Tuesday, 29 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

जनतेपर्यंत योग्य बातमी पोहोचवण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांवर असून, बनावट बातम्यांपासून प्रसारमाध्यमांना सावध राहण्याची गरज असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आशिया प्रशांत प्रसारण संघटनेच्या ५९व्या सर्वसाधारण बैठकीत ते बोलत होते. नागरीकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याआधी आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमं बातमीची सत्यता पडताळून पाहतात, या माध्यमांच्या या तंत्राचं ठाकुर यांनी कौतुक केलं. त्यामुळे आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमं विश्वासार्ह असल्याचं ते म्हणाले. कोविड महामारीच्या काळात या दोन्ही माध्यमांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली, १०० पेक्षा जास्त कर्मचारी गमावल्यानंतरही या महामारीच्या काळात अथक वार्तांकन केलं, असं ठाकुर यांनी सांगितलं. आशिया प्रशांत प्रसारण संघटनेच्या बैठकीच्या माध्यमातून भारतीय माध्यमांना आव्हानांचा सामना करण्याबाबत आणि जागतिक स्तरावर प्रसारण करण्याबाबत अधिक ज्ञान प्राप्त करता येईल, असं ते म्हणाले.

****

सध्याच्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अतिशय महत्त्वाचा असून, भारताचा विकास भारतीय तंत्रज्ञानाशी जोडलेला असल्याचं, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज सातव्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत ते बोलत होते. जिओ डीजिटल व्यवस्था आणि त्याचे परिणाम ही या परिषदेची संकल्पना आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया यांच्या विद्यमानं आयोजित भू तंत्रज्ञानावर आधारित हा मुख्य वार्षिक कार्यक्रम आहे.

****

गुजरात मधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. गुजरात विधानसभेसाठी पाहिल्या टप्प्यात येत्या एक तारखेला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पाच तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधल्या २० ठिकाणी छापे टाकले. गँगस्टर आणि दहशतवाद संबंधांचा तपास एनआयए करत असून, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.

****

मुंबईत आतापर्यंत गोवरच्या मृत्यूची संख्या १४ वर पोहोचली असून, गोवर बाधितांची संख्या ३०३ वर पोहोचली आहे. संशयीत रुग्णांची संख्या चार हजार ६२ वर पोहोचली आहे. मुंबईत गोवर आजाराचा झपाट्यानं फैलाव होत असून, बालकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी केलं आहे. विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिम एक डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

नाशिक जिल्ह्यातल्या गोंदे ते पिंपरी सदो या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं सहा पदरीकरण करण्यासाठी केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. येत्या १८ डिसेंबरला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या सहा पदरी मार्गामुळे नाशिक मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे,संच उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांना समृद्धी महामार्गावरून मुंबईला अत्यंत कमी वेळात जाणं शक्य होणार असल्याचं, गोडसे यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे औरंगाबादहून पैठण आणि पाचोडला जाणाऱ्या महामार्गांवरील वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती.

****

औरंगाबाद - नगर महामार्गावर इसारवाडी फाटा इथं आज सकाळी राज्य परिवहन महामार्गाची बस आणि बैलगाडीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक बैल दगावला. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या मानिकपुंद या गावाचं गिरे कुटूंब ऊसतोडीसाठी जात असतांना नाशिक - औरंगाबाद एस टी बसनं त्यांच्या बैलगाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता इक्वेडोर आणि सेनेगल, नेदरलँड्स आणि कतार, तर रात्री साडे बारा वाजता अमेरिका आणि इराण, वेल्स आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या क्राईस्टचर्च इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

//**********//

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...