आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता
सप्ताहानिमित्त, नवी दिल्लीत
आज आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली
पोर्टलचा शुभारंभ देखील करणार आहेत.
****
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या
पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. या जागेवर महाविकास आघाडीकडून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके
यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बिहारमध्ये दोन तर हरियाणा, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि ओडिशा राज्यात प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी
देखील आज मतदान होत असून, मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं काल ओडिशातल्या
एपीजे अब्दुल कलाम बेटावर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. बीएमडी इंटरसेप्टर एडी
-वन असं या क्षेपणास्त्राचं नाव असून त्यासाठी खास नियंत्रण प्रणाली
विकसित करण्यात आली आहे. लक्ष्याचा माग घेत त्याचा अचूक भेद करण्याची या क्षेपणास्त्राची
क्षमता आहे.
****
औरंगाबादहून अवैधरित्या गुजरातला जाणारा
रेशनिंगच्या तांदळाचा ट्रक काल धुळे पोलिसांनी पकडला. सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकानं चाळीसगांव चौफुलीवर सापळा रचून
ही कारवाई केली. या ट्रकमधून चार लाख ६४ हजार ४२८ रुपये किंमतीचा
रेशनिंगचा तांदुळ हस्तगत करण्यात आला.
****
सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातल्या कनिष्ठ लिपिक अश्विनी बडवणे यांना
साडे चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. निवृत्तीवेतनाशी
निगडित एका प्रकरणात त्यांनी ही लाच मागितली होती.
****
सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद
खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी विजेतेपद पटकावलं.
अंतिम सामन्यात किशोर संघानं कर्नाटकचा १३ - सात असा एक डाव सहा गुणांनी, तर
किशोरी संघांनं कर्नाटकचा नऊ - पाच असा एक डाव चार गुणांनी पराभव केला. कर्णधार राज जाधव आणि धनश्री कंक हे सर्वोत्कृष्ट भरत आणि इला पुरस्काराचे
मानकरी ठरले.
//*********//
No comments:
Post a Comment