Saturday, 26 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संविधानाच्या प्रस्तावनेतली 'आम्ही लोक' ही संकल्पना, वचनबद्धता, प्रतिज्ञा आणि विश्वास आहे, ज्याने भारताला लोकशाहीची जननी बनवलं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात आज संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या राज्यघटनेचा आत्मा युवाकेंद्रीत असून, ती खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांनी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. इ - न्यायालय प्रकल्पातल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं.

****

संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानातून संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.

****

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आज १४ वा स्मृतिदिन. दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरजवान, पोलीस अधिकारी, आणि मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

आपलं कर्तव्य बजावताना पराक्रमाची शर्थ करणाऱ्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आज संपूर्ण राष्ट्र आदरांजली वाहत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया इथं दहशतवाद्यांशी सामना करताना जखमी झालेल्या पोलिसांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते.

****

मुंबईत गोवरच्या बाधितांची संख्या वाढत आहे. काल दिवसभरात आठ नवीन रुग्णांची नोंद झाली झाल्यानंतर गोवर बाधितांची संख्या २६० वर पोहोचली आहे. गोवरमुळे आतापर्यंत १३ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात २०२१ मधल्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीनं शेतकर्यांना कमी नुकसान भरपाई दिल्याबद्दल, सिटी बँकेनं या कंपनीची सर्व खाती गोठवली आहेत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या तीन लाख ६५ हजार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतल्या पिकांची संरक्षित रक्कम म्हणून ७४८ कोटी रुपये मिळणं अपेक्षित असताना, या कंपनीने फक्त ३७४ कोटी ३४ लाख इतकी रक्कम अदा केली. उर्वरित रक्कम प्राप्त होणं बाकी असल्यानं जिल्हाधिकार्यांनी जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत या कंपनीला पंधरा दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊनही, अद्यापपर्यंत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे या कंपनीची सिटी बँकेतली सर्व खाती गोठवण्यात यावी, तसंच ३७४ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

****

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथोत्सवाला ग्रंथ दिंडीपासून आज सकाळी प्रारंभ झाला. ही ग्रंथ दिंडी क्रांतीचौक इथून सुरू झाली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे संविधान असलेली पालखी घेऊन या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते.  शहरातल्या विविध शाळांमधले विद्यार्थी ग्रंथदिडीत सहभागी झाले होते.

****

औरंगाबाद इथल्या सांस्कृतिक कार्यक्रम करणार्या जानकी ग्रुपचा काल कायगाव टोकाजवळ भीषण अपघात झाला. ग्रुपमधल्या माधुरी मुकुंद यांचा या अपघाताचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य कलाकार जखमी झाले. चुकीच्या बाजुने येणार्या जेसीबीची या कलाकारांच्या क्रुझरशी धडक झाल्यानं हा अपघात झाल्याचं, जानकी ग्रूपच्या ज्योत्स्ना पुजारी यांनी सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात असून औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात ८३ मतदान केंद्रांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

****

नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ५०० पात्र स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड केली जाणार असून, त्यांना १२ दिवसांचं निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या हॅमिल्टन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

1 comment:

Corewave said...

Outsourcing mobile application development in Dubai, or outsourcing custom app development in Dubai along with outsourcing mobile application services, is a booming business in the region. As the emirate heavily promotes innovation and the use of technologies, particularly in connection with mobile applications, the city has turned into an attractive target for organizations dreaming of utilizing the potential of the resource. From a basic application that will suit a small business to a large-scale enterprise application, there are skilled app developers in Dubai who will help create the application of your dreams. contact us right now! Call Us: 98106 76072, Website: https://corewave.io/city/mobile-app-development-dubai

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...