Friday, 25 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

अहोम राज्याच्या सेनेचे थोर सेनापती लचित बारफुकन यांच्या चारशेव्या जयंती महोत्सवाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. आसाम सरकारनं लचित बारफुकन यांच्या शौर्याबद्दल आणि देशभक्तीबद्दल लोकांना अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीत तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. लचित बारफुकन हे आसामच्या अहोम राज्याचे सेनापती होते. औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांनी केलेल्या चढायांना निर्धारानं तोंड दिलं.

****

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागानं काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २० कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त केलं. लागोस इथून मुंबईत आलेल्या या संशयितानं मद्याच्या दोन बाटल्यांमध्ये हा अमली पदार्थ दडवला होता. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या या कटाबद्दल अधिक तपास सुरू आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यात पंधराशे कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. जिल्ह्यातल्या एकूण एक हजार ३४ पाणी पुरवठा योजनांच ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं. प्रत्येक जिल्ह्यात जे सरपंच पाणीपुरवठ्याचं चांगलं काम करतील त्यांना जलदु्त पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

****

स्पेनमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सात खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली आहे. पुरूषांच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यांमध्ये वंशज, विश्वनाथ सुरेश आणि आशिष मार्केड यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर महिलांच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यांमध्ये ८१ किलो वजनी गटात कीर्ती, ४८ किलो वजनी गटात भावना शर्मा, ५२ किलो वजनी गटात देविका घोरपडे तर ६३ किलो वजनी गटात रविनानं बाजी मारली.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑकलंड इथं सुरु असून, भारतानं न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं निर्धारित षटकात सात बाद ३०६ धावा केल्या. शिखर धवननं ७२, श्रेयस अय्यर ८०, शुभमन गिलनं ५०, वॉशिंग्टन सुंदर ३७, संजु सॅमसन ३६, तर ॠषभ पंतनं १५ धावा केल्या. 

//**********//

 

No comments: