शेतकऱ्यांचं वीज बील माफ करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यपालांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचाही निषेध करत ठाकरे यांनी, राज्यपालांना परत पाठवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. २६/११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुवाहाटीत, आपल्या समर्थक आमदार-खासदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. आज मुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदार मुंबईत परत येणार आहेत.

बाळासाहेबांच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचं, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काल नाशिक इथं कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले असता, ते वार्ताहरांशी बोलत होते. कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने आपण गुवाहाटीला गेलो नाही, असा खुलासा सत्तार यांनी केला.

****

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीला कालपासून गडचिरोली इथं सुरुवात झाली. या बैठकीत काल शेती, महिला, गायरान जमिनी आणि ५ च्या अनुसूचीसंदर्भातील महत्त्वाचे पाच ठराव संमत करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, श्यामसुंदर शिंदे तसंच पुरोगामी महिला संघटनेच्या अध्यक्ष आशा शिंदे यांच्यासह राज्याच्या विविध भागातील दीडशेहून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.

****

मुंबईसह राज्याच्या काही भागात गोवर आजाराच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्या बालकांचं गोवर प्रतिबंधक लसीकरण झालेलं नाही त्यांना संक्रमणाचा धोका वाढतो, असं राज्याचे दक्षता अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं. गोवर आजाराने संक्रमित झालेल्या एका व्यक्तीमुळे १२ ते १५ जणांना संसर्ग होण्याची शक्यता असते, लसीकरण झालेल्या बालकांना गोवराचा संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता कमी असते, असं डॉ आवटे यांनी सांगितलं.

****

औरंगाबादमध्ये आतापर्यंत दोन मुलांना गोवरची लागण झाली असून, आठ संशयित बालकं आढळून आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात गोवर संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. कोविड काळात लसीकरणातून सुटलेला भाग आणि जास्त संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या भागात आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त २० लसीकरण सत्रांचं नियोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये गोवर रुग्णांच्या उपचारासाठी विशेष विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, मात्र अंतर्गत अवयव निकामी झाल्यानं, काल त्यांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दुर्गाबाई कामत, कमला गोखले, चंद्रकांत गोखले असा पणजी, आजी आणि वडलांकडून आलेला अभिनयाचा वारसा पुढे नेणारे विक्रम गोखले यांनी कथा या मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. देखणे अभिनेते अशी ओळख असलेल्या विक्रम गोखले यांनी सुमारे पाच दशकांच्या कारकिर्दीत रंगभूमी, हिंदी-मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या.

कमला, बॅरिस्टर, नकळत सारे घडले, संकेत मिलनाचा, सरगम, आदी मराठी नाटकं, बाळा गाऊ कशी अंगाई, महानंदा, ज्योतिबाचा नवस, वजीर, कळत नकळत, दे दणादण, माहेरची साडी, नटसम्राट आदी मराठी तर थोडासा रुमानी हो जाये, खुदा गवाह, अकेला, अग्निपथ, हम दिल दे चुके सनम, हे राम, भुलभुलैया आदी हिंदी चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील उडान, अकबर बिरबल, जीवनसाथी, सिंहासन, या सुखांनो या, अग्निहोत्र, आदी मालिकांमधून साकारलेल्या विविध भूमिकाही प्रेक्षकांचा स्मरणात आहेत. गोखले यांना २०१३ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार, बलराज साहनी पुरस्कार, पुलोत्सव सन्मान तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही गोखले यांना गौरवण्यात आलं होतं.

गोखले यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्रम गोखले यांच्या निधनानं अभिनय क्षेत्रासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली, वैविध्यपूर्ण भूमिका करणारे गोखले यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, तर गोखले यांच्या निधनानं अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, या शब्दांत फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. औरंगाबाद इथले ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळंबकर यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करताना, रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी असा तिहेरी प्रवास आपल्या अभिनयाच्या बळावर यशस्वी करणारा अभिनयसम्राट पुन्हा होणे नाही, असं म्हटलं आहे.

****

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथोत्सवाला काल सकाळी ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला. ही ग्रंथ दिंडी क्रांतीचौक इथून सुरू झाली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे संविधान असलेली पालखी घेऊन या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते. शहरातल्या विविध शाळांमधले विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्‌घाटन झालं. वाचनामुळे समाज सुसंस्कृत होतो आणि अभिरुची संपन्न माणसं निर्माण होत असल्याचं मत त्यांनी  यावेळी व्यक्त केलं. “वाचक बहुसंख्य पर्यायात हरवत चालला आहे या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत याकार्यक्रमात परिसंवाद झाला.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीसाठी काल सरासरी ४४ टक्के मतदान झालं. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात ८३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं.

****

औरंगाबाद मधल्या महात्मा गांधी मिशन - एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ आज होणार आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद ड लिट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना हॅमिल्टन इथं सुरु झाला आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मालिकेतला पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments: