Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 02 April
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
·
वीज दरात वाढ करण्याची
राज्य वीज नियामक आयोगाची
वीज वितरण कंपन्यांना परवानगी
·
उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘ई-समाधान’ पोर्टल सुरू
· खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा मृत्यू
· मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा नांदेडमधून शुभारंभ
·
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा तर
भारतीय जनता पार्टीची स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
· अनुसुचित जमातीचं जात प्रमाणपत्र तपासणी प्रकरण निकाली न काढल्याबद्दल ३५
अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि
लखनौ संघाची विजयी सुरुवात
****
राज्य वीज नियामक आयोगानं राज्य वीज वितरण कंपनीसह मुंबईला वीजपुरवठा
करणाऱ्या बेस्ट, टाटा
पॉवर, अदानी इलेक्ट्रीसिटी या
कंपन्यांना वीज दरात वाढ करण्याची परवानगी दिली आहे. राज्य वीज वितरण वीज कंपनीला
२०२३-२४ या वर्षासाठी सरासरी तीन टक्के तर २०२४-२५ या वर्षासाठी सरासरी साडे पाच
टक्के वीज दरवाढीची परवानगी दिली आहे. या दरवाढीमुळे येत्या दोन वर्षात जवळपास ३९
हजार कोटी रुपयांची तुट भरुन निघणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना ही वीज दरवाढ लागू असेल.
कृषी क्षेत्राच्या वीज ग्राहकांसाठी वेगळी वीज कंपनी तयार करण्याचंही राज्य वीज
नियामक आयोगानं राज्य सरकारला सूचित केलं आहे.
****
देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी
आता एक खिडकी पद्धतीने ‘ई-समाधान’ पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. रॅगिंग सह, शैक्षणिक-अशैक्षणिक समस्या, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील अन्य तक्रारी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान
आयोगानं हे नवीन पोर्टल कार्यान्वित केलं आहे. यापूर्वी वापरली जाणारी तक्रार
निवारण प्रणाली बंद करण्याचा निर्णय आयोगानं घेतला असून प्रलंबित तक्रारीही या
पोर्टलद्वारे सोडवल्या जाणार असल्याचं आयोगानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
****
खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, यासंदर्भात संपूर्ण तपास करून कारवाई होईल, असं गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले…
‘‘संजय राऊत यांना
जी धमकी आलेली आहे, त्या संदर्भात माणूस आयडेंटीफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असा
आहे की दारूच्या नशेमध्ये त्याने अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि, हा केवळ प्राथमिक
अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. आणि कोणीही
धमकी दिली असेल तर कारवाई होईल. जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार
नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी पाच वर्ष सांभाळलेलं आहे. आताही जे लोकं इल्लीगल
कामं करतील त्यांना सोडणार नाही.’’
दरम्यान, या धमकीप्रकरणी पुणे
पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एकाला ताब्यात घेतलं आहे. राहुल तळेकर असं त्या
व्यक्तीचं नाव असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
लोकप्रतिनिधींना वारंवार धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. याचा
अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा
नाही का, असा प्रश्न राष्ट्रवादी
काँग्रेसच्या पक्षाचे
नेत्या खासदार सुप्रिया
सुळे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांना एका व्यक्तीनं
फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली, त्या
पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी एका ट्विट संदेशातून ही अतिशय गंभीर बाब असल्याचं
म्हटलं आहे. सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेऊन राऊत यांना आवश्यक ती सुरक्षा
पुरवण्याची गरज असल्याचं, सुळे
यांनी म्हटलं आहे.
****
मुंबई पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलानं पकडलेल्या बोटीत कोणीही
पाकिस्तानी खलाशी नाहीत, हा
प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन
मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. या बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या
संशयावरून काल सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड
आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचं समोर आलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याच्या मुसपर्शी गावाजवळच्या जंगलात काल
सकाळी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सी-६० पथकाचे
जवान मुसपर्शी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी त्यांच्यावर
गोळीबार केला. याठिकाणी नक्षल्यांच्या ३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही
पोलिसांनी जप्त केलं आहे.
****
शिक्षण हक्क कायदा -आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन
सोडत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. आरटीईनुसार खासगी
शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के
जागा राखीव ठेवल्या जातात. या प्रक्रियेतंर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता
ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ते स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील
आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६५ हजार १२५
विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
****
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात आय पी पी बी, या टपाल खाते संचालित बँकेनं, आपल्या
ग्राहकांसाठी व्हॉटस्अॅप बँकिंग सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता
आपल्या मोबाईल फोनद्वारे बँकेचे व्यवहार करणं शक्य होणार आहे. घरपोच सेवा, जवळचं टपाल ऑफिस शोधणं आणि इतरही सेवा या सुविधेद्वारे
उपलब्ध होणार आहेत.
****
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन तपासणी यापुढे स्वयंचलित पद्धतीनं करण्यात
येणार असून यानंतर वाहनांना योग्यतेचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. यासाठी
राज्यभरात २३ स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्रं सुरू होणार आहेत. राज्य
सरकारने यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा आदेशही काढण्यात आला
आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयात ही केंद्रं मार्च २०२४ अखेरपर्यंत सुरू करण्यात
येणार आहेत.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा काल राज्याचे सांस्कृतिक
कार्य, वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
नांदेड इथं शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्याइतकंच मराठवाडा मुक्ती संग्राम
लढ्याचं मोल महत्त्वपूर्ण असल्यांचं असल्याचं त्यांनी यावेळी बोलतांन सांगितलं.
मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी दोन वेळेस लढा द्यावा लागला. पहिला लढा हा
ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्याचा तर आपल्या संस्थानाला स्वतंत्र देशात
निर्माण करू पाहणाऱ्या निजामाशी दुसरा लढा मराठवाड्यानं दिला असल्याचं ते म्हणाले.
“चला
जाणुया नदीला” या उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रा तसंच जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी
नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदीचा गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभही
मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झाला. नदी संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत
महत्वाचा असून प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण संवर्धनात आपलं कर्तव्य ओळखून योगदान
द्यावं, असं मंत्री मुनगंटीवार
म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची
वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई
यांनी काल या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
मेहनत घेतली असून, या
सभेल मोठा जनसमुदाय असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या राज्य शासनानं छत्रपती
संभाजीनगरचे प्रश्न रेंगाळून ठेवलं आहेत, पाणीपुरवठा योजना, रस्ते
या सारख्या योजना रखडल्या असून त्यांना सरकारनं गतिमान करण्याची गरज असल्याचं
देसाई म्हणाले.
****
मराठवाड्यात आजपासून
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री
डॉ. भागवत कराड आणि यात्रेचे मराठवाडा विभाग प्रमुख आमदार संभाजी निलंगेकर यांनी
काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष -
शिवसेनेतर्फे काढण्यात येणाऱ्या या गौरव यात्रेला छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
समर्थनगर भागातून सुरुवात होणार असल्याचं डॉ. कराड यांनी यावेळी सांगितलं. ही यात्रा
मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा
आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.
****
धाराशिव इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार कैलास
घाडगे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बेशरमाची फुलं देत निषेध करण्यात आला.
सततच्या पावसानं खरीप पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च पूर्वी अनुदान
देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र
अजुनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे निषेध करत असल्याचं आमदार पाटील यांनी
सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची विशेष तपास
पथकामार्फत तपास सुरु आहे. या पथकानं काल आणखी चार दंगलखोरांना गजाआड केलं. परवा
सात जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात ओहर इथं झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या
सर्व दंगेखोरांना उद्या तीन तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
अनुसुचित जमातीचं जात प्रमाणपत्र तपासणी प्रकरण निकाली न काढल्याबद्दल छत्रपती
संभाजीनगर इथं अनुसूचित जमाती जात-प्रमाणपत्र पडताळणी समितीत काम केलेल्या ३५
अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रत्येकी पाच हजार
रुपये दंड ठोठावला आहे. एका महिलेनं अनुसूचित जात प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज केला
होता. २०१६ पासून आतापर्यंत हा अर्ज निकाली निघाला नाही, न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल गेल्या सात वर्षांत या समितीवर काम
केलेल्या ३५ अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यात महापालिका प्रशासनानं मालमत्ता करासाठी लघु आणि मध्यम
उद्योगांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ संतप्त उद्योजकांनी काल
कामबंद आंदोलन पुकारलं. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष विजय वरपुडकर, सचिव प्रमोद वाकोडकर यांच्यासह उद्योजकांनी या मोहिमेवर
तीव्र आक्षेप नोंदवला. एमआयडीसीचा परिसर महापालिकेत समाविष्ट नसून एमआयडीसीकडे कर
अदा करत असतांना महापालिकेकडे कर भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगत मालमत्ता
कर अदा न करण्याची भूमिका उद्योजकांनी घेतली.
****
कृषि पंपांना दररोज वीज पुरवठा व्हावा यामागणीसाठी छत्रपती संभाजीनगर मधील
गंगापूर तालुक्यातील सोलेगाव इथल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या सोलेगाव - ढोरेगाव
उपकेंद्रासमोर काल मोर्चा काढत आंदोलन केलं. शेतकऱ्यांना एक दिवसाआड होणाऱ्या वीज
पुरवठ्याचा, शेतातील पिकांवर परीणाम होत
असल्याचं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं.
****
इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मोहाली इथला सामना पंजाब
किंग्जनं जिंकला आहे. नाणेफेक जिंकून कोलकता नाईट रायडर्सनं क्षेत्ररक्षणाचा
निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जनं निर्धारित २० षटकात ५ गडी बाद १९१
धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना, कोलकाता नाइट रायडर्सनं १६ षटकात ७ बाद १४६ धावा केल्या. मात्र पावसामुळं खेळ
थांबवावा लागला. त्यानंतर पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबला विजयी घोषित
केलं.
या स्पर्धेतल्या लखनौ इथं झालेल्या अन्य सामन्यात, लखनौ संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी
करत लखनौ संघानं निर्धारित २० षटकात १९३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना
दिल्ली कॅपिटल्स चा संघ २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावाच करु शकला.
****
माद्रिद मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत
धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात सिंधूनं सिंगापूरच्या
प्रतिस्पर्ध्याचा २२-२०, २४-२२
असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त
विभागप्रमुख प्रा. डॉ. जयंत शेवतेकर यांची संगीत नाटक अकादमीच्या संशोधन आणि
प्रकाशन या विभागाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
संगीत-नाटक अकादमीच्या अध्यक्षा तथा डब्ल्यु-२० च्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा
यांच्या निर्देशानुसार सचिवांनी ही नियुक्ती केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज ‘अहिंसा
रन’ चं आयोजन करण्यात आलं आहे.
भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या निमित्तानं भगवान महावीर यांच्या 'जगा आणि जगु द्या' या संदेशाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सकाळी साडे पाच वाजता कर्णपुरा
मैदान इथं या रन चं आयोजन करण्यात आलं आहे. 'अहिंसा रन' हे महिला आणि पुरुष
यांच्यात ३ किलोमीटर, ५
किलोमीटर, १० किलोमीटर अशा तीन
स्तरांवर होणार आहे. तसंच विजेत्यांना दोन लाखांपर्यंतची बक्षिसं देण्यात येणार
आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील शेंद्रा परिसरात ९ ते १२ एप्रिल दरम्यान
मांगीरबाबा यात्रा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना
यात्रेदरम्यान आरोग्य, स्वच्छता
आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ.
अनंत गव्हाणे यांनी काल आढावा बैठकीत दिले.
****
No comments:
Post a Comment