Tuesday, 29 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  29 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      नाकातून घेण्याची कोविड प्रतिबंधक लस ‘इनोवॅक’ ला औषध महानियंत्रकांची कोविड बूस्टर डोस म्हणून मान्यता.

·      प्रधानमंत्री आवासअंतर्गत घरकुल दस्तनोंदणीसाठी आता एक हजार रुपये मुद्रांक शुल्क; सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी ४५२ कोटी रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर उत्कर्ष पॅनलचे पाच उमेदवार विजयी.

आणि

·      सतत खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या निषेधात हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आंदोलन.

****

भारतात निर्माण करण्यात आलेली नाकातून घेण्याची कोविड प्रतिबंधक लस ‘इनोवॅक’ ला भारतीय औषध महानियंत्रकांनी कोविड बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. डॉक्टर राजेश गोखले यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागानं ही लस तयार केली आहे.

****

महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडोनेशियातल्या सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला रायगड जिल्ह्यातील धेरंड इथं २८७ हेक्टर जमिनीचं वाटप पत्र प्रदान करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या दस्तनोंदणीसाठी राज्यात आता फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले –

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जेवढ्या काही वेगवेगळ्या स्कीम्स चालतात, याच्या दस्त नोंदणीकरता रेडीरेकनर प्रमाणे पैसे द्यावे लागत होते, आता ही सगळी दस्त नोंदणी केवळ एक हजार रूपयात करायचा निर्णय आम्ही केलेला आहे. गायरान जमिनीच्या वरच्या अतिक्रमणाच्या संदर्भात त्याच्यावर ज्या लोकांची घरं आहेत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ट्रान्सफॉर्मरवर एकाही व्यक्तीने वीजबिल भरलं असेल तरी देखील त्याचे वीज कट करण्यात येऊ नयेत, सिंगत बिल जो भरेल त्याला वीज पुरवठा नियमित दिला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही जी काही सरसकट कृषी पंप कापण्याची मोहीम आहे, ती मोहीम कुठेही हाती घेण्यात येणार नाही.

 

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी रुपये देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. आदिवासी प्रवर्गातली रिक्त पदं एका महिन्याच्या आत भरण्याचे निर्देश दिल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग मुख्यमंत्र्यांनी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तीन डिसेंबरला त्याची फॉर्मल घोषणा माननीय मुख्यमंत्री करतील. ९५ ते २००३ या कालावधीतील एस.टी.चं सर्टीफिकेट रद्द झालं म्हणून २०१९ साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आलं होतं, अशा सगळ्या लोकांना अधिसंख्य पदावर कंटीन्यू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यासोबत त्यांना निवृत्तीवेतन वगैरे जे काही बेनिफीटस्‌ आहेत, ते बेनिफिटस्‌ देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. जी काही आदिवासीची एस टी पदं रिकामी झालेली आहेत, एक महिन्याच्या आत याची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील आज दिलेले आहेत. यासोबत सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग फास्ट ट्रॅकवर आणण्याकरता राज्य सरकारने चारशे बावन कोटी रूपये आर्थिक सहकार्य देण्याचं मान्य केलेलं आहे.

****

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुंबईत आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन पीक विम्यासंदर्भात जाब विचारला. एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबतही दानवे यांनी काल बैठक घेऊन पीक विम्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

****

मुंबईतल्या आरे कॉलनीमधे मेट्रो कार शेड उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ला या प्रकल्पासाठी ८४ झाडं कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राधिकरणची परवानगी घेण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. या अर्जावर वृ्‌क्ष प्राधिकरण योग्य त्या अटींसह निर्णय घेईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी ९ डिसेंबरपर्यंत दोन्ही पक्षांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ८ ऑक्टोबरला गोठवलं होतं. त्यानंतर आता या संदर्भातील अंतिम निर्णय बाकी आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटाच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या पॅनलचे अनुसूचित जाती प्रवर्गातून सुनील मगरे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून दत्तात्रय भांगे, इतर मागास प्रवर्गातून सुभाष राउत, महिला प्रवर्गातून पूनम पाटील तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून सुनील निकम निवडून आले आहेत.

****

आज चंपाषष्ठी, खंडोबाच्या षड्रात्रोत्सवाची आज सांगता होत आहे. औरंगाबादनजीकच्या सातारा इथल्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. भंडारा आणि रेवड्या उधळत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात शेकडो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं.

****

औरंगाबाद पुणे महामार्गावर आज सकाळी एस टी बस आणि ऊसतोडीसाठी जाणाऱ्या बैलगाडीच्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. या अपघातात एक बैल ही दगावला असून, बैलगाडीचा चुराडा झाला.

****

सतत खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या निषेधात हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आज आंदोलन केलं. उच्च दाबाची वाहिनी जात असलेल्या मनोऱ्यावर चढून शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. महावितरणचे शाखा अभियंता आणि उपअभियंता यांना सुरेजखेडा इथल्या महिलांनी घेरावा घातला. शालेय विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारं हे अभियान येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येईल. पाण्याची तपासणी कशी करावी याबाबत या अभियानात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी येत्या १ तारखेला नांदेड इथे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा, असं आवाहन समाज कल्याणच विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर-आष्टी मार्गावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं आज गुटख्याचा साठा पकडला. बीड जिल्ह्यातल्या माजलगावहून आलेल्या या वाहनातून सुमारे ११ लाख ६६ हजारांचा गुटख्याची वाहतुक केली जात होती, या कारवाईत पोलिसांनी परतूर इथल्या दोघांना ताब्यात घेतलं असून गुटखा आणि वाहन असा एकूण १९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

****

आगामी काळात औरंगाबाद शहरात होणाऱ्या जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी मुख्य रस्त्यांची पाहणी केली. या मार्गांवरील वाहतूक बेट सौंदर्यकरण करण्यासह विविध सूचना डॉक्टर चौधरी यांनी यावेळी केल्या.

****

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. यावर्षीचं घोषवाक्य “आपली एकता आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्या करिता” हे आहे. बीड इथं या औचित्यानं १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कुटीर रुग्णालय या ठिकाणी जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात येतील.

****

No comments: