आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
सातव्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे. परराष्ट्र
व्यवहार मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया यांच्या विद्यमानं आयोजित भू तंत्रज्ञानावर आधारित
हा मुख्य वार्षिक कार्यक्रम आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात परराष्ट्र व्यवहार मंत्री
डॉक्टर एस जयशंकर जिओ डीजीटल व्यवस्था आणि त्याचे परिणाम या विषयावर संबोधित करणार
आहेत.
****
भारतीय विमान प्राधिकरणाच्या वतीनं देशभरातल्या सगळ्या विमानतळांवर दोन डिसेंबर
पर्यंत विमानसुरक्षा जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त दिलेल्या
संदेशात प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी, विमान प्राधिकरणाच्या सर्व क्षेत्रातल्या
सुरक्षेवर भर दिला. विमानाच्या उड्डाणासह, जीवनातल्या सर्वच क्षेत्रात असलेल्या सुरक्षेच्या
जनजागृतीबद्दल नियोजन सदस्य ए के पाठक यांनी माहिती दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या
पूर्वतयारीचा भाग म्हणून गेल्या सोमवारपासून सुरु केलेली चर्चा काल पूर्ण झाली. चर्चेच्या
शेवटच्या टप्प्यात सीतारामन यांनी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि अर्थतज्ज्ञांशी
चर्चा केली. आतापर्यंत सीतारामन यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांशी,
तसंच समाजाच्या विविध स्तरातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
****
राज्यातल्या तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ठाणे
जिल्ह्यातले अभय पंडित यांना कुंभार कलेसाठी, यवतमाळ जिल्ह्यातल्या रजनी शिर्के यांना
भरत कामासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अमर सातपुते यांना कोल्हापुरी चपला हाताने
तयार करण्याच्या कौशल्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेचा दोन - शून्य असा
पराभव करुन पोर्तुगालचा संघ अंतिम १६ मध्ये पोहोचला आहे. ब्राझिलनंही काल स्वित्झर्लंडचा
एक - शून्य असा पराभव करत पुढची फेरी गाठली. कॅमेरुन आणि सर्बिया यांच्यातला सामना
तीन - तीन असा बरोबरीत सुटला, तर घानानं दक्षिण कोरियाचा तीन - दोन असा पराभव केला.
//**********//
No comments:
Post a Comment