Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 November
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
· सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा
४५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
· प्रधानमंत्री आवास योजनेतल्या भाडेपट्टयाच्या दस्तांना
एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा वाढवण्यासाठी दोन हजार ३८६
गावांमध्ये, बीएसएनएलचे मनोरे उभारण्यासाठी राज्य सरकार २०० चौरस मीटर जागा मोफत देणार
· दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग
कल्याण विभाग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
· राज्यातल्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याकरता येत्या १५
डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
· देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक
तत्त्वावर उद्यापासून सुरू होणार
· इंडोनेशियातल्या सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला रायगड
जिल्ह्यात २८७ हेक्टर जमिनीचं वाटप पत्र प्रदान
· ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय,
पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात येणार
आणि
· न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्याला
सुरुवात, भारताची प्रथम फलंदाजी
सविस्तर बातम्या
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गाच्या कामाला
गती देण्यासाठी राज्य सरकारच्या वाट्याचा ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं
मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून,
५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्थानिक
आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्यानं त्यांची
गैरसोय होते, म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची मागणी
केले होती. या रेल्वे मार्गाची लांबी ८४ पूर्णांक ४४ किलोमीटर असून, यावर दहा रेल्वे
स्थानकं असतील तसंच चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेतल्या भाडेपट्टयाच्या दस्तांना
एक हजार रुपये इतकं कमी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला
आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती
दिली.
Byte …
प्रधानमंत्री आवास योजनेच्या
अंतर्गत जेवढ्या काही वेगवेगळ्या स्कीम्स चालतात, याच्या दस्त नोंदणीकरता रेडीरेकनर
प्रमाणे पैसे द्यावे लागत होते, आता ही सगळी दस्त नोंदणी केवळ एक हजार रूपयात करायचा
निर्णय आम्ही केलेला आहे. गायरान जमिनीच्या वरच्या अतिक्रमणाच्या संदर्भात त्याच्यावर
ज्या लोकांची घरं आहेत, त्या लोकांना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित
करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ट्रान्सफॉर्मरवर एकाही व्यक्तीने वीजबिल भरलं असेल
तरी देखील त्याचे वीज कट करण्यात येऊ नयेत, सिंगत बिल जो भरेल त्याला वीज पुरवठा नियमित
दिला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही जी काही सरसकट कृषी पंप कापण्याची
मोहीम आहे, ती मोहीम कुठेही हाती घेण्यात येणार नाही.
****
इंटरनेट सुविधा वाढवण्यासाठी डिजिटल इंडिया मोहिमेस वेग
देण्याकरता, राज्यभरात दोन हजार ३८६ गावांमध्ये, भारत संचार निगम लिमिटेड -बीएसएनएलला
मनोरे उभारण्यासाठी २०० चौरस मीटर जागा मोफत देण्याचा निर्णय, काल राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला. यामध्ये निवडक गावांमध्ये खुली जागा अथवा गायरान जमिन विनामूल्य
देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाला १५ दिवसात
मंजूरी देणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पद भरती
प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
पदभरती संदर्भात काल १४ विभागांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. राज्यभरातल्या लिपिक
टंकलेखक या पदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत पदभरती होणार आहे. यासदंर्भातील जाहिरात
जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे.
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग
कल्याण विभाग स्थापन करण्याच्या निर्णयासह मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांची
माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Byte …
स्वतंत्र दिव्यांग
कल्याण विभाग मुख्यमंत्र्यांनी करण्याचा निर्णय केलेला आहे. तीन डिसेंबरला त्याची फॉर्मल
घोषणा माननीय मुख्यमंत्री करतील. ९५ ते २००३ या कालावधीतील एस.टी.चं सर्टीफिकेट रद्द
झालं म्हणून २०१९ साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आलं होतं, अशा सगळ्या लोकांना
अधिसंख्य पदावर कंटीन्यू ठेवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना निवृत्तीवेतन
वगैरे जे काही बेनिफीटस् आहेत, ते बेनिफिटस् देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं
घेतलेला आहे. जी काही आदिवासीची एस टी पदं रिकामी झालेली आहेत, एक महिन्याच्या आत याची
भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत.
पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट
कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा, तसंच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत योग्य तो निर्णय
घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातल्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याकरता येत्या १५
डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. आतापर्यंत
११ लाख ८० उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत. इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण
आल्यामुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात अडचण येत असल्यामुळे ही मुदत वाढ देण्यात
आली आहे.
****
देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक
तत्त्वावर उद्यापासून सुरू होणार आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेनं काल एका पत्रकाद्वारे
ही माहिती दिली. घाऊक व्यवहारांमध्ये एक नोव्हेंबरपासून डिजिटल रुपीचा प्रायोगिक तत्त्वावर
वापर सुरू झाला आहे. सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये
व्यवहार सुरू होतील. सध्या निवडक व्यक्ती आणि व्यापारी या व्यवहारात सहभागी होणार असून,
सध्या चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांची डिजिटल टोकन या व्यक्तींच्या डिजिटल वॉलेटमध्ये
बँकांकडून हस्तांतरित केली जातील. वॉलेटमधलं हे डिजिटल चलन वापरुन एका व्यक्तीच्या
खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करता येईल किंवा यात सहभागी
झालेल्या व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदीसाठी वापरता येईल. मोबाइल फोन किंवा तत्सम इतर
साधनांद्वारे हे व्यवहार करता येतील. सध्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि
आय डी एफ सी फर्स्ट बँक या चाचणीमध्ये सहभागी होणार आहेत.
****
महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक
उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
केलं आहे. इंडोनेशियातल्या सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला काल रायगड जिल्ह्यातल्या
धेरंड इथल्या २८७ हेक्टर जमिनीचं वाटप पत्र प्रदान करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
उद्योगांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
****
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल
मुंबईत आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन, पीक
विम्यासंदर्भात जाब विचारला. एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी
विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबतही दानवे यांनी काल बैठक घेऊन पीक विम्याचा आढावा
घेतला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याचं ते म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या
दोन पक्षांची युती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आपला होकार कळवला आहे. प्रदेशाध्यक्ष
रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिवसेनेसोबत झालेल्या दोन
बैठकांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं ठाकूर यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये मेट्रो कार शेड उभारण्याच्या
राज्य सरकारच्या निर्णयाच्या स्थगितीला, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकल्पासाठी
आणखी ८४ झाडं कापणं आवश्यक असून, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राधिकरणची परवानगी
घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला अर्ज करता येईल, असं न्यायालयानं
सांगितलं. या अर्जावर वृक्ष प्राधिकरण योग्य त्या अटींसह निर्णय घेईल असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त आणि किफायतशीर
दर - एफआरपी देण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. शेतकऱ्यांना दिवसा
वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तोडणी आणि वाहतुकीबाबत निकष
ठरवतानाच पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना
या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबर रोजी
सुनावणी होणार आहे. त्याआधी नऊ डिसेंबरपर्यंत दोन्ही पक्षांना आपापली लिखित कागदपत्रे
सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे पक्षाचे नाव आणि
'धनुष्यबाण' हे चिन्ह आठ ऑक्टोबरला गोठवलं होतं, त्यानंतर आता या संदर्भातील अंतिम
निर्णय बाकी आहे.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पोलीस बंदोबस्त
तैनात करण्यात आला आहे. सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये यासाठी
आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली, त्यात बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय झाला. सीमा ओलांडून
प्रवास करणाऱ्यांचं, वाहन चालकांचं, बस वाहकांचं फुलं देऊन स्वागत करण्याचा उपक्रम
पोलिसांनी राबवला आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून अॅडव्होकेट
संतोष चपळगावकर आणि अॅडव्होकेट मिलिंद साट्ये यांची, ज्येष्ठतेनुसार नियुक्ती झाली
आहे. या संदर्भात काल अधिसूचना जारी झाली असून, कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांसाठी
ही नियुक्ती आहे.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
अधिसभा पदवीधर गटाच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे
अनुसूचित जाती प्रवर्गातून सुनील मगरे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून दत्तात्रय भांगे,
इतर मागास प्रवर्गातून सुभाष राउत, महिला प्रवर्गातून पूनम पाटील तर अनुसूचित जमाती
प्रवर्गातून सुनील निकम निवडून आले आहेत. खुल्या गटातून डॉ. नरेंद्र काळे, आणि शेख
जहूर हे विजयी झाले.
****
सतत खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या निषेधात हिंगोली
जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात काल आंदोलन
केलं. उच्च दाबाची वाहिनी जात असलेल्या मनोऱ्यावर चढून शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा
दिला. महावितरणचे शाखा अभियंता आणि उपअभियंता यांना सुरेजखेडा इथल्या महिलांनी घेरावा
घातला. शालेय विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या
पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबवण्यात
येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारं
हे अभियान एक ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येईल. पाण्याची तपासणी कशी करावी
याबाबत या अभियानात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात
येणार आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले उस्मानाबाद जिल्हा
संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. काल त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
****
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती
आणि नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा
लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध समाजातल्या नवउद्योजकांसाठी उद्या
नांदेड इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा,
असं आवाहन समाज कल्याणच विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर-आष्टी मार्गावर पोलीस अधीक्षकांच्या
विशेष पथकानं काल गुटख्याचा साठा पकडला. बीड जिल्ह्यातल्या माजलगावहून आलेल्या या वाहनातून
सुमारे ११ लाख ६६ हजारांचा गुटख्याची वाहतुक केली जात होती, या कारवाईत पोलिसांनी परतूर
इथल्या दोघांना ताब्यात घेतलं असून, गुटखा आणि वाहन असा एकूण १९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल
जप्त केला.
****
आगामी काळात औरंगाबाद शहरात होणाऱ्या जी २० परिषदेच्या
पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी
काल शहरातल्या मुख्य रस्त्यांची पाहणी केली. या मार्गांवरील वाहतूक बेट सौंदर्यकरण
करण्यासह विविध सूचना त्यांनी केल्या.
****
औरंगाबाद महापालिकेच्या दोन शाळांना दिल्ली इथल्या राष्ट्रीय
शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेच्या पथकाने काल भेट दिली. मयुरबन इथली प्रियदर्शनी
शाळा तसंच सिडको एन-7 इथल्या शाळेत भेट देऊन या पथकाने स्मार्ट सिटी योजना तसंच सीएसआर
निधीतून राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं.
****
एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळला
जातो. यावर्षीचं घोषवाक्य "आपली एकता आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्या करिता"
हे आहे. बीड इथं या औचित्यानं उद्यापासून ३१ डिसेंबर पर्यंत जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय
महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कुटीर रुग्णालय या ठिकाणी जनजागृती
पर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला
आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी १० वाजता वर्णी महापूजेने नवरात्राला सुरवात होईल.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना सुरु झाला आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पावसामुळे रद्द
करण्यात आला. पहिला सामना जिंकत न्यूझीलंड या मालिकेत एक शून्य ने आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment