Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
समारंभपूर्वक प्रदान.
·
किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये तर गड किल्ले
संवर्धनासाठी दूर्ग प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
·
ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं
निधन.
आणि
·
तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना अनिर्णित; भारतानं मालिका गमावली
तर हॉकी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. टेबलटेनिपटू
शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ॲथलेटिक्समध्ये
आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे
याला अर्जुन पुरस्कार तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
****
किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी
२५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ३३६व्या शिवप्रताप
दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज
बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्यदैवत
आहेत, त्यांच्या विचारांनुसारच आम्ही राज्यकारभार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं
आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज
देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी
दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट
केलं. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिवप्रतापदिनानिमित्त
प्रतापगड फुलांच्या तोरणासह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ
साहित्यिक-समीक्षक, माजी कुलगुरु डॉ.नागनाथ कोत्तापल्ले याचं पुण्यात अल्पशा आजाराने
निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या वर्षी कर्करोगाचं निदान झालेले कोत्तापल्ले
यांना विषाणू संसर्ग झाल्यामुळे पंधरा दिवसांपासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात
उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान,
त्यांचं आज दुपारी निधन झालं. कोत्तापल्ले यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा
–
२९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं जन्मलेले
कोत्तापल्ले यांनी देगलूर इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवी तसंच पदव्युत्तर
पदवीत त्यांनी कुलपतींचं सुवर्णपदक पटकावलं होतं. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक
अभ्यास’ या विषयावर १९८० साली त्यांनी पीएच. डी. पदवी मिळवली. बीड इथं मराठीचे अधिव्याख्याता,
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्याता आणि प्रपाठक आणि
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिल्यावर २००५
साली ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय
प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.
राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष, मराठी अभ्यास
मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. राज्य
शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष
आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. श्रीगोंदा इथं
१९९९ साली झालेलं ग्रामीण साहित्य संमेलन तसंच २००५ साली जालना इथं झालेल्या मराठवाडा
साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण इथं २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.
कोत्तापल्ले यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.
‘मूड्स’ कृष्णमेघ हे कवितासंग्रह, ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’,
‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ आदी कथासंग्रह, ‘राजधानी’ हा दीर्घकथा
संग्रह, ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबऱ्या, ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण
साहित्य: स्वरूप आणि बोध’, अस्तित्वाची शुभ्र शिडे, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा
अन्वयार्थ’, ‘साहित्याचा अवकाश’ ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, आदी समीक्षात्मक ग्रंथ,
‘जोतीपर्व’ हे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा
असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ आदी पुस्तकांचं संपादनही कोत्तापल्ले
यांनी केलं आहे. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात
आलं आहे.
नागनाथ
कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ लेखिका वीणा
गवाणकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य, यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त
करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
माजी
मंत्री सुरेश जैन यांना घरकूल घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला
आहे. यापूर्वी जैन यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला होता, मात्र
आता न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
****
माजी
मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. काळा पैसा वैध करण्यास
प्रतिबंध करणाऱ्या पीएमएलए न्यायालयात मलिक यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत
सक्तवसुली संचालनालय-ईडीने त्यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला. ईडीपूर्वी आपल्याविरोधात
कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं, मलिक यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं, मात्र
न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
****
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या
सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी
सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातील ११ दोषींना २० वर्षांच्या कारावासानंतर
गुजरात सरकारने १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुक्त केलं होतं. बिल्किस बानो सर्वोच्च न्यायालयात
पुनर्विलोकन याचिका यांनी दाखल केली आहे.
****
मंदिरांच्या
जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान
मंदिरांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी
नियुक्त विशेष तपास पथकाने आपला अहवाल दिल्यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्याने, मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती, खंडपीठाने धस यांच्याविरोधात
गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्याला धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं
होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानं, धस आणि त्यांच्या
पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात आठ मंदिरांची जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गुन्हा
नोंदवण्यात आला.
****
भारत
आणि न्यूझीलंडदरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका न्यूझीलंडने एक शून्यने जिंकली
आहे. मालिकेत आजचा तिसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारतानं प्रथम फलंदाजी
करत, सर्वबाद २१९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने १८ षटकांत एक बाद १०४ धावा केलेल्या
असताना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही.
दरम्यान,
भारतीय क्रिकेट संघ या आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपासून बांगलादेशसोबत
तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका तर १४ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका
खेळवली जाणार आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच हॉकी सामन्यांच्या मालिकेत भारताने आज
ऑस्ट्रेलियाचा चार -तीन असा पराभव केला. भारताकडून मनप्रितसिंग, अभिषेक, समशेरसिंग,
आणि अक्षयदीपसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. मालिकेत पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलिया
दोन एकने आघाडीवर आहे. चौथा सामना तीन तारखेला तर पाचवा सामना चार तारखेला होणार आहे.
२०२३ च्या जानेवारी महिन्यात ओडिशात होणाऱ्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर
दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
****
अंबाजोगाई
इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला.
आज सकाळी १० वाजता वर्णी महापूजा झाली, पुढचे आठ दिवस कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम
मंदिरात राबवले जाणार असून, सात डिसेंबरला होम-हवन आणि महापूजेने नवरात्रोत्सवाची सांगता
होईल. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था
देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
शहरातील रिक्षा चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
****
No comments:
Post a Comment