आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
इतर
मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी
ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
आहे. गेल्या १७ तारखेला यावर सुनावणी अपेक्षित होती, मात्र त्यादिवशी आजची तारीख निश्चित
करण्यात आली होती.
****
स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ३०० मेगावॅट क्षमतेचे स्मॉल मॉड्युलर
रिॲक्टर्स म्हणजेच छोटे छोटे अनेक भाग एकत्रित साधून तयार केलेल्या अणुभट्ट्या विकसित
करण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरु आहे, असं केंद्रीय
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे. निती आयोग
आणि अणुऊर्जा विभागातर्फे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते
काल बोलत होते. हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यासाठी,
खाजगी क्षेत्र आणि स्टार्ट-अप्सचा सहभाग आवश्यक आहे. असं ते म्हणाले.
****
नौदल सप्ताह २०२२ च्या निमित्तानं मुंबईतल्या
नौदलाच्या पश्चिम विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमांर्तगत २० शाळांमधल्या चार हजार विद्यार्थ्यांनी नौदलाच्या जहाजांना भेट दिली.
भारतीय नौदलाच्या कार्याची ओळख यावेळी विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. नौदलानं केलेल्या
विविध मोहिमा आणि सागरी जीवनावर भाष्य करणारा चित्रपटही यावेळी दाखवण्यात आला.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा एक भाग कोसळून
झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर १२ प्रवासी जखमी झाले. काल सायंकाळी ही घटना
घडली. यावेळी गर्दी नसल्यानं आणि रेल्वे आलेली नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले
आहेत.
****
नक्षलवादी असल्याचं सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपये खंडणी वसूल करण्याचा
प्रयत्न करणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण
नक्षल समर्थक असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या ताब्यातून
भरमार प्रकारच्या बंदुका, नक्षली गणवेश तसंच अन्य साहित्य ताब्यात
घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
//**********//
No comments:
Post a Comment