Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर
२०२२ सायंकाळी ६.१०
****
·
शाळा, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात-मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन.
·
एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांना मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान.
·
परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
आणि
·
भारत-न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे
रद्द.
****
तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 परिषदेमध्ये सामील व्हावं, शाळा, महाविद्यालयं
तसंच विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा,
संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून ते आज बोलत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित
झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या
समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली,
या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर
भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं
यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त
केलं. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे, ज्या
गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज
आपले नागरिक नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची
निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताची
आवड जगभरातच वाढली आहे, हे लक्षात येत आहे,
आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित ठेवणं, त्याचं संवर्धन करणं आणि जितकं शक्य असेल तितका
त्याचा प्रसार करणं, ही आपली
जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना
कोणत्या क्षेत्रात देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत
आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य जाणून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे
****
२०२३
सालच्या प्रजासत्ताक दिन समारंभात अरब प्रजासत्ताक- इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल
सिसी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं
ही माहिती दिली आहे. २०२२-२३ मध्ये जी -२० च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात इजिप्तला
‘अतिथी देश’ म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय
अर्थसंकल्प २०२३ -२४ साठी सरकारनं लोकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. येत्या
१० डिसेंबरपर्यंत या सूचना पाठवता येतील. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सहभागपूर्ण
आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तसंच लोकसहभागाच्या भावनेला चालना देण्यासाठी, अर्थमंत्रालय
दरवर्षी नागरिकांकडून सूचना मागवतं. सर्वसमावेशक वाढीसह भारताला जागतिक स्तरावरच्या
आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात मदत करू शकतील अशा आपल्या कल्पना आणि सूचना
लोकांनी मांडाव्या असं आवाहन अर्थमंत्रालयानं केलं आहे.
****
राज्यात
सुरू असलेल्या पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पंधरा
दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी तसंच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करण्यातील तांत्रिक
अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबर
ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या शेवटच्या दिवसांत ऑनलाईन अर्ज करताना विविध
समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावं लागत आहे. भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातले
अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. यामुळे ही मागणी केली असल्याचं
मुंडे यांनी केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
महर्षी
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील बाया
कर्वे पुरस्कार डॉ. बुधरी ताती यांना जाहीर झाला आहे. ताती या छत्तीसगडमध्ये दंतेवाडा
नक्षलग्रस्त भागात गेल्या ३३ वर्षा पासून महिला सशक्तीकरणाचं कार्य करत आहेत. येत्या
मंगळवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असं संस्थेच्या उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी
यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई तथा बाया कर्वे
यांच्या नावे १९९६ पासून हा पुरस्कार दिला जातो.
****
मराठवाड्यातलं
पहिलं स्वयंअर्थसहाय्यित अभिमत विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत
समारंभ आज औरंगाबाद इथं झाला. या सोहळ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर
डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री मधुकर साठे
यांनी ही पदवी स्वीकारली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसंच
राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे
समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.
विलास सपकाळ, नियामक मंडळाचे सदस्य कमलकिशोर कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते
यावेळी ५३४ विद्यार्थ्यांनाही या वेळी पदवी प्रदान करण्यात आली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आज सकाळी
या शिबिराचं उद्घाटन झालं. या महाआरोग्य शिबिरात दोन दिवसात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी,
चाचण्या आवश्यकतेनुसार औषधोपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कर्करोग, मधुमेह,
रक्तदाब यासारख्या आजारावर पुढील उपचार सुरू होणार आहेत. काही गंभीर आजार आढळून आले
तर त्या रुग्यांवर मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून
अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केल्याने शिबिरास न भुतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळत
असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला.
सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९
षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. पावसामुळं हा सामना उशिरा सुरू झाला होता. त्यामुळं
केवळ २९ षटकंच खेळवली जाणार होती. त्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा
निर्णय घेतला. फलंदाजी करताना १२ षटकं आणि ५ चेंडूत भारतीय फलंदाजांनी १ बाद ८९ धावा
केल्या होत्या. कर्णधार शिखर धवन ३ धावा करुन बाद झाला. मात्र पावसामुळे खेळ थांबवावा
लागला तेव्हा शुभमन गिल ४५ तर सूर्यकुमार यादव ३४ धावांवर खेळत होते. पाऊस न थांबल्यामुळे
सामना रद्द करावा लागला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर
आहे.
मालिकेतला
तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना बुधवारी होणार आहे. त्यानंतर चार डिसेंबरपासून
भारत आणि बांगलादेश संघात बांगलादेशात तीन एकदिवसीय सामन्यांची तसंच दोन कसोटी सामन्यांची
मालिका होणार आहे.
****
अंबाजोगाई
इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप होत आहे. या समारोप
सत्रात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये
कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पंजाबराव देशमुख, साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी
इंदुमती जोंधळे, संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी सूरमणी बाबुराव बोरगांवकर तर प्रदीप
जोगदंड तसंच रजनी वर्मा यांना शिल्पकलेसाठी युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार
आहे.
****
औरंगाबादच्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीची उद्या
मतमोजणी होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली
क्रीडा विभागातल्या बॅडमिंटन सभागृहात उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
आहे. काल या निवडणुकीसाठी सुमारे ५१ टक्के मतदान झालं. निवडणूक निर्णय अधिकारी तथा
कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार
रिंगणात होते. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात ८३ मतदान केंद्रांवर
मतदान घेण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment