Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर
२०२२ सायंकाळी ६.१०
****
· मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त
भागात पुराचं पाणी वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचं जागतिक बँकेला आवाहन.
· शिवाजी महाराज अवमानकारक वक्तव्यप्रकरणी राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या मोहिमेत
सर्व पक्षीयांना सामील होण्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन.
· राज्यपालांच्या वक्तव्याची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घेण्याची राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी.
· महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणं गरजेचं - विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचं मत.
आणि
· उस्मानाबादच्या ५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत राज्याच्या पुरुष आणि महिला
संघाचा अंतिम फेरीत प्रवेश.
****
मराठवाडा आणि विदर्भ भागातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच
दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनानं तयार
केला असून त्यासाठी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केलं आहे. जागतिक बँकेचे भारतातले प्रमुख ऑगस्ते तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळं मराठवाडा आणि विदर्भातल्या सुमारे पाच हजार गावांना
फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं सहाय्य लाभलं असून प्रकल्पाच्या पहिल्या
टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
****
राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे सात पुरस्कार राज्यानं पटकावले आहेत. ‘सुगम्य
भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारं सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण
आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांचे हे पुरस्कार
असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण
विभागाच्या वतीनं यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त
राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते येत्या ३ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत
या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करत
असून ते राज्याच्या अस्मितेबरोबर खेळत आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
राज्यपालांना महाराष्ट्रातून पदमुक्त करण्याची मोहीम आता शिवसेनेने सुरू केली असून
त्यांनी या मोहीमेत सर्व पक्षीयांना सामील होण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले -
जर या राज्यपालांना
हटवलं गेलं नाही तर या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र
येऊन केला पाहिजे. आणि मी तमाम महाराष्ट्र प्रेमींना आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती
करतो आहे, म्हणून आत्ताच वेळ आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा
या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग मी पक्ष वगैरे बाजुला ठेवून सगळ्यांना
आवाहन करतोय, अगदी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रप्रेमी लोकं जरी सोबत आले तर त्यांना
सुद्धा मी आमंत्रण देतोय. कारण पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता आणि राज्य चिरडलं
जाणार असेल, तर आपण मात्र छत्रपतींच नाव घ्यायला नालायक आहोत.
राज्यात शिंदे सरकार आल्यापासून राज्याची अवहेलना झाल्याची टीकाही ठाकरे यांनी
यावेळी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा
निषेध करत, बोम्मईंच्या अंगात भूत संचारल्याचं ठाकरे म्हणाले.
****
शिवरायांचा अवमान करायचे धाडस निर्लज्ज लोक करत आहेत. स्वराज्य नसते, तर आपण आज
गुलामगिरीत असतो, असे सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग
कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी
केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आता यापुढे कोणी अवमानकारक भाष्य केल्यास
ठेचून काढण्याचा इशाराही दिला आहे, यासंदर्भातील पुढची भूमिका येत्या २८ नोव्हेंबर
रोजी जाहीर करणार असल्याचंही खासदार भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वयानं ज्येष्ठ असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांच्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वसामान्य
माणसाला राग आला आहे असे सांगत खासदार भोसले म्हणाले –
महाराष्ट्राच्या
राजकारणात वयानं जर कोणी ज्येष्ठ असेल तर पवार साहेब आहेत. पवार साहेब त्या व्यासपीठावर
होते. नितीन गडकरीही होते. त्या व्यासपीठावर आणि ही सगळी म्हणजे ज्येष्ठ लोकं आहेत.
ज्यावेळेस असं जेंव्हा वक्तव्य होतं, निदान त्याचा कुठेतरी त्यांच्या भाषणात त्यांनी
उल्लेख करायला हवा होता. का केला नाही?
****
राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं
मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज त पत्रकारांशी बोलत
होते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही ते म्हणाले. आतापर्यंत
राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर आपण कोणतेही भाष्य
केलं नव्हतं. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं पवार यांनी
म्हटलं आहे. सीमावादाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाला आपली जबाबदारी टाळता येणार
नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमा प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणे गरजेचं
असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात
आज त्या बोलत होत्या. दोन्ही राज्यांच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद
आहेत. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या मराठी भाषिक जिल्ह्यातील जनतेची महाराष्ट्रात सहभागी
होण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी अनेकांनी आपले बलिदानही दिलं असल्याचं त्या
म्हणाल्या.
****
गोवर रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधवा
आणि काळजी घ्यावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास
मीना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस
अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याचं ते म्हणाले.
****
५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला, अशा दोन्ही
संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात महाराष्ट्रानं
कोल्हापूरला १९-१५ असं नमवलं. तर, महिला गटात महाराष्ट्रानं दिल्लीला १९-१० असं पराभूत
केलं. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पुरुषांची भारतीय रेल्वे विरुध्द, तर महिलांची विमान
प्राधिकरणाविरुध्द लढत होईल.
****
नंदुरबार जिल्ह्यातील पंधराशे कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ राज्याचे
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. नंदुरबारमध्ये झालेल्या
सोहळ्यात मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील एकूण १ हजार ३४ पाणी पुरवठा योजनांचं ऑनलाईन
पद्धतीनं उद्घाटन केलं. प्रत्येक जिल्ह्यात जे सरपंच पाणीपुरवठ्याचं चांगलं काम करतील
त्यांना जलदूत पुरस्कार देण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी यावेळी बोलतांना केली.
****
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूर
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला
भेट दिली. छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृती कायम
स्मरणात राहतील असं ते यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद - वाळूज औद्योगिक वसाहतीत आज सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण
जागीच ठार झाले आहेत. कंपनीत कामासाठी जाणाऱ्या अनिता आणि निकीता या दोघा बहिणीला दीपक
लोखंडे हा घेऊन जात असतांना दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यानं ट्रकच्या चाकाखाली सापडून
घटनास्थळीच तिघे ठार झाल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिली.
****
गायरानधारक आणि वनजमीन धारकांवरील हल्ले थांबवा, आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित
करा या मागणीसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या पैठण गेट पासून हा मोर्चा काढण्यात आला होता. संसदेवर
हिंस्त्र सिंहाची मुद्रा बसवण्यात आली असून ती हटवण्यात यावी ही मागणीही यावेळी करण्यात
आली.
****
उस्मानाबाद इथं येत्या २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधुन मतदार
जनजागरण समिती आणि संविधान जनजागरण समितीच्या वतीनं संविधान जनजागरण रॅलीचं काढण्यात
येणार आहे. बार्शी नाका जिजाऊ चौक इथं जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते हिरवा
झेंडा दाखवुन रॅलीला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment