Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 November
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
· देशाचा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला इतिहास नव्यानं लिहिण्याची
गरज पंतप्रधानांकडून व्यक्त
· विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही-मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची ग्वाही
· संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा-आरती अंकलीकर, प्रशांत
दामले यांचा समावेश
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभाकर मांडे,
शंकर अभ्यंकर यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार
· आज संविधान दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
· जागतिक वारसा स्थळाचा मान टिकवून ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी-केंद्रीय
पुरातत्व विभागाचे क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांचं मत
· पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर
सात गडी राखून विजय
आणि
· जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथं श्रीराम मूर्तींच्या पुनर्स्थापना
सोहळ्याला प्रारंभ
देशाचा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला इतिहास नव्यानं लिहिण्याची
गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आसाममधले अहोम सेनापती लचित बारफुकन
यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचा समारोप सोहळा काल दिल्लीत झाला, त्यावेळी ते बोलत
होते. लचित बारफुकन यांनी आपल्याला देशभक्तीची शिकवण दिली. भारताचा इतिहास म्हणजे शौर्य,
त्याग आणि निर्भयतेची गाथा आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
****
विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल कराड इथं, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक,
पशु-पक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या
प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले..
Byte…
शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं त्यांच्या
मेहनतीपेक्षा म्हणजे जास्तीचं त्यांना उत्पन्न मिळणं यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण
त्यामध्ये उपक्रम केलेत. आणि त्याचा फायदा देखील आहे. त्याचं उत्पादन वाढवण्याचं जे
काही शेतकऱ्यांनी आणि आमच्या कृषी विभागानं प्रयत्न केलेच खरंच त्यांचं मी जाहीरपणे
कौतुक केलेलं आहे. आणि मी नगरविकास मंत्री होतेा, त्यावेळेस ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा
असं काही मी पाहिलं नाही. आणि आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे
दुजाभाव तर बिलकुल आमच्याकडून विकासामध्ये होणार नाही.
शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये
नवनवीन प्रयोग करावे, आणि आर्थिक प्रगती साधावी, हीच यशवंतराव चव्हाण यांना खरी आदरांजली
ठरेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी
निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी कराडच्या प्रीतिसंगम इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळावर
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. कराड शहरात शंभुतीर्थ इथं उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते काल झालं.
कोल्हापूर इथल्या कणेरी सिद्धगिरी मठाच्या वतीने २० ते
२६ फेब्रुवारी २०२३ या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम हा पंचमहाभूतांवर आधारित
सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच पंचगंगा नदीची आरती मुख्यमंत्री
शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आली.
****
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातल्या ८६५ गावांमधल्या विविध संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री
धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी
नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या,
त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
****
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यात दुरूस्तीसाठी तातडीने
मोहीम राबवण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहेत.
मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे
बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत आठ
डिसेंबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत विधानसभा
मतदार यादी दुरुस्तीची मोहीम राबवावी, असं मदान यांनी सांगितलं.
****
गोवर संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ आवश्यक त्या
सर्व उपाययोजना कराव्यात, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी
सावंत यांनी केली आहे. राज्यातल्या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर काल दूरदृश्य प्रणालीद्वारे
घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी जिल्हानिहाय कृती दल स्थापन करुन पाच वर्षांखालील
बालकांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका
असलेले उदध्व बाळासोब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी
सक्तवसुली संचलनालय - ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं
काल नकार दिला. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यात पैशांचा गैरवापर केल्याचा
आरोपात ईडीनं संजय राऊत यांना अटक केली होती. सुमारे तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर
९ नोव्हेबर रोजी राऊत यांची जामिनावर सुटका झाली.
****
संगीत नाटक अकादमीचे २०१९, २०, २१ चे विविध पुरस्कार काल
जाहीर झाले. यामध्ये प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांना सुगम संगीत, प्रसिद्ध गायिका आरती
अंकलीकर यांना शास्त्रीय संगीत, अभिनेते प्रशांत दामले यांना रंगभूमी, मीना नाईक यांना
कळसुत्री बाहुल्या, उदय भवाळकर यांना शास्त्रीय संगीत तर शमा भाटे यांना कथक प्रकारातल्या
योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप
जाहीर झालेल्या मान्यवर कलाकारांमध्ये शास्त्रीय गायिका मालिनी राजुरकर आणि ज्येष्ठ
कथक नृत्यगुरु डॉ. नंदकिशोर कपोते यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ
कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रातले
प्रभाकर मांडे यांना लोककला, शंकर अभ्यंकर यांना सतार वादन, पद्मा शर्मा यांना कथक,
उस्मान खान यांना संगीत, भिकन्या धिंड्या यांना लोकसंगीत, हरिश्चंद्र बोरकर यांना तमाशा
या लोककलेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०१९, २०, २१ चे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार काल
जाहीर करण्यात आले. यामध्ये गौतम काळे शास्त्रीय गायन, विलास कोकाटे यांना लोकसंगीत,
ज्ञानेश्वर देशमुख यांना पखवाज, वैशाली जाधव यांना तमाशा लोककलेसाठी तर बिहार मधल्या
युवा गायिका मैथिली ठाकूर यांना लोकसंगीतासाठी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा
दिसून येत आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोखले यांची प्रकृती दोन दिवसांपूर्वी खालावली होती, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत
सुधारणा असून, ते डोळे उघडत असल्याचं, तसंच हातपायाची हालचाल करत असल्याचं रुग्णालयानं
जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत
असलेली मुंबईतली महत्त्वाची स्थळं आणि बौद्ध
लेण्यांवर आधारित टूर सर्किटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. संविधान
दिनानिमित्तानं पर्यटन संचालनालयानं हा उपक्रम हाती घेतला आहे. या सफरीमध्ये चैत्यभूमी,
राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. मुंबईनंतर कोकण, पुणे, नाशिक, नागपूर,
आणि औरंगाबाद इथंही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
संविधान दिन आज साजरा होत आहे. औरंगाबाद इथं मिलिंद नागसेनवन
स्टुडंन्टस वेल्फेअर असोसिएशन आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं संविधान गौरव
फेरी काढण्यात येणार आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान आणि
सध्याची राजनीती, या विषयावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या मौलाना आझाद
संशोधन केंद्रात हा मेळावा होणार आहे.
****
परभणी इथल्या राजगोपालचारी उद्यानातून आज सकाळी साडे आठ
वाजता विशेष फेरी काढण्यात येणार आहे. प्रारंभी संविधानातल्या प्रास्ताविकेचं सामूहिक
वाचन करण्यात येईल, त्यानंतर वसंतराव नाईक पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन मार्गे संविधान फेरी काढण्यात येईल.
****
लातूर इथं आज संविधान दिनापासून सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत ‘समता पर्वा’चं आयोजन करण्यात आलं आहे. समाज
कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी ही माहिती दिली. या अंतर्गत संविधान फेरी,
निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांसह विविध
विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
****
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद
जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं आज आणि उद्या औरंगाबाद शासकीय ग्रंथालय परिसरात ग्रंथोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी नऊ वाजता क्रांतीचौक इथून ग्रंथदिडीनं या ग्रंथोत्सवाला
सुरवात होणार आहे. यात विविध विषयांवर परिसंवाद, काव्यवाचन होणार असून, उद्धाटन प्रसंगी
संविधान दिनाच्या अनुषंगानं संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
****
अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेला
आहे. मात्र, तो टिकवून ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं मत, केंद्रीय पुरातत्व
विभागाचे औरंगाबाद क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त काल औरंगाबाद
इथल्या एमजीएम विद्यापीठात, राष्ट्रीय वारसा सप्ताहाच्या समारोप सत्रात, ‘पुरातत्व
स्थळे आणि स्मारके’ - व्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन, या विषयावर चावले बोलत
होते. पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व जाणून घेत, वारसा स्थळांना इजा पोहोचेल
असं वर्तन टाळायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती
पुतळ्याचं अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय
क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाने निर्धारित
५० षटकांत सात बाद ३०६ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने ४८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच
३०९ धावा करून सामना जिंकला. १०४ चेंडूत १९ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद
१४५ धावा करणारा टॉम लॅथम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत पुढचा सामना रविवारी
होणार आहे.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत
काल इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातला सामना एकही गोल न झाल्यामुळे अनिर्णित राहीला.
ग्रूप ए मध्ये नेदरलँड आणि इक्वेडोर यांच्यातला सामना एक - एकनं बरोबरीत सुटला. अन्य
एका सामन्यात सेनेगल कडून तीन - एक असा पराभव होऊन कतारचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
आलं, तर इराणने वेल्सचा दोन - शून्य असा पराभव केला.
****
जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथं रामदास स्वामी यांच्या
श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण सीता आणि हनुमंतासह सर्व मूर्तींच्या पुनर्स्थापना सोहळ्याला
कालपासून प्रारंभ झाला. घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या
हस्ते मूर्तींची विधीवत पूजा करण्यात आली. जांब गावातून मूर्तींची मिरवणूक काढण्यात
आली. त्यानंतर महाआरती होऊन, कृतज्ञता सोहळा झाला. आज सकाळी मूर्तींची पुनर्स्थापना
तसंच इतर धार्मिक विधी आणि दुपारनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास तीन
महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या या मूर्तींचा गेल्या महिन्याच्या अखेरीस तपास लागला,
या प्रकरणी काही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर
गटातील अधिसभा निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात
असून औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात ८३ मतदान केंद्रांवर सकाळी
आठ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतपत्रिकेसह सर्व साहित्य घेऊन अधिकारी,
कर्मचारी काल मतदान केंद्रांवर रवाना झाले.
****
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत
का? असा प्रश्न प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी विचारला आहे. अंबाजोगाई इथं,
यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या समारोहात
आज बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून, प्रसिद्ध गायक राजेश सरकटे यांचा 'मराठवाड्याचे
काव्य वैभव' कार्यक्रम होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार, नायगाव आणि बिलोली तालुक्यातल्या
२० हजार हेक्टर जमीनीच्या रब्बी हंगामातल्या क्षेत्रासाठी निम्न मानार बारूळ प्रकल्पातून
काल पहिलं आवर्तन सुरू करण्यात आलं. पाण्याचा अपव्यय टाळून शेतक-यांनी सिंचन करावं
आणि पाटबंधारे विभागास सहकार्य करावं, असं आवाहन कार्यकारी अभियंता आशिश चौगुले यांनी
केले आहे.
****
लातूर - नांदेड रस्त्यावर परवा रात्री झालेल्या डिझेल टँकर
आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात जखमी झालेले अजहर शेख यांच्यावरील उपचाराची जबाबदारी
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतली आहे. आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार
हा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितलं. या अपघातात
सात वाहनांसह एका एस टी बसलाही आगीची झळ पोहोचली.
अजहर शेख यांनी बसमधल्या ९ सहप्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. मात्र यावेळी भडका उडाल्याने
ते स्वत: गंभीर भाजले आहेत, त्यांच्यावर लातूर इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रीय लिंगभाव मोहिमेला कालपासून देशभरात प्रारंभ झाला.
२३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात महाराष्ट्रातल्या चार केंद्रांचा समावेश आहे.
त्यापैकी एक केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यात बेंबळी या प्रभागसंघांतर्गत सुरु करण्यात
आलं असून, काल त्याचं उद्घाटन झालं. भेदभावाच्या समस्या ओळखून समाज प्रबोधन करणं, महिलांचे
हक्क आणि अधिकार सुनिश्चित करणं आणि सामुहिक शक्तीच्या जोरावर उपेक्षितांना संरक्षण
आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे.
****
No comments:
Post a Comment