Friday, 4 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा, मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे दाम्पत्याला मान

·      महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प मंजूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राज्यामध्ये पात्र उमेदवारांना विभाग निहाय नियुक्तीपत्रांचं वाटप  

·      मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत ३१ पूर्णांक ७ टक्के मतदान

·      गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, आठ डिसेंबरला मतमोजणी

·      बुलढाणा जिल्ह्यात मोटार चालवण्यास शिकवताना नियंत्रण सुटून मोटार विहीरीत कोसळली. दोन जणांचा पाण्यात बुडून तर विहीरीतल्या गाळात फसून अन्य एकाचा मृत्यू

आणि

·      टी -ट्वेंटी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघावर ३३ धावांनी विजय मिळवत पाकिस्तान संघाचं स्पर्धेतलं आव्हान कायम

****

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड खुर्द गावातले उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. या यात्रेसाठी दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. सध्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी रांग असून, दर्शनासाठी १० ते १२ तासांचा अवधी लागत आहे. राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावं, वारकरी, भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचं पुनर्वसन करण्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे, अन्नदाता शेतकरी राजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असं साकडं त्यांनी विठ्ठलचरणी घातलं आहे.

****

केंद्र सरकारनं महाराष्ट्रात दोन लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प मंजूर केले असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याच्या महासंकल्प योजनेतल्या पहिल्या टप्प्यातली नियुक्ती पत्रं, काल मुंबईत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधानांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. यावेळी रोजगार मिळालेल्या तरुणांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले.

नमस्कार. मी सर्वात आधी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्यापैकी काही लोकांना नियुक्तीपत्र प्रदान होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. मी यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो.

महाराष्ट्र शासन राज्यातला बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्यानं सोडवत असून, अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी युवकांसाठी उपलब्ध करुन देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढले. देशभरात दहा लाख रोजगार देण्याच्या उपक्रमात महाराष्ट्र शासनानं कमी वेळात केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.

महाराष्ट्रासाठी ७५ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. असे प्रकल्प उभे राहिले की रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतात. मुद्रा योजनेद्वारे तरुणांना २० लाख कोटी रुपयांचं कर्ज यापूर्वीच वितरित केलं आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनाही त्याचा लाभ झाला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

या कायर्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यामध्ये पात्र उमेदवारांना विभाग निहाय नियुक्तीपत्रं देण्यात येणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले:

तरुणांना रोजगार द्यायचं आणि म्हणून हा रोजगार मेळावा आपण सुरू केला आहे. एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यात आपण जवळपास दोन हजारांपेक्षा जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या आपण या ठिकाणी देत आहोत. सहाशे नियुक्त्या इथं होतील. बाकी विभागवाईज आपल्या त्याठिकाणी होतील. आणि जसं पोलिस खात्यामधील देखील अठरा वीस हजार नोकऱ्या. ग्रामविकासमध्ये जवळपास दहा हजारांच्यापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आपण सगळ्याचं विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय एमपीएससीच्या माध्यमातून देखील आणि इतर ज्याकाही महत्वाच्या दोन एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागवाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे.

लवकरच १८ हजार ५०० उमेदवारांची पोलीस विभागात, तर १० हजार ५०० उमेदवारांची ग्रामविकास विभागात भरती करण्यात येणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३१६ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. नाशिक विभागात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ४५६ उमेदवारांना, औरंगाबाद विभागात रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते २३८ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

****

मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल ३१ पूर्णांक ७ टक्के मतदान झालं. २५६ मतदान केंद्रांवर हे मतदान करण्यात आलं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारानं यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.

****

गुजरात राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची काल केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. राज्यात दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असून आगामी १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर आठ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी दिली. निवडणूक वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात गुजरातच्या पूर्व आणि दक्षिण भागातील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात मध्य गुजरातमधील विधानसभेच्या ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

****

व्यवसाय शिक्षण तसंच प्रशिक्षण संचालनालयाकडून एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत, `सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आणि अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आय टी आय मध्ये संपर्क साधावा, असं आवाहन लोढा यांनी केलं आहे.

****

महिला पत्रकारानं कपाळाला टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा सादर करण्याबाबत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, शिवप्रतिष्ठान संघटेने अध्यक्ष संभाजी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असतो, आपलं वक्तव्य स्त्री सन्मानता आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचवणारं आहे, आपल्या वक्तव्याबाबत समजातल्या सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतली असून, या संदर्भातल्या आपल्या भूमिकेचा खुलासा महिला आयोग कायद्यानुसार तात्काळ सादर करावा, असं चाकणकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारचे महिलांच्या हिताचे विविध निर्णय राज्यातल्या महिलापर्यंत पोहचण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ, असं वाघ यांनी या नियुक्तीनंतर म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर आजपासून शिर्डी इथं सुरु होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या शिबिरात उपस्थित राहणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खरीप पिकांचं परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यानं, जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन सादर केलं. मागील तीन - चार वर्षांपासून मराठवाडा सातत्यानं अतिवृष्टीचा सामना करत आहे. यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं विभागातली १९ लाख हेक्टरवरची पिकं बाधित झाली असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

****

जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामध्ये जालना जिल्ह्यातल्या सहा हजार ८९८ शेतकऱ्यांचं दोन हजार ३११ हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीपिकांचं नुकसान झालं. तर ऑक्टोबरमधल्या अतिवृष्टीत चार लाख २४२ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून, पाच लाख ९८ हजार ६९६ शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम अहवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नुकताच विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला आहे. जुलै आणि ऑगस्टमधल्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून ३७१ कोटी ८४ लाख प्राप्त झाले असून त्याचं वितरण सुरु आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर क्षेत्राशी संबंधित विकास कामांना गती देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांची जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामं विहित कालावधीत आणि दर्जेदार होण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त ५० वीज रोहीत्रांची खरेदी करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, आदी सूचना महाजन यांनी यावेळी दिल्या.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या बहादरपूरा ते फुलवळ मार्गावरची वाहतूक मन्याड नदीवरील पुलाचं काम सुरु असल्यानं बंद करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. येत्या १९ तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

****

बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा इथं अनियंत्रित चारचाकी विहिरीत कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. काल दुपारी हा अपघात झाला. देउळगावराजा इथले शिक्षक अमोल मुरकुट हे त्यांची पत्नी स्वाती मुरकुट यांना मोटार चालवण्यास शिकवत होते. चिखली रोडवर स्वाती यांनी ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यानं मोटारीवरचं त्यांचं नियंत्रण सुटून कार ९० फूट खोल विहिरीत पडली. यात स्वाती मुरकुट आणि कारमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमोल मुरकुट जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत करार करण्यात येणार असून, येत्या सहा महिन्यात शहरात ३५ इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात येतील, असं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी सांगितलं आहे. हा करार दहा वर्षांसाठी असून, त्यानंतर त्या वेळच्या परिस्थितीनुसार अजून दोन वर्ष वाढवता येऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद महानगर पालिकेअंतर्गत होणाऱ्या विकास कामांचा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आढावा घेतला. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत फुलसे यांचं काल अल्पशा आजारामुळे निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. उस्मानाबाद शहरातल्या समर्थ अर्बन बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष तसंच नगर वाचनालयाचे संचालक आणि समता सोसायटी चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. समता प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे  नगरसेवक म्हणून ते विजयी झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर उस्मानाबाद शहरातील कपिलधार स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी -ट्वेंटी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिका संघाचा ३३ धावांनी पराभव करून स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. सिडनी इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं २० षटकात ९ बाद १८५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या ९ षटकात ४ बाद ६९ धावा झाल्या असताना पावसानं व्यत्यय आणला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १४ षटकांत १४२ धावांच लक्ष्य देण्यात आलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १०८ धावाच करु शकला.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यापीठ विकास मंचनं एका निवेदनाद्वारे काल केली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुका आणि त्या संदर्भातली प्रक्रिया विद्यापीठानं सुरू केली आहे. मात्र विद्यापीठाचे कुलसचिव आणि निवडणूक विभाग यांच्यात विसंवाद असल्यानं मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

****

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ओडिशातल्या ब्रह्मपुर ला जाण्याकरता नांदेड ते ब्रह्मपुर दरम्यान चालू महिन्यात विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. ५, १२, १९ आणि २६ तारखेला नांदेड रेल्वेस्थानकातून दुपारी तीन वाजून २५ मिनिटानी ही विशेष रेल्वे रवाना होईल, आणि दुसऱ्या दिवशी अडीच वाजता ब्रम्हपूर ला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी, १३, २० आणि २७ नोव्हेंबर ला ब्रम्हपूर रेल्वेस्थानकातून दुपारी साडे चार वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी पावणे चार वाजता नांदेडला पोहोचेल.

****

No comments: