Tuesday, 4 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड वर्धक मात्रा देण्यासंदर्भात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल.

·      महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप.

·      जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्राने भागवावी-वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांची अपेक्षा.

आणि

·      भगवान महावीर यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून साजरी.

****

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्याचं धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. विधीज्ञ धृती कपाडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सत्तावीस तारखेला सुनावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेत लसीच्या दोन मात्रा यशस्वीपणे देण्यात आल्या, मात्र काही महिन्यांनी या मात्रांची परिणामकारकता कमी होत असल्यानं वर्धक मात्रा घेण्याचा सल्ला सगळे तज्ज्ञ देतात, याकडे या याचिकेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांपेक्षाही कमी असल्याचं दिसून येत आहे.

****

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातल्या, महाराष्ट्र् शासनानं दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बीदर जिल्ह्यांतल्या आठशे पासष्ट गावातल्या नागरिकांची, यासंदर्भातली मागणी लक्षात घेत, विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार काल शासन निर्णय जारी करण्यात आला. या गावांमधल्या अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य गटातली कुटुंबं आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल.

****

राज्यातल्या सहा हजार दोनशे रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या नऊ महिन्यांमध्ये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली. यावर्षीच्या मार्च महिन्यात विक्रमी अकरा कोटी पंचाण्णव लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांना देण्यात आल्याचं चिवटे यांनी सांगितलं.

****

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले असून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांच्या ठाणे इथल्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज सहकुटूंब रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला.

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना या मारहाणीसंदर्भात तपास करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल, असं फडणवीस म्हणाले. या दोन्ही नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांचा हा अंश –

उद्‌धव ठाकरे

एक फडतुस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पत्रकारांना धमक्या दिल्या जाताय, महिलांना मारहाण केली जाते. तर एकूणच काय तर गुंडागर्दीचं राज्य आहे. आणि मला असं वाटतंय आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं, मी म्हणत नाहीये पण म्हणायचं का नाही हे लोकं ठरवतील. एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि बिनकामाचा आयुक्त याला एक तर निलंबित करा किंवा बदली करा. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेलयात्रा ही करावीच लागेल.

**

देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतुस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे वाझेच्या मागे लाळ घोटतात,ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भूई थोडी होईल. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होतायत. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. जो जो चुकीचं काम करेल, त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. कोणत्या मानसिकतेचे लोक सत्तेत आहेत, हे या घटनेवरून लक्षात येतं, या शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावरची खालच्या पातळीची व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. वेळप्रसंगी मातोश्री बाहेर या विरोधात आवाज उठवू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

****

जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान चार लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागवण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून मोठी अपेक्षा असल्याचं मत जर्मनीचे मुंबईतले नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी व्यक्त केलं आहे. एकिम फॅबिग यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या मुंबईतल्या कार्यकाळात जर्मनीची कौशल्याची गरज आणि भारताकडच्या मनुष्यबळाची उपलब्धता याची सांगड घालण्यावर आपला भर असेल, असंही फॅबिग यांनी सांगितलं. जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असून, महाराष्ट्रात काम करत असलेल्या जर्मन कंपन्या समाधानी असल्याचं फॅबिग यांनी यावेळी सांगितलं.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. ठाण्यातल्या श्री ठाणा जैन महासंघाच्या भव्य रथयात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जैन मुनींचे शुभाशीर्वाद घेतले, तसंच जैन बांधवांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीनगर इथं सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महावीर स्तंभ इथं सकाळी सात वाजता सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, मुनिश्री डॉ.पुलकीतसागरजी महाराज, आचार्य रविनंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण गेट इथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्राऊड ऑफ जैन या विषयावर आधारित सजीव देखावे या शोभायात्रेतून सादर करण्यात आले. समाजातील महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीही करण्यात आली. महावीर मेडीकल फांऊडेशनच्या वतीनं यावेळी महारक्तदान शिबीर घेण्यात आलं.

****

अहमदनगर महानगरपालिका स्वच्छता सखी तसंच स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या स्वच्छोत्सव २०२३ चा शुभारंभ महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीनं सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांसह तृतीयपंथीयांना सन्मानजनक वागणूक आदींबाबत हलक्या-फुलक्या विनोदांसह ग्रामीण बाजात नाट्य-संवाद, लोकगीतांद्वारे लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...