Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची
वेळ आली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त,
नवी दिल्लीत आज आयोजित कार्यक्रमाला ते
संबोधित करत होते. सरकारच्या प्रत्येक विभागानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, विश्वास आणि विश्वासार्हता या विकसित राष्ट्र घडवण्यासाठी
महत्वाच्या बाबी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भ्रष्टाचार्यांना
कोणत्याही किमतीत पळून जाऊ देऊ नये तसंच त्यांना शासकीय आणि सामाजिक संरक्षण दिलं जाऊ
नये, असंही त्यांनी नमूद केलं. यंदा ३१ ऑक्टोबर
ते सहा नोव्हेंबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त
भारत विकसित राष्ट्रासाठी’ या संकल्पनेसह दक्षता जनजागृती सप्ताह
पाळला जात आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा
शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
****
राज्य सरकार नोकर भरतीला प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात
राज्यात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याच्या महासंकल्प योजनेतल्या पहिल्या टप्प्यातली नियुक्ती पत्रं, आज मुंबईत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत, मंगलप्रभात लोढा शंभुराज
देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वर्षभरात राज्यात ७५ हजार रिक्त पदं भरली जातील,
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ही राज्यातल्या तरुणांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचं
उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. येत्या आठवड्यात साडे १८ हजार पोलिस भरतीची जाहीरात
निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याचवेळी विभागीय पातळीवरही हा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पात्र उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रं
प्रदान करण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रफितीच्या
माध्यमातून नियुक्तीपत्रं मिळालेल्या उमेदवारांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र
सरकार रोजगार देण्याच्या संकल्पाकडे एका ध्येयाने मार्गक्रमण करत आहे, केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले, यातूनही नवीन संधी
निर्माण होतील, असं पंतप्रधान म्हणाले.
****
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या
पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान
सुरु आहे. रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त
झालेल्या जागेवरून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. मतमोजणी येत्या
रविवारी होणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा
केली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून, एक आणि पाच
डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे. जवळपास पाच कोटी मतदार मतदान करणार असून, ५० टक्के मतदान केंद्रांचं थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे.
****
धुळे जिल्ह्यातून जाणार्या मुंबई -आग्रा
महामार्गावर शिरपूर नजीक सावळदे गावाजवळ तापी नदीवरील पुलावरून मालवाहू आयशर ट्रक नदीपात्रात
कोसळला. आज सकाळी ही घटना घडली. चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्यानं ट्रक पाण्यात
पडल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रकचा सहचालक बचावला असून, तो नदीपात्रातून बाहेर आला आहे. ट्रक चालक पाण्यात बुडाला असून त्याचा तपास सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
शासनाच्या वस्तू आणि सेवाकर विभागाकडून बोगस कर परताव्या
संदर्भात मुंबईतल्या रहमत अली मोमीन, याला अटक करण्यात आली. हा आरोपी दोन कंपन्यांचा संचालक असून
त्याने २३८ कोटी रूपयांची बोगस देयकं जारी
करुन २७ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा
जीएसटी परतावा प्राप्त केला होता. महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
जर्मनीत सुरु असलेल्या हायलो खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष दुहेरीत भारताचे सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तसंच एम आर अर्जुन
आणि ध्रुव कपिला यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय आणि
महिला एकेरीत मालविका बनसोड पहिल्या फेरीत विजयी झाले, तर सायना नेहवालचा पहिल्या फेरीत
पराभव झाला.
****
जॉर्डन इथं सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत
भारताच्या मोहम्मद हसमुद्दीन आणि लक्ष्य चहर यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला
आहे. हसमुद्दीननं ५७ किलो वजनी गटात किर्गिस्तानच्या, तर चहरनं ८० किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या
खेळाडुचा पराभव केला.
//**********//
No comments:
Post a Comment