Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय.
·
लिलावाची पद्धत बंद करुन सुधारित वाळू धोरणाला राज्य सरकारची
मान्यता.
·
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सलग चौदाव्या दिवशी
बाधित.
·
सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरासंबंधी देशातील १४ विरोधी पक्षांनी
दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
आणि
·
महाविकास आघाडीच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये
प्रवेश केल्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा.
****
सततचा
पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. सततच्या
पावसानं होणारं शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सततच्या
पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकष निश्चित करण्याकरता
कृषि विभागानं नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात आला.
या समितीनं सुचविलेल्या निकषांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पावसाचं प्रमाण आणि
कालावधीनुसार दोन ट्रिगर निश्चित करण्यात आले आहेत. यात सामान्यकृत वनस्पती निर्देशांक
निकष तपासण्यात येणार आहे. दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे
सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं
असल्यास मदत देण्यात येणार आहे.
****
वाळू
लिलावाची पद्धत बंद करत सुधारित वाळू धोरणालाही आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
देण्यात आली. अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी हे नवं सर्वंकष सुधारित वाळू
धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना
प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच १३३ रुपये प्रति मेट्रीक टन या दरानं वाळू उपलब्ध होणार
आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. मात्र जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी
आणि वाहतूक परवाना सेवा शुल्क खर्च वेगळा द्यावा लागेल. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर
वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया
राबवण्यात येईल. या वाळू डेपोतूनच वाळूची विक्री करण्यात येईल. अन्य कोणालाही वाळूचं
उत्खननं करता येणार नाही.
****
अकृषि
विद्यापीठातल्या शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातव्या वेतन आयोग लागू करण्यालाही
मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. याशिवाय, अतिविशेषोपचार विषयातल्या पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा आणि सहयोगी प्राध्यापक तसंच प्राध्यापक
संवर्गातली चौदा पदं निर्माण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्यातल्या
उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं महाविद्यालयांच्या नॅक आणि एनबीए मूल्यांकनासाठी
त्यांना मार्गदर्शन करण्याकरता ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा असेल. यासाठी
राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात
येईल. या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी येणाऱ्या
१३ कोटी ५० लाख रुपये खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
थकित
देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचं कर्ज घेण्यासाठी महावितरण कंपनीला
शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण
कंपनीकडे महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांची देणी थकित आहेत. महावितरण कंपनीनं विविध
वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला प्रस्ताव
स्वीकारावा, या अटीवर ही शासन हमी देण्यात आली आहे.
नागपूर
मेट्रो रेल टप्पा दोनच्या ६ हजार ७०८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पास तसंच मुंबईतील
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या
आरक्षणात फेरबदल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
विरोधकांच्या
गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौदाव्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु
होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह इतर विरोधी पक्षांनी, अदानी
प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत, घोषणाबाजी करण्यास
सुरुवात केली. अध्यक्षांनी शांत राहण्याचं आवाहन करूनही हा गदारोळ सुरुच राहिल्यानं,
लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दोन वाजता कामकाज सुरू होताच सत्ताधारी
आणि विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं काम उद्यापर्यंत स्थगित करावं लागलं.
राज्यसभेतही
आज कामकाज सुरु झाल्यावर, अदानी समुहाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात
केली. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी
केली. या गदारोळामुळे काही वेळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित केलं. दुपारी दोननंतरही दोन्ही पक्षांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं
कामकाजही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
देशातील
१४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालय
- ईडी यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या संस्थाकडून करण्यात येणारी अटक, रिमांड
तसंच जामीन देण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी या याचिकेत विरोधी
पक्षांनी केली होती. मात्र राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष किंवा मार्गदर्शक तत्त्व
लागू करता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी
घेण्यास नकार दिल्यामुळे विरोधी पक्षाच्यावतीनं ती मागे घेण्यात आली आहे.
****
महाविकास
आघाडीच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची माहिती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे रामशेठ गावडे, जयश्री पलांडे, प्रिया पवार, सासवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
उपाध्यक्ष संदीप देवकर यांचा समावेश आहे, असं ते म्हणाले. काल मुंबईत झालेल्या महिला
कार्यकर्तीला मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण अत्यंत असभ्य आणि खालच्या
पातळीवरचं होतं, अशी टीका त्यांनी यावेळी केली. ठाकरे यांच्या काळातल्या अनेक गुन्ह्यांचा
उल्लेख करत, त्याकाळात गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात आलं, असा आरोप राणे यांनी केला.
अनेक मंत्री कारावासात गेले असतानाही राजीनामा न देणाऱ्या या माजी मुख्यमंत्र्यांना
इतरांबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असं राणे म्हणाले.
दरम्यान,
रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज ठाण्यात
शिवाजी मैदानापासून पोलिस आयुक्तालय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात आदित्य
ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
उद्याच्या
हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवू शकणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याचे
निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. लोकांना सण निर्वेधपणे
साजरे करता यावेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काळजी सगळ्या राज्यांनी घ्यावी,
असे निर्देश गृहमंत्रालयानं दिले आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गैरप्रकार
केल्याप्रकरणी शेंद्रा इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात
आलं आहे. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
उद्यापासून पुढचे पेपर आता शेंद्रा इथल्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी
या केंद्रावर घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या माजलगाव उपविभागातल्या वीज वितरण कंपनीतला कनिष्ठ लिपिक रामा लोखंडे
आणि कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर पांचाळ या दोघांना तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदाराच्या जुन्या मीटरच्या जागी नवीन
बसवून दिल्याचं सांगत, बील कमी येण्याची सोय करून देण्याचा प्रस्ताव ठेवत त्यांनी ही
लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment