आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान
महावीर यांची जयंती
आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती
संभाजीनगर इथं सकल जैन समाजाअंतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीनं
शोभायात्रा काढण्यात आली.
****
देशातल्या १९ कोटी ४३ लाख ग्रामीण कुटुंबांपैकी ११ कोटी ५९ लाख कुटुंबांना
आत्तापर्यंत नळावाटे पाणीपुरवठा केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. जलजीवन योजनेअंतर्गत गेल्या साडेतीन वर्षांत आठ कोटी ३६ लाख कुटुंबाना
नळाद्वारे पाणीपुरवठा केल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह
शेखावत यांनी सांगितलं.
****
खाद्य तेलाच्या किंमतीत जवळपास २२ ते २५
टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची
मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाले. मोहरीचं तेल १६५ ते १७० रुपये लिटर,
तर रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा
भाव ११५ ते १२० रुपये प्रति लिटर पर्यंत खाली आला आहे.
****
राज्यसभेत काल स्पर्धा दुरूस्ती विधेयक २०२३ चर्चेविना मंजूर
झालं. व्यवहारांच्या मूल्यावर आधारित विलिनीकरण आणि अधिग्रहण यावर नियंत्रण
ठेवणारं हे विधेयक असून, दोन हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक
मूल्य असलेल्या व्यवहारांसाठीभारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता आवश्यक करण्याची
तरतूद या विधेयकात आहे.
****
गुजरातमधल्या गांधीनगर इथं जी 20 ऊर्जा संक्रमण कृती
गटाच्या बैठकीसंदर्भात ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अलोक कुमार
यांनी काल माहिती दिली. भारतानं २०३० पर्यंत जीवाश्म
नसलेल्या इंधनावर आधारित ऊर्जा स्रोतांपासून ५० टक्के विद्युत ऊर्जा क्षमता
उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत ऊर्जा संक्रमणाशी निगडित सर्व प्रमुख मुद्द्यांवर विधायक आणि सकारात्मक
चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
****
संशयित बुकी अनिल जयसिंघानीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च
न्यायालयानं, यात कोणततंही तथ्य नसल्याचं सांगत फेटाळून लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देऊन लाच देण्याचा प्रयत्न
केल्याप्रकरणी जयसिंघानी यांना अटक करण्यात आली
आहे.
//*************//
No comments:
Post a Comment