Friday, 4 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या बळीराजाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे, असं साकडं विठूरायाला घातल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर ते बोलत होते. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड खुर्द गावातले उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

****

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला असून, राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. राज्यात इतर ठिकाणच्या विठ्ठल मंदीरांमध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

****

कोविड आपत्तीनंतर स्वदेशी लस विकसित करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचं जगभरातून कौतुक होत असल्याचं, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे आयोजित आरोग्य आणि जैव-वैद्यकीय विज्ञान संशोधन या विषयावरच्या परिषदेत ते काल बोलत होते. पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. यामुळे भारतात संशोधन आणि विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. 

****

मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बदलून ते महाराष्ट्र उच्च न्यायालय असं करण्याची मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. हा निर्णय संसदेनं घ्यायचा असून संसदीय कामकाजात आपण हस्तक्षेप करू शकत नाही असं न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या पीठानं याचिका फेटाळतांना स्पष्ट केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते वसमत राज्य रस्त्यावर असलेल्या शिरडशहापूर जवळील चौकीच्या मारोतीजवळ एका अज्ञात वाहनानं ऑटो आणि स्कूल बसला धडक दिली. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले असून, तिघांना किरकोळ मार लागला आहे. या अपघातामुळे या रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

//*********//

No comments: