Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
November 2022
Time 18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
महात्मा ज्योतिबा फुले यांना १३२ व्या स्मृतिदिनी राज्यभरात
विविध कार्यक्रमातून अभिवादन.
·
बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातलं हत्यार दिल्ली पोलिसांकडून
हस्तगत.
·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात
- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार.
आणि
·
औरंगाबाद शहरात विद्युत खांबांवरच्या अनधिकृत केबल काढण्याच्या
मोहिमेला उद्यापासून सुरवात.
****
महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांतून त्यांना
अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ज्योतिबा
फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. ही तैलचित्रं आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी
रेखाटली आहेत.
औरंगाबाद
इथं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला सहकार मंत्री अतुल सावे आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष
शिरीष बोराळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या
वतीनंही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.
अहमदनगर
जिल्ह्यातही ठिकठिकाणी फुले यांना अभिवादन करण्यात आलं. विविध शैक्षणिक संस्था, शासकीय,
सहकारी तसंच सामाजिक संस्था, सेवाभावी मंडळं यांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं
पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
****
बहुचर्चित
श्रद्धा वालकर हत्याकांडातलं हत्यार दिल्ली पोलिसांनी हस्तगत केलं आहे. हे हत्यार न्यायवैद्यक
प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. आरोपी आफताब पुनावालाने याच हत्याराने
श्रद्धाचे तुकडे केल्याचा अंदाज आहे. आफताबची चौथ्या टप्प्यातली पॉलिग्राफ चाचणी झाली
असून, येत्या पाच डिसेंबरला त्याची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या श्रद्धा
वालकरची आफताबने गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून पुढच्या
तीन आठवड्यात दररोज एकेक तुकडा फेकल्याचं तपासात समोर आलं आहे. १२ नोव्हेंबरला पोलिसांनी
अटक केल्यावर सुरवातीचे नऊ दिवस पोलिस कोठडीत राहिलेल्या आफताबची सध्या न्यायालयीन
कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी एक अंगठीही हस्तगत केली आहे, ही अंगठी श्रद्धाची
असल्याचा संशय आहे.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीत देशभरातल्या प्रमुख शिल्पकारांना २०१७, २०१८ आणि २०१९
साठीच्या शिल्पगुरु आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं. शिल्पकार हे देशाच्या
सांस्कृतिक वारशाच्या व्यापक विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, या शब्दांत उपराष्ट्रपतींनी
शिल्पकारांच्या कार्याचा गौरव केला.
****
अभियंत्यांच्या
सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं राजपत्रित
अभियंता संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. शासकीय सेवेतील अभियंत्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत
निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं.
****
शीख
धर्मियांचे नववे गुरु तेग बहादूर यांचा आज बलिदान दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
यानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री गुरु तेग बहादूर
यांचं साहस, मूल्य आणि आदर्शांसाठी संपूर्ण देश त्यांना नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी
यासंदर्भातल्या आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
सातारा
जिल्ह्यातल्या प्रतापगड किल्ल्यावर परवा ३० तारखेला शिवप्रताप दिन साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. अफझल खान कबरी भोवतीचं
अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर प्रतापगड इथे होणाऱ्या या शिवप्रताप दिनासाठी राज्यभरातील
शिवभक्त येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहनतळासह अन्य सुविधा उपलब्ध करून
दिल्या जात आहेत.
****
राज्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे, असं मत विधानसभेतले
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार यांनी, अशा गोष्टींपेक्षा राज्यात
महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असल्याकडे लक्ष वेधलं. कर्नाटकातला बेळगाव, कारवार,
निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित
असल्याचं ते म्हणाले. सीमाभागातल्या लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात राज्य
सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
****
औरंगाबाद
शहरात विविध ठिकाणी विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स काढण्याच्या मोहिमेला
उद्या २९ तारखेपासून सुरवात करण्याचे आदेश औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक
डॉ अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत आज ते बोलत होते.
औरंगाबाद उच्च न्यायालयानं अशा अनधिकृत केबल्स काढण्याचे आदेश दिले आहेत. मोहिमेच्या
वेळेस आवश्यकतेप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले. ज्या व्यावसायिकांनी
अनधिकृत रित्या केबल्स टाकलेल्या आहेत त्यांनी स्वतः केबल्स काढून घेण्याचं आवाहनही
यावेळी डॉ.चौधरी यांनी केलं आहे.
****
पंढरपूर
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी सर्व पक्ष संघटनांची पंढरपूर संतभूमी
बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून
खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार समाधान आवताडे, माजी
आमदार प्रशांत परिचारक, आदी मान्यवरांचाही समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या
चर्चेत ठोस असे काही आश्वासन न मिळाल्याने सर्वपक्षीय समितीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा
इशारा दिला आहे.
दरम्यान,
मंदिर परिसरातील व्यापारी तसंच रहिवाशांनी विकास आराखड्याला विरोध करू नये, असं आवाहन
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे
लाखो भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार असल्याचं कराडकर यांनी म्हटलं आहे.
****
अक्कलकोट
तालुक्यातील अनेक गावांनी रस्त्यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा कर्नाटकात
समाविष्ट करण्याची परवानगी तरी द्या, अशी भूमिका घेतली आहे. तडवळ भागातील शेगाव, आळगी,
कल्ल कर्जाळ, दर्शनाळ, मुंढेवाडी यासह इतर गावांमधील सरपंच तसंच नागरिकांनी तडवळ इथं
बैठक घेऊन ही भूमिका व्यक्त केली. याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा
निश्चय ग्रामस्थांनी केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असूनही तडवळ भागात
रस्ते, पाणी, दळणवळणाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. वारंवार मागणी करूनही मूलभूत सुविधा
पुरवण्याकडे राज्यशासनाने सतत दुर्लक्ष केल्याची व्यथा या नागरिकांनी मांडली आहे.
****
चंद्रपूर
जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वेस्थानकातल्या पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत
मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर
शासकीय खर्चाने, योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले
आहेत.
काल
सायंकाळी कोसळलेला हा दुर्घटनाग्रस्त लोखंडी पूल ४५ वर्ष जुना असून या लोखंडी पुलाचा
मध्यभाग जीर्ण झाल्यामुळे हा अपघात घडला असं मत पाहणी दौऱ्यावर आलेल्या सर्वपक्षीय
नेत्यांनी व्यक्त केलं. या अपघाताला रेल्वे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप रेल्वे
प्रवाशी संघटना आणि नागरिकांनी केला आहे.
****
सर्वसामान्यांच्या
दृष्टीने हितकारक असलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई
खपवून घेतली जाणार नाही, असं राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
बैठकीत बोलत होते. प्रवरा नदीवरच्या या प्रकल्पातून डावा आणि उजवा कालवा प्रस्तावित
आहे, हे काम विहित वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची
त्वरित हकालपट्टी करावी अन्यथा स्वराज्य संघटना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल
असा इशारा संघटनेनं दिला आहे. संघटनेचे किरण काळे पाटील आणि विष्णू पाटील मोगल यांनी
आज, औरंगाबाद इथं निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांना या मागणीचं निवेदन
दिलं.
****
No comments:
Post a Comment