Friday, 4 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यातल्या झल्लाव इथं कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला. वीस दिवसांपासून काही मजूर अमरावतीच्या काही भागात विविध कामं करण्यासाठी आले होते. ते मध्यप्रदेशात गावी परत जात असताना आज पहाटे हा अपघात झाला. तवेरा चालकाला झोप आली असावी आणि यातून बसवर कार धडकली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास मध्य प्रदेश पोलीस करत हेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

****

राज्यातल्या बळीराजाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे, असं साकडं विठूरायाला घातल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर ते बोलत होते. पंढरीच्या वारीची कुठलीही परंपरा खंडित न करता पंढरपुरच्या विकास आराखड्याचं काम हातात घेतलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मंदिर संवर्धनाचं काम तत्काळ हातात घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

दरम्यान, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पंढरपूर ते घुमान सायकल आणि रथ यात्रेचा शुभारंभ आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. संत नामदेव महाराजांनी चालत जावून भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत पोहोचणार आहे. यनिमित्ताने पंढरपूर-घुमान यांचं पुन्हा एकदा नातं तयार होणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

****

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला असून, दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. राज्यात इतर ठिकाणच्या विठ्ठल मंदीरांमध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

****

शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर होत असून, त्याआधी पवार वार्ताहरांशी बोलत होते. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, असं वाटत नाही, असं पवार यावेळी म्हणाले.

****

जनावरांमधील लंपी चर्मरोगाचं नियंत्रण आणि रोगमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या सात तारखेपासून संपूर्ण राज्यात 'माझा गोठा स्वच्छ गोठा' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महिनाभराच्या या मोहिमेअंतर्गत गोठ्याच्या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथकं तैनात केली जाणार असून, जनावरांचं लसीकरणही केलं जाईल, तसंच लंपी किंवा तत्सम आजारपणात जनावरांची घ्यायची काळजी याबद्दलचं प्रशिक्षण पशुपालकांना दिलं जाईल.

****

लातूर मधल्या मळवटी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्याचं बॉयलर अग्नीप्रदीपन काल कारखान्याच्या अध्यक्ष  वैशाली  देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. या कारखान्यातल्या ट्वेंन्टिवन शुगर्स लिमिटेड युनीट क्रमांक एक चा पहिला गळीत हंगाम विक्रमी झाला असून, १३ लाख ५२ हजार क्विंटल साखर पोत्याचं उत्पादन केलं आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

****

दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना आवश्यक विविध प्रमाणपत्र देण्यासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात विशेष शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल या शिबिराला भेट देऊन पाहणी केली. या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत राजीव गांधी निराधार योजनेअंतर्गत ९२९ आणि बालसंगोपनचे १४३ प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आले.

****

दक्षिण कोरियाच्या चेओंग्जू इथं सुरु असलेल्या आशियाई स्क्वॅश सांघिक स्पर्धेत भारत आज आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी खेळणार आहे. सौरव घोषाल, अभय सिंग, रमित टंडन आणि वेलावन सेंथिल कुमार यांचा समावेश असलेल्या संघानं उपान्त्य फेरीत मलेशियाचा दोन - एक असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची लढत कुवेतशी होणार आहे. भारतीय महिला संघाला उपान्त्य फेरीत मलेशियाकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

जर्मनीत सुरु असलेल्या हायलो बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांतनं उप-उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतने फ्रान्सच्या अरनॉड मर्कलचा ११ - २१, २१ - १३, २१ - १० असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं स्कॉटलंडच्या खेळाडुचा पराभव करुन उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

//**********//

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...