Monday, 28 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      जी-20 परिषदेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन

·      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका नैराश्येतून- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      इतर मागासवर्ग आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

·      राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक करणं थांबवावं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आवाहन

·      पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी

·      मराठवाडा साहित्य परिषदेचं ४२वं साहित्य संमेलन १० आणि ११ डिसेंबरला जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं होणार

·      परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

·      औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीची आज मतमोजणी  

आणि

·      भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द

****

सविस्तर बातम्या

तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 परिषदेमध्ये सामील व्हावं, शाळा, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून बोलत होते. या कार्यक्रमाचा ९५वा भाग काल प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताची आवड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत आहे, आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित ठेवणं, त्याचं संवर्धन करणं आणि जितकं शक्य असेल तितका त्याचा प्रसार करणं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य जाणून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ -२४ साठी सरकारनं लोकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत या सूचना पाठवता येतील. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सहभागपूर्ण आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तसंच लोकसहभागाच्या भावनेला चालना देण्यासाठी, अर्थमंत्रालय दरवर्षी नागरिकांकडून सूचना मागवतं. सर्वसमावेशक वाढीसह भारताला जागतिक स्तरावरच्या आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात मदत करू शकतील अशा आपल्या कल्पना आणि सूचना लोकांनी मांडाव्या असं आवाहन अर्थमंत्रालयानं केलं आहे.

****

देशातल्या रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत गव्हाचं क्षेत्र १४ लाख हेक्टरनं वाढलं आहे. गेल्या चार वर्षातलं हे लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. मातीची आर्द्रता, पाणीसाठ्यांचं योग्य नियोजन, देशभरात खतांची उपलब्धता यामुळे येत्या काही दिवसांत रब्बी पिकांच्या क्षेत्राची व्याप्ती आणखी वाढेल, असा विश्वासही तोमर यांनी व्यक्त केला.

****

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नैराश्येतून टीका करत असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल गुवाहाटी दौऱ्यावरुन परत आल्यावर मुंबई विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. आमच्या सरकारबद्दल लोकांचं मत चांगलं असल्यामुळे ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते काहीही वक्तव्य करत असल्याचं शिंदे म्हणाले. 

दरम्यान, गुवाहाटी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी, आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या १७ तारखेला यावर सुनावणी अपेक्षित होती, मात्र त्यादिवशी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.

****

इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल गडचिरोली इथं जाहीर सभेत ते बोलत होते. पेसा कायद्यामुळे आदिवासींना संरक्षण मिळालं आहे, मात्र ओबीसींवर वारंवार अन्याय केला जात आहे. त्याकडे केंद्र आणि राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचं पाटील म्हणाले.

****

राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक थांबवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत, सावरकरांनी धोरणाचा भाग म्हणून इंग्रजांकडे दयेचा अर्ज केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 

Byte…..

५० वर्षांची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसल्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो, आणि बाहेर आल्यावर पुन्हा हंगामा करतो, हे डोक्यात सगळं ज्याच्या चालु असेल, त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात स्ट्रॅटेजी. आमच्या शिवरायांनी ज्यावेळी मिर्झाराजे जयसिंगांना गडकिल्ले दिले, त्यावेळी परीस्थिती अशी होती, गडकिल्ले लिहून द्यायचे आहेत ना, चला लिहून देतो. परिस्थिती निवळली परत घेऊ की हातात. ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना, तो गुळगुळीत मेंदुचा. पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्या देशात कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. ज्यांनी स्वातंत्रासाठी लढा दिला, जे महापुरूष महणून बोलले गेले, त्यांची बदनामी करून आता काय होणार आहे. या देशात समोर जे प्रश्न उभे आहेत, उद्योगधंद्यांचे प्रश्न उभे आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत, आरोग्याचे प्रश्न उभे आहेत. या देशातल्या सुरक्षिततेचे प्रश्न उभे आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टी गांभीर्याने न घेता आम्ही काय करतोय आम्ही ऐकमेकांची बदनामी करतोय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानांवर राज ठाकरे यांनी टीका केली. राज्याच्या राजकारणातली भाषा अत्यंत घसरल्याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी अशा प्रकारांवर कडाडून टीका केली. देशातलं प्रत्येक राज्य प्रगत झालं, तर देश प्रगत होतो, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याकडे विशेषत: मागास राज्यांकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

****

राज्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या शेवटच्या दिवसांत ऑनलाईन अर्ज करताना विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावं लागत आहे. या अडचणी तत्काळ दूर करण्याची मागणी मुंडे यांनी केली. भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी यामुळे अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. यामुळे ही मागणी केल्याचं मुंडे यांनी केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. गोव्यात पणजीजवळ डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडा संकुलावर आज सायंकाळी हा समारोह होणार आहे. सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी यांना या वर्षीचा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. या समारोप समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता - पुरुष आणि महिला आणि विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

मराठवाड्यातलं पहिलं स्वयंअर्थसहाय्यित अभिमत विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ काल औरंगाबाद इथं झाला. या सोहळ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री मधुकर साठे यांनी ही पदवी स्वीकारली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसंच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, नियामक मंडळाचे सदस्य कमलकिशोर कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी ५३४ विद्यार्थ्यांनाही या वेळी पदवी प्रदान करण्यात आली. नऊ विद्यार्थ्यांचा 'चान्सलर्स गोल्ड मेडल' देऊन गौरवण्यात आलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचं ४२वं साहित्य संमेलन १० आणि ११ डिसेंबरला जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं होणार असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे हे असतील, असं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाच्या समारोप सत्राला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

****

प्रगतीशील लेखक संघाच्या वतीनं औरंगाबाद इथं तीन आणि चार डिसेंबरला ११वं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.सुधाकर शेंडगे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ.सूर्यभान रणसुभे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ शायर, गीतकार तथा पत्रकार हसन कमाल यांच्या हस्ते होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते काल सकाळी या शिबिराचं उद्घाटन झालं. या महाआरोग्य शिबिरात दोन दिवसात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, चाचण्या आवश्यकतेनुसार औषधोपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारावर पुढील उपचार सुरू होणार आहेत. काही गंभीर आजार आढळून आले तर त्या रुग्यांवर मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केल्याने शिबिरास न भुतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल प्रख्यात साहित्यिक, माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शैक्षणिक संस्थाकडून शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची गरज आहे, हे काम यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्भर केलं, देशाला आज त्यांच्या विचारांची खरी गरज असल्याचं मत, कांडगे यांनी यावेळी व्यक्त केलं.

यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पंजाबराव देशमुख, साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी इंदुमती जोंधळे, संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी सूरमणी बाबुराव बोरगांवकर तर प्रदीप जोगदंड तसंच रजनी वर्मा यांना शिल्पकलेसाठी युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली इथले रजनीश आणि रितेश राजन मिश्रा यांचं तसंच लातूरच्या सरस्वती बोरगांवकर यांच्या संगीत सभेने समारोहाचा समारोप झाला.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा विभागातल्या बॅडमिंटन सभागृहात आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. परवा या निवडणुकीसाठी सुमारे ५१ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात होते.

दरम्यान, अधिसभेच्या २९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गटातून १० डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. या टप्प्यात चार गटात ७३ उमेदवार रिंगणात असून, मतमोजणी १३ डिसेंबरला होणार आहे .

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला कालचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, त्यानंतर केवळ २९ षटकांचाच सामना खेळवण्याचा निर्णय झाला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार शिखर धवन तीन धावांवर बाद झाला. १२ षटकं आणि ५ चेंडूत भारतीय फलंदाजांनी १ बाद ८९ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा शुभमन गिल ४५ तर सूर्यकुमार यादव ३४ धावांवर खेळत होते. पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द करावा लागला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.

मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी होणार आहे. त्यानंतर चार डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश संघात बांगलादेशात तीन एकदिवसीय सामन्यांची तसंच दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

****

कतार मध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल स्पेन आणि जर्मनी यांच्यातला सामना एक - एकनं बरोबरीत सुटला. अन्य सामन्यात कोस्टारिकाने जपानचा एक - शून्य असा, क्रोएशियानं कॅनडाचा चार - एक असा, तर मोरोक्कोने बेल्जियमचा दोन - शून्य असा पराभव केला.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी एक डिसेंबरला सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून सक्तीनं केली जाणारी वीजबिल वसूली, पूर्व सुचना न देता खंडीत केला जाणारा वीज पुरवठा या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली.

****

No comments: