Sunday, 27 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

जी - ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली असून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं, ही बाब अधिकच खास झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जी - ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक आणि अभिमान बाळगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय असून, आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात असल्याचं ते म्हणाले. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचं सांगुन पंतप्रधानांनी, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. विविध देशांमध्ये भारतीय संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून यावेळी विषद केली.

भारत देश जगातल्या सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात सध्या शिक्षणाचं क्षेत्र उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशचे जतिन ललितसिंह आणि झारखंडचे संजय कश्यप या दोन शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.

आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 

****

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसि हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींची प्रजासत्ताक दिनाच्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्तमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला 'अतिथी देश' म्हणून आमंत्रित करण्यात आलं असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.

****

स्पेन मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह एकूण ११ पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरेश विश्वनाथ, वंशराज, देविका घोरपडे आणि रविना यांनी सुवर्ण पदक जिंकलं. भावना शर्मा, कीर्ति आणि आशिष यांनी रौप्य, तर तमन्ना, कुंजरानी देवी, लशु यादव आणि मुस्कान यांनी कांस्य पदक जिंकलं.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता जपान विरुद्ध कोस्टारिका, संध्याकाळी साडे सहा वाजता बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, रात्री साडे नऊ वाजता क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, तर रात्री साडे बारा वाजता स्पेन विरुद्ध जर्मनी हे सामने होणार आहेत.

काल या स्पर्धेत अर्जेंटिनानं मेक्सिकोचा दोन - शून्य असा, तर फ्रान्सने डेन्मार्कचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा एक - शून्य असा, तर पोलंडनं सौदी अरेबियाचा दोन - शून्य असा पराभव केला.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र पाऊस सुरुच राहील्यानं सामना रद्द करण्यात आला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments: