Wednesday, 30 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ३३६व्या शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई बरोबरच राज्यातल्या इतर भागात गोवरच्या संशयित रुग्णांबाबत सतत माहिती घेतली जावी, सर्व महापालिकांमध्ये गोवर प्रतिबंधात्मक विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात यावा आणि लसीकरणाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२२ साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं तर २०२१ साठीच्या राष्ट्रीय साहस पुरस्कारांचं वितरण आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात होणार आहे. २०२२ च्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू शरथ कमल अचंता याची निवड करण्यात आली आहे. याशिवाय २५ खेळाडूंना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार तर पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारांचं वितरणही यावेळी होणार आहे.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या ८९ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. दोन कोटी ३९ लाख मतदार ७७८ उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी निवडणूक आयोगानं केली आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एक पर्यावरणपूरक मतदान केंद्र, एक नमुना मतदान केंद्र असेल तर प्रत्येकी एका मतदान केंद्रात दिव्यांग नागरिक पूर्ण काम पाहतील. याशिवाय ११ सखी मतदान केद्रांमध्ये सगळं कामकाज महिला निवडणूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात असेल तर १८ युवा मतदान केंद्रांचं नियंत्रण तरुण कर्मचारी वर्गाकडे राहील. गीरच्या जंगलात फक्त एकाच मतदारासाठी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे, एक मतदान केंद्र मालवाहतुकीच्या वाहनावर तर एक अरबी समुद्रातल्या एका बेटावरही कार्यरत असेल.

****

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर आज बंगळुरुमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत. मुंबईत काल सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा, याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा तक्रारी आल्यास त्याची त्याची तत्काळ सोडवणूक करा, असं सत्तार यांनी सांगितलं. 

****

औरंगाबाद शहरातले रिक्षा चालक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रिक्षा चालकांच्या विविध मागण्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती, औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रिक्षा मीटर कॅलेब्रेशनसाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, वाहतूक पोलिसांची शहरात रिक्षा चालकांविरोधात मोहिम सुरु असून रिक्षा चालकांना २८३ च्या कलमाखाली गुन्हे दाखल करुन नये आदी मागण्या रिक्षा चालकांनी केल्या आहेत.

****

जागतिकड्स दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण पथक आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं उद्या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय उद्या सकाळी साडे आठ वाजता क्रांती चौक इथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देन त्यांचं अभिनंदन केलं.

//**********//

No comments: