Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 April
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
·
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी
भारतीय जनता पक्ष - शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ
·
देशाची अध्यक्षीय हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांची छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत टीका
·
देशात जोपर्यंत द्वेषाचं राजकारण संपत नाही, तोपर्यंत दंगली घडण्याचे प्रकार होत
राहतील- ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांचं मत
·
किराडपुरा दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक
·
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कोविडग्रस्त महिलेचा मृत्यू
·
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी आणि मराठवाड्यातले नामांकित प्लास्टिक सर्जन डॉ. अविनाश येळीकर यांचं निधन
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयी
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष - शिवसेनेच्या सावरकर
गौरव यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत
सहभागी झाले होते. त्यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत
सहभागी झाले आहेत. ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त
करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद
केलं. ते म्हणाले...
‘‘या महाराष्ट्रातील, देशातील
जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून सावरकरांचा आपमान कोणीही खपवून घेणार नाही. याची सुरुवात
या गौरव यात्रेमधून सुरु झालेली आहे. प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं
काम आपण केलं आहे. असा कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये सुरु राहणार आहे. आणि यामुळेच
खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी,
देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे.’’
मुंबई इथं काल दादर इथल्या सावरकर
सदनातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष
शेलार, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते
या यात्रेत सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर इथं समर्थनगर
परिसरातल्या सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या गौरव यात्रेला प्रारंभ झाला. केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे,
आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. सावरकरांची गाणी ऐकवत शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण केलेल्या
या यात्रेचं नागरिकांनी फुलं उधळून स्वागत केलं. ही यात्रा मराठवाड्याच्या सर्व शहरात
जाणार आहे.
****
आपल्या देशाची अध्यक्षीय हुकूमशाहीकडे
वाटचाल सुरू असल्याची टीका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल छत्रपती
संभाजीनगर इथं महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर
कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले..
‘‘संपूर्ण देशामध्ये तुम्हाला
एक विधान एक निशान हाच धोकादायक विचार आहे. या देशातली लोकशाही संपवून टाकायची. आपल्या
पक्षाखेरीज एकही पक्ष या देशात शिल्लक राहता कामा नये. राहीला तर तो ठेचून टाकायचा,
मारुन टाकायचा, तुरुंगात टाकायचे नेते आणि आमचा नेते तिकडे बसवायचा. ही आपली देशाची
अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे. सावकरांची यात्रा काढताय काढा
पण सावरकरांचे जे स्वप्न होतं, अखंड हिंदुस्थान, आहे तुमच्याच वरती बसलेल्यांच्यात
हिंमत आहे.’’
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व
आहे, शेंडी जानव्याचं हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपनं
शिवसेना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा संदर्भ देत, देशात इतरही राज्यात भाजपनं
अशीच सरकारं पाडल्याची आणि स्वत: सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
या सभेला विरोधी
पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष
मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याला राज्य सरकार प्रतिसाद देत नाही, हे सरकार मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान करत असल्याची टीका, अजित पवार यांनी केली. ते म्हणाले:
‘‘मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या
लढ्यामध्ये ज्यांची नेतृत्व केलं, अनेकांची नावं घेता येतील. यांचं आपण स्मरण केलं
पाहिजे, यांची आपण आठवण केली पाहिजे. जसं आपण स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा केला
वर्षभर, तशा पद्धतीनं हा ही कार्यक्रम साजरा केला पाहिजे. परंतू तशा प्रकारचा प्रतिसाद
या राज्य सरकारने दिला नाही.’’
सावरकरांबद्दल
आदर आहे तर त्यांना अद्याप भारतरत्न का दिला नाही, असा सवालही
पवार यांनी केला.
महाविकास आघाडी
सरकारने कोरोना संकट ज्याप्रकारे हाताळलं, त्यामुळे आपला अडीच वर्षाचा कालखंड इतिहासात
नोंद होण्यासारखा होता, असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यावर कारवाई
करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे
स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते.
****
शास्त्रज्ञांनी भविष्यातला दृष्टिकोन
अंगीकारून देश तसंच समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रीत संशोधन करावं,
असं आवाहन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं इंडियन
वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या, 'वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप- वाईस 2023, या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिद्ध झालेलं तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता,
आर्थिक व्यवहार्यता तसंच विपणन क्षमता, या चार गोष्टींशिवाय संशोधनाला महत्त्व नसल्याचं
गडकरी यांनी नमूद केलं. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संशोधनातल्या
नव-नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हातभार लावण्याचं आवाहन गडकरी
यांनी केलं.
****
भारतानं ८५ हून अधिक देशांना
सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करुन, एक विक्रमी उच्चांक
प्रस्थापित केला आहे. गेल्या सहा वर्षात देशाची या क्षेत्रातली निर्यात १० पट वाढली
असून, सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झालं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या
ट्विट संदेशात म्हटलं आहे. देशाला संरक्षण सामुग्री उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार
सर्वतोपरी मदत करेलं, असंही त्यांनी सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही,
हे यश महत्त्वपूर्ण असून, या क्षेत्रातली निर्यात सतत वाढत राहील असं म्हटलं आहे. देशातल्या
शंभरहून अधिक कंपन्या सध्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण
मंत्रालयानं दिली. देशातून ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, रडार,
पिनाक रॉकेट आणि लाँचर आदींची निर्यात होत आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
- इसरोनं पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहीम काल कर्नाटकात
यशस्वीरित्या पार पाडली. चित्रदुर्ग इथल्या चाचणीतळावर काल सकाळी आर एल व्ही एल व्ही
एक्स वायू दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे, साडेचार किलोमीटर उंचीवरून ही चाचणी घेण्यात
आली. गती, समुद्र सपाटीपासूनची उंची अशा विविध दहा निकषांवर ही चाचणी यशस्वी ठरली.
****
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला
आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची काल एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत
जिल्हास्तरावर रुग्णालयाची तयारी, औषध साठा, तसंच इतर साधनसामुग्रीच्या तयारीचा आढावा
घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कोविडच्या तयारीबाबत १० आणि ११ एप्रिलला मॉकड्रील
घेण्यात यावी, तसंच प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना, आरोग्य
सचिवांनी या बैठकीत दिल्या. कोविड निदान तसंच उपचाराची सोय शासकीय रुग्णालयांमध्ये
उपलब्ध आहे. लक्षणं सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात,
शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत
अलगीकरणात राहण्याची सूचनाही नागरिकांना करण्यात आली आहे.
****
नांदेड इथं गोदावरी नदीवरच्या
बंदा घाटावर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समता पर्वाचं
उद्घाटन करण्यात आलं. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या विविध
योजनांची आणि उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशनही मुनगंटीवार यांच्या
हस्ते झालं. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून
एक एप्रिल ते एक मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या समता
पर्वाच्या निमित्तानं नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं जातीचे
दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेलाही प्रारंभ झाला.
****
देशात जोपर्यंत द्वेषाचं राजकारण
संपत नाही, तोपर्यंत दंगली घडण्याचे प्रकार होत राहतील, असं मत ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते
तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल शहरातला सामाजिक तणाव
आणि नागरीक म्हणून आपली जबाबदारी या विषयावर राज्यस्तरीय बैठक पार पडली, त्यावेळी गांधी
बोलत होते. आपण सजग नागरीक म्हणून राजकारणाच्या कोणत्याच वक्तव्याला बळी पडू नये, असं
आवाहन त्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या
दिवशी किराडपुरा इथं झालेल्या दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सायबर सेलच्या
मदतीनं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दंगलीतल्या हल्लेखोरांची ओळख पटवून अटक करण्यात
येईल, आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली असून, त्यातल्या २८ जणांना अटक केली
आहे, काही लोक फरार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल एका
कोविडग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. उस्मानपुरा पीरबाजार इथली रहिवासी असलेल्या या महिलेवर
एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, काल शहरात सात नवीन
रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ४७ वर
पोहचली आहे. नागरिकांनी घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, मास्क वापरावा,
सॅनिटायझर वापर करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी
यांचं काल गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी
भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३
साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी
यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे
कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं,
ते ६७ वर्षांचे हेाते. मराठवाड्यातले नामांकित प्लास्टिक सर्जन म्हणून ते प्रसिद्ध
होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल
नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. येळीकर यांच्या
पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले
आहे. किल्लारी इथल्या शासकीय जमीनीवर अतिक्रमणासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगानं
खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. किल्लारी इथल्या भूकंप पुनर्वसनानंतर शासकीय जमिनीवरील
अतिक्रमण हटवण्यासंदर्भात रहिवासी सुधीर सगर यांनी याचिका दाखल केली होती. शासकीय जमीनीची
काळजी घेण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असून, खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून
शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
****
उस्मानाबादचं नाव धारासूर या
राक्षसाच्या नावावरुन धाराशिव करण्याच्या विरोधात दोन नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात
दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि
न्यायमूर्ती एस.व्ही. मारणे यांनी सुनावणी घेतली, या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या
२० एप्रिलला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
कन्नड तालुक्यातल्या कोळवाडी इथल्या जीवरख महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करण्याचा
निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या महाविद्यालयानं परस्पर केंद्र
बदलल्याचा प्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास येताच, त्यांनी या संदर्भातला अहवाल परीक्षा
विभागाला सादर केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आजपासून या केंद्रावरच्या विद्यार्थ्यांच्या
परीक्षा कन्नड इथल्या शिवाजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथं होणार असून,
विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था संबंधित महाविद्यालयानं करावी, असे आदेश देण्यात
आल्याची माहिती, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
****
भारताची बॅटमिंटनपटू पी. व्ही.
सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल
झालेल्या अंतिम फेरीत तिचा इंडोनेशियाच्या ग्रोगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं २१-८,
२१-८ असा पराभव केला.
****
इंडियन प्रीमियर लीग- आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव
केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत पाच बाद २०३ धावा केल्या. या लक्ष्याचा
पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित षटकांत आठ बाद १३१ धावाचं करू शकला.
अन्य एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स
बंगळुरु संघानं मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या
संघानं दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य बंगळुरुच्या संघानं सोळाव्या षटकातच साध्य केलं.
****
जालना शहरात आठ ते तेरा एप्रिल
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्याख्यानमालेचे
अध्यक्ष दीपक धामने आणि सचिव राजेश राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment