Monday, 28 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमास माजी मंत्री, आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, चित्रकार राजेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला भाजप नेते सहकार ंत्री अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या वतीनंही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, सत्यशोधक ओबीसी महासंघ आणि बारा बलुतेदार महासंघाच्या वतीनं, आज संध्याकाळी पाच वाजता औरंगाबाद मध्ये विद्यापीठ परिसरातल्या नागसेनवन इथं, प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार यांनी, अशा गोष्टींपेक्षा राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असल्याकडे लक्ष वेधलं. कर्नाटकातला बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून असल्याचं ते म्हणाले. सीमाभागातल्या लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात राज्य सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

****

मध्य प्रदेश सरकारनं कोरोना काळात शेतकर्यांना वीज बिल माफ केलं होतं, त्याप्रमाणे राज्यातही करण्याची मागणी आपण केली होती, वीज बिल माफ करु असं आपण कधीच म्हटलं नव्हतं, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वीज बिलाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना एका पैशाची देखील सूट दिली नाही, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, असं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच विमा कंपन्यांना जास्त फायदा झाला, अशी टीका त्यांनी केली.

****

कर्नाटक - महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही मंत्री तीन डिसेंबरला कर्नाटकातल्या बेळगावीला भेट देणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. गोव्यात पणजीजवळ डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडा संकुलावर आज सायंकाळी हा समारोह होणार आहे. सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी यांना या वर्षीचा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. या समारोप समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता - पुरुष आणि महिला आणि विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

राज्यात गोवराचे ६२ रुग्ण आढळून आले आहेत, तर मुंबई महानगर क्षेत्रात गोवराची ६५८ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. मुंबई परिसरात आत्तापर्यंत या आजाराचे तीन हजार ९४७ संशयित रुग्ण आढळले असून यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवर प्रतिबंधासाठी पालकांनी आपल्या मुलांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातल्या मतमोजणीला विद्यापीठाच्या क्रीडा विभागात आज सकाळी सुरुवात झाली. पदवीधर अधिसभा गटातल्या दहा जागांसाठी परवा ५० पूर्णांक ७५ टक्के मतदान झालं होतं.

****

केरळ मध्ये सबरीमला इथल्या जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड विभागातून नांदेड, औरंगाबाद आणि आदिलाबाद इथून कोल्लम करता विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यात पुढच्या महिन्यात चार गाड्या नांदेडहून तर एक गाडी औरंगाबादहून सोडण्यात येणार आहे.

****

आशियाई अजिंक्यपद विजेती मुष्टीयुद्धपटू रविनाने स्पेनमधे सुरु असलेल्या जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. ६३ किलो वजनी गटात, नेदरलँड्सच्या मेगन डिक्लेरचा तिने चार - तीन असा पराभव केला. ८१ किलो वजनी गटात कीर्तीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

धावपटू पी टी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. येत्या दहा डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी ती अध्यक्ष पदाची एकमेव उमेदवार आहे.

//************//

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...