आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
भारत जलसप्ताहाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन होणार
आहे. जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयातर्फे आयोजित केला जाणारा हा
सप्ताह पाच नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. जलस्रोतांबाबत जागृती, संवर्धन आणि वापर यासंदर्भात
एकात्मिक दृष्टीने प्रयत्नांसाठी हा सप्ताह आयोजित केला जात आहे.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं
सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
यांच्या अध्यक्षेखालच्या पाच सदस्यीय
घटनात्मक पीठापुढे आज सुनावणी होती, मात्र दोन्ही पक्षांनी
मुदत मागितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
देशात आजपासून डिजिटल
रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होत आहे.
सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी, या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
****
गुजरातमधल्या
मोरबी इथं झुलता पूल कोसळल्याच्या दुर्घटनेसंदर्भात देखरेख आणि व्यवस्थापन
करणाऱ्या कंपनीच्या नऊ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी गुजरातमध्ये
उद्या एक दिवसाचा राज्यस्तरीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
****
केंद्रीय दक्षता आयोगानं कालपासून सहा नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त काल
मुंबईत राजभवनात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची सत्यनिष्ठा
प्रतिज्ञा देण्यात आली.
****
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि त्याच्या
कार्यालयातला लिपिक अल्ताफ पटेल यांना २५ हजार रुपयांची लाच
स्वीकारतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या स्वयंअर्थसहाय्य प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
नाशिक जिल्हा बाजार समितीत काल कांद्याच्या दरात सुमारे
७०० रुपयांनी वाढ झाली. दिवाळीमुळे बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या
काल पासून सुरु झाल्या. सध्या कांद्याला चांगले भाव असले तरी मर्यादित
स्वरूपातच कांदा बाजारात आणावा असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment