Tuesday, 29 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : 29 नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

 

ठळक बातम्या

·      प्रशासकीय स्तरावर वाळू लिलावाची प्रक्रिया बंद, १५ दिवसात नवीन धोरण जाहीर होणार

·     राज्यात प्रत्येक तालुक्यात विमान उतरण्यासाठीचं हेलिपॅड उभारण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

·      राज्यातल्या सत्तासंघर्षावरची सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर 

·      वीज बिल माफ करु असं कधीच म्हटलं नव्हतं- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

·      राज्यातल्या सर्व आश्रमशाळाचं लेखापरीक्षण करण्याची भाजपमहिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी

·      ५३व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातल्या मतमोजणीचा निकाल आज जाहीर होणार

आणि

·      क्रिकेटपटू ॠतुराज गायकवाडचा एकाच षटकात सात षटकार आणि सर्वाधिक ४३ धावा करण्याचा जागतिक विक्रम

 

सविस्तर बातम्या

राज्यात यापुढे प्रशासकीय स्तरावर वाळू लिलावाची प्रक्रिया बंद करण्यात येणार असून, १५ दिवसात वाळूबाबत शासनाचं नवीन धोरण येईल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. सध्या प्रस्तावित असलेले लिलावही स्थगित ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यापुढे फक्त शासकीय प्रकल्पांसाठी गौण खनिज उत्खननाचा परवाना दिला जाणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या विमानतळांच्या धावपट्ट्यांचं विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता या हेलिपॅडचा वैद्यकीय सहाय्यासाठी उपयोग होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोसीखुर्द तसंच कोयना धरणासह कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्यात विमानतळांच्या धावपट्ट्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर तसंच औरंगाबाद इथल्या विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून, शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरी प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी काल अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत, मदत नक्कीच मिळेल, अशी ग्वाही देत त्यांना दिलासा दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडवण्याकरिता त्याच्या समन्वयासाठी विशेष कर्मचाऱ्याची नेमणूक करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधीकाऱ्याना केल्या आहेत.

****

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे, असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार यांनी, अशा गोष्टींपेक्षा राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असल्याकडे लक्ष वेधलं. कर्नाटकातला बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं ते म्हणाले. सीमाभागातल्या लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात राज्य सरकारने तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

****

राज्यातल्या सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत, त्यामुळे आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, तसंच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भुमिका मांडावी, अशी मागणी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यात महापुरुषांचा अवमान याचाही समावेश करावा, असं ते म्हणाले. येत्या तीन डिसेंबरला रायगडावर प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार असल्याचं, उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.

****

मध्य प्रदेश सरकारनं कोरोना काळात शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं होतं, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना काळात शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्याची मागणी आपण केली होती, वीज बिल माफ करु असं आपण कधीच म्हटलं नव्हतं, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वीज बिलाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना एका पैशाची देखील सूट दिली नाही, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, असं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पिक विमा योजनेचा विमा कंपन्यांना जास्त फायदा झाला, अशी टीका ही त्यांनी केली.

****

राज्यातल्या सर्व आश्रमांचं, आश्रमशाळा याचं लेखापरीक्षण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. काल नवी मुंबईत वाशी इथं महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या महिला विकास मेळाव्यात त्या बोलत होत्या. महिला बचत गटांना उभारी देण्याचं काम येत्या दिवसांत होणार आहे. महिलांना मार्केटिंग, पॅकेजिंगसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याचं वाघ यांनी सांगितलं. 

****

५३व्या इफ्फी अर्थात, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. गोव्यात पणजी जवळच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडासंकुलात झालेल्या या समारोप सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आशा पारेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या समारंभात तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना २०२२ सालच्या इंडियन फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री तसंच विशेष ज्युरी पुरस्कारांसह अन्य पुरस्कारही या सोहळ्यात प्रदान करण्यात आले.

****

अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं राजपत्रित अभियंता संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासकीय सेवेतल्या अभियंत्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं.

****

सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगड किल्ल्यावर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन साजरा होणार आहे. अफझल खान कबरी भोवतीचं अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर प्रतापगड इथं होणाऱ्या या शिवप्रताप दिनासाठी राज्यभरातले शिवभक्त येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहनतळासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

****

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमांतून त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. ही तैलचित्रं आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटली आहेत.

औरंगाबाद इथं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला सहकार मंत्री अतुल सावे आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या वतीनंही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.

अहमदनगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी फुले यांना अभिवादन करण्यात आलं. विविध शैक्षणिक संस्था, शासकीय, सहकारी तसंच सामाजिक संस्था, सेवाभावी मंडळं यांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना बेळगावच्या कनिष्ठ न्यायालयानं समन्स बजावलं आहे. ३० मार्च २०१८ ला राऊत बेळगावमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमात राऊत यांच्या भाषणातल्या काही मुद्यांवर आक्षेप घेत बेळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणाची सुनावणी आता सुरु झाली.

****


औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातल्या मतमोजणीला विद्यापीठाच्या क्रीडा विभागात काल सुरुवात झाली. दहा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत असून, सर्व निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि

अभ्यास मंडळ गटाच्या निवडणुकीची आज मतोमजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी परवा रविवारी ९१ टक्के मतदान झालं.

****

औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स काढण्याच्या मोहिमेला आजपासून सुरवात होत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी काल याबाबतचे आदेश दिले असून, मोहिमेच्या वेळेस आवश्यकतेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास देखील सांगितलं आहे. ज्या व्यावसायिकांनी अनधिकृत रित्या केबल्स टाकलेल्या आहेत त्यांनी स्वतः केबल्स काढून घेण्याचं आवाहनही चौधरी यांनी केलं आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून तीन डिसेंबरपर्यंत तुळजापूर ते औरंगाबाद दरम्यान ’मशाल रॅली काढण्यात येणार आहे. क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी ही माहिती दिली. तीन ते सात डिसेंबर दरम्यान हा राज्य क्रीडा महोत्सव होणार असून, २० विद्यापीठांचे खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरापासून उद्या सकाळी दहा वाजता ही रॅली निघेल. चौसाळा, उस्मानाबाद, बीड, गेवराई, शहागड, अंबड, जालना, बदनापूर मार्गे ही रॅली दोन नोव्हेंबर रोजी रात्री औरंगाबादेत पोहचणार आहे.

****

पुण्याचा क्रिकेटपटू ॠतुराज गायकवाडने एकाच षटकात सात षटकार आणि सर्वाधिक ४३ धावा करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. अहमदाबाद इथं सुरु असलेल्या विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात विजयनं ही कामगिरी केली.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची त्वरित हकालपट्टी करावी अन्यथा स्वराज्य संघटना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल असा इशारा संघटनेनं दिला आहे. संघटनेचे किरण काळे पाटील आणि विष्णू पाटील मोगल यांनी काल औरंगाबाद इथं निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांना या मागणीचं निवेदन दिलं.

****


परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या गर्व्हमेंट टेक्निकल हायस्कूलमधल्या प्रधानमंत्री कौशल्य केंद्रात हे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरात सहभागी होण्यासाठी महास्वयंम संकेतस्थळावर बेरोजगार म्हणून नोंद करणं आवश्यक आहे. या शिबिरामध्ये युवक-युवतींनी मूळ कागदपत्रांसह सहभागी होण्याचं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त खंदारे यांनी केलं आहे.

****

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाद्वारे राज्य महिला आयोगाच्या वतीनं उस्मानाबाद इथं अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली, उद्या जनसुनावणी होणार आहे. कोणतीही पीडित माहिला पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपल्या समस्या या जनसुनावणीत मांडू शकते. महिलांनी कोणत्याही विभागाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारीबाबत किंवा नवीन तक्रारीसंदर्भात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन उस्मानाबादचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुनिल अंकुश यांनी केलं आहे.

****

बीड तालुक्यातल्या १३२ ग्रामपंचायतीसाठी सरपंच तर एक हजार ५० ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. कालपासून उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारांना येत्या दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे. ही निवडणूक शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्या असल्याचं तहसीलदार सुहास हजारे यांनी सांगितलं.

****

योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. याबरोबरच श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शासन करण्याची मागणीही  यावेळी करण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मधील औराळा इथल्या विद्युत उपकेंद्रात कार्यरत लोकसेवक ऋषीकेश वाडेकर याला काल दोन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून अटक केली. वाडेकर यानं तक्रारदाराच्या शेतात वीज पंपासाठी इलेक्ट्रीक मीटर आणि वीजजोडणी देण्यासाठी ही लाच मागितली होती.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...