Wednesday, 2 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 02.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 November    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून अधिक रोजगार निर्मिती करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन.

·      मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय.

·      जायकवाडी धरणावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचे संकेत.

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर पाच धावांनी रोमहर्षक विजय.

****

कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून अधिक रोजगार निर्मिती करावी, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. पुण्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, स्टार्ट अप्स, वित्तीय अधिकारी यांच्यासह बागायतीशी संबंधित व्यक्ती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतकरी हा सुद्धा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय असल्याचं तोमर यावेळी म्हणाले. तरुणांनी शेती करण्यासाठी प्रेरित व्हावं यासाठी कृषी उत्पादनाच्या व्यापारातला जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांना मिळेल याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष द्यावं, असं तोमर यांनी सांगितलं. त्यांच्या हस्ते यावेळी बागायती प्रदर्शनाचं उद्घाटन तसंच उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

****

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार वर्षाला साठ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था -सारथी अंतर्गत, वसतीगृह आणि शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एनसीईआरटी मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत वार्षिक नऊ हजार सहाशे रूपयांची छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसंच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.

पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्याकरता पन्नास हजार रुपये देण्यात येणार असून, निर्धारित शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क वसतीगृह आणि भोजन शुल्क यांचाही योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. परदेशातल्या पदव्युत्तर तसंच पदवी शिक्षणासाठी दरवर्षी ३० लाख रूपये आणि पीएचडीसाठी ४० लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणाऱ्या १०० मुलांच्या वसतीगृहाच्या कामाला गती देण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे संकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिले आहेत, ते एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलत होते. या प्रकल्पासंदर्भात आपण दिलेल्या प्रस्तावावर गेल्या सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. मात्र आता आपण याचा अभ्यास करत असून, हा प्रकल्प मराठवाड्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –

प्रकल्प होईल. काही अडचण येणार नाहीये. कारण केंद्र शासन पर्टीक्युलरली एनटीपीसी हा प्रकल्प करण्यासाठी उत्सुक आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांनी ताबडतोब सेक्रेटरीला फोन केला. आणि आम्हाला पत्र मिळालं की तुम्ही यावरती स्टडी करा. तर स्टडी करतोय आम्ही. त्यातून प्रकल्प झाला तर मराठवाड्याला खूप फायदा होईल.

****

राज्यातल्या खासगी उद्योगानं दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळ ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र राज्यातल्या संघटीत दूध उद्योगांच्या नफेखोरीमुळे दर कपात झाली असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्याचं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य शासनानं दूध भुकटीला वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला मात्र एक वर्षानंतर अनुदान मिळत नसल्याचं कारण देत खासगी संस्थांनी या योजनेतून माघार घेतली होती.

****

२०२२-२३ या वर्षासाठी इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्यास आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत ४६ रुपये ६६ पैशांवरून ४९ रुपये ४१ पैसे प्रति लिटर करण्यात आली आहे. ही वाढ १ डिसेंबर ते पुढील वर्षी ३१ ऑक्टोबर पर्यंत लागू राहणार आहे.

****

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत नऊ नोव्हेंबर पर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी दाखल केलल्या जामीन अर्जा प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार होती. आता ९ तारखेला ही सुनावणी होणार आहे. गोरेगाव इथल्या पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत १८४ धावा केल्या. के एल राहुलच्या ५०, सूर्यकुमार यादवच्या ३०, विराट कोहलीच्या नाबाद ६४ तर रविचंद्रन अश्विनच्या नाबाद १३ धावा वगळता, कर्णधार रोहित शर्मासह अन्य भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी सात षटकांत बिनबाद ६६ धावा केलेल्या असताना, सामना पावसामुळे थांबवावा लागला.

पाऊस थांबल्यावर १६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघाला १६ षटकांत १५१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं.

बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला, मात्र ठराविक अंतरानं बांगलादेशचे फलंदाज बाद होत गेले, त्यामुळे बांगलादेशचा संघ निर्धारित १६ षटकांत १४५ धावाच करू शकले. विराट कोहली सामनावीर पुरस्काकराचा मानकरी ठरला.

आज सकाळी झालेल्या अन्य एका सामन्यात नेदरलंडने झिम्बॉब्वेचा पाच गडी राखून पराभव केला. झिम्बॉब्वेचा संघ प्रथम फलंदाजी करताना विसाव्या षटकांत ११७ धावांवर सर्वबाद झाला. नेदरलंड संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात १८ व्या षटकातच हे लक्ष्य साध्य केलं.

****

पंढरपूर इथं चार तारखेला होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणारी वाहनं सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहनं सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणारी वाहनं सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपासमार्गे जातील.

कार्तिकी यात्रेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि सोलापूर - पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि विभागाच्या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातली सर्व देशी, विदेशी दारूची सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीचं सिंहासन सोने आणि चांदीचं तयार करण्यात येणार आहे, त्यासाठी भाविकांनी आपापल्या इच्छेनुसार सोने-चांदी आणि रोख रक्कम दान करण्याचं आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी केलं आहे. संस्थानच्या विकास आराखड्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यात तुळजापूरचा विकास आराखडा सादर करण्यात येईल. या अंतर्गत भाविकांसाठी पूरेशा सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

No comments: