Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 April
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०६ एप्रिल २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
·
वाळू लिलावाची पद्धत बंद करुन सुधारित धोरणाला राज्य सरकारची मान्यता
·
सततचा पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
सीबीआय आणि ईडी, सारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी १४ विरोधी
पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च
न्यायालयाचा नकार
·
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
·
पदवी परिक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी शेंद्रा इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय परीक्षा केंद्र रद्द
·
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज इलेव्हनचा राजस्थान रॉयल्स संघावर पाच धावांनी
विजय
****
वाळू लिलावाची
पद्धत बंद करुन सुधारित धोरणाला काल राज्य सरकारनं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बठैकीत हा
निर्णय घेण्यात आला. अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी हे नवं
सर्वंकष सुधारित धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक
वर्षासाठी सर्व नागरिकांना, प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच
१३३ रुपये प्रति मेट्रीक टन या दरानं वाळू उपलब्ध होणार आहे. यात स्वामित्व धनाची
रक्कम माफ करण्यात आली आहे. मात्र जिल्हा खनिज
प्रतिष्ठान निधी आणि वाहतूक परवाना सेवा शुल्क हा खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. वाळुचं उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा
प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर या वाळू डेपोतूनच सर्वांना वाळूची विक्री करण्यात येईल. अन्य कोणालाही वाळूचं
उत्खननं करता येणार नाही, अशी तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.
****
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून
घोषित करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सततच्या पावसानं होणारं शेतकऱ्यांचं
नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकष निश्चित
करण्याकरता, कृषि विभागानं नियुक्त केलेल्या समितीनं
सुचवलेल्या निकषांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
पावसाचं प्रमाण आणि कालावधीनुसार दोन ट्रिगर निश्चित करण्यात
आले आहेत. यात दुसऱ्या ट्रिगरमध्ये सामान्यकृत वनस्पती निर्देशांक निकष
तपासण्यात येणार आहे. त्यानंतर निकषानुसार
दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण
करुन पंचनामा करण्यात येईल आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं
असल्यास मदत देण्यात येणार आहे.
****
अकृषि विद्यापीठातल्या शिक्षक समकक्ष
पदांना सहावा आणि सातव्या वेतन आयोग लागू करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली
आहे. याशिवाय, अतिविशेषोपचार विषयातल्या पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा, आणि सहयोगी
प्राध्यापक तसंच प्राध्यापक संवर्गातली चौदा पदं
निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
राज्यातल्या
उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं, महाविद्यालयांच्या नॅक आणि एनबीए
मूल्यांकनासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता, ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा
असेल. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती
आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून, या समित्यांमार्फत मार्गदर्शक
संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी १३ कोटी ५० लाख रुपये खर्चालाही
मान्यता देण्यात आली.
थकित देणी
देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचं कर्ज घेण्याकरता महावितरण या वीज कंपनीला शासन हमी देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. महावितरण कंपनीकडे
महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांची देणी थकित आहेत. महावितरण कंपनीनं विविध
वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला
प्रस्ताव स्वीकारावा, या अटीवर ही शासन हमी देण्यात आली
आहे.
नागपूर मेट्रो रेल टप्पा दोनच्या सहा हजार ७०८
कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पास, तसंच मुंबईत देवनार
डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या
आरक्षणात फेरबदल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
देशातल्या १४ विरोधी
पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर
सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी ही याचिका मागे घेतली आहे. या केंद्रीय तपास संस्थाकडून
करण्यात येणारी अटक, रिमांड तसंच जामिन देण्याबाबत नविन
मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी, या याचिकेत विरोधी पक्षांनी केली
होती. मात्र राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष किंवा मार्गदर्शक तत्त्व लागू करता
येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल यंदाच्या पद्म पुरस्कारांचं
वितरण केलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांना
पद्मविभूषण आणि ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा,
ओआरएस चा शोध लावणारे डॉ. दिलीप महालनबीस,
भौतिक शास्रज्ञ दीपक धर, लेखिका सुधा मूर्ती यांना
पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलं.
झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे, कुष्टरोग्यांसाठी
कार्यरत सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, देशातल्या पहिल्या संगीत
संयोजिका कुमी वाडिया, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह विविध
मान्यवरांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
हनुमान
जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवू शकणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याचे
निर्देश, केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. लोकांना
सण निर्वेधपणे साजरे करता यावेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काळजी सगळ्या राज्यांनी घ्यावी, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, हनुमान जनमोत्सव आज
पहाटे सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या
भद्रा मारोतीच्या मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासुनच रांगा लावल्या आहेत.
****
राज्यातल्या
महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन
सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात
कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि
उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगत, नायब तहसिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, असं
आवाहनही विखे पाटील यांनी केलं.
****
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर
नामकरण केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. नाव बदलण्याचा मुद्दा सरकारच्या अधिकारकक्षेत येत असल्यानं त्यात हस्तक्षेप
करणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु
असल्याचंही न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं.
****
माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल
वापरलेल्या हीन दर्जाच्या भाषेवर आणि त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर, केंद्रीय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तीव्र
शब्दांत टीका केली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ठाण्यात झालेल्या महिला कार्यकर्तीला मारहाण
प्रकरणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण अत्यंत
असभ्य आणि खालच्या पातळीवरचं होतं, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचा आरोप राणे यांनी केला. ते म्हणाले…
‘‘गुन्हेगारांना मदत करणारा
व्यक्ती मुख्यमंत्री होतो. आपल्या काळात गुन्हे घडतायत, आपल्या मंत्रीमंडळात काही देशाबाहेरील
शक्तींच्या बरोबर ज्यांचे संबंध आहेत, अशा नवाब मलिक यांना मंत्रीमंडळात ठेवतात. एवढंच
काय मंत्रीमंडळातील तिघं मंत्री जेलमध्ये जातात, गृहमंत्री जातात, माजी मुख्यमंत्री
आहात कोणावर बोलातायत? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे? बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि शरद
पवारांची मेहेरबानी यामुळे मुख्यमंत्री झाले, हिंदुत्वाचा त्याग केल्यामुळे.’’
****
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी
शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं काल ठाण्यात
मोर्चा काढला होता. या मोर्चात आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे,
जितेंद्र आव्हाड यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी
बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं
सांगितलं. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तातडीनं
कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर नैराश्यातून टीका केल्याची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल ते पत्रकारांशी बोलत होते. रोशनी शिंदे यांना मारहाण
झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना आपल्यावर आणि गृहमंत्र्यावर केलेल्या टिकेला योग्य उत्तर देण्यात येईल असं
मुख्यमंत्री म्हणाले.
‘‘अतिशय फ्रस्टेशन ठाण्यामध्ये
पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते,
हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.’’
****
पदवी परिक्षेत गैरप्रकार
केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा
इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय
परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं घेतला
आहे. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही
कारवाई करण्यात आली. आजपासून या केंद्रावरील विद्यार्थ्यांची उर्वरित परीक्षा शेंद्रा
इथल्याच कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड
इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, या
केंद्रावर घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या येरमाळा इथल्या
श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी
लक्षात घेत, प्रशासनानं येरमाळ्याकडे जाणारी अवजड वाहनं बार्शी, कुसळंब मार्गे वळवली आहेत. वाहतूक मार्गातला हा बदल आजपासून येत्या अकरा तारखेपर्यंत लागू राहणार आहे.
****
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याविषयी
हवामान विभागाच्या शास्रज्ञ सुषमा नायर यांनी अधिक माहिती दिली…
‘‘राज्यात पुन्हा अवकाळी
पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या चार पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण
कोकणाच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण
मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत गारपीट पण होण्याची शक्यता
आहे.’’
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं
नांदेड जिल्ह्यासाठी आज येलो ॲलर्ट तर उद्यासाठी ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. आज जिल्ह्यात
तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहण्याची, आणि विजेचा कडकडाट आणि ढगांच्या
गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर उद्या जिल्ह्यात
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट
होण्याची शक्यता वर्तवली आहे.
लातूर जिल्ह्यातही आज आणि उद्या वादळी
वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस तसंच गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्याचं, लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं
कळवलं आहे. या काळात विजा पडण्याची शक्यता
लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव उपविभागातल्या
वीज वितरण कंपनीतला कनिष्ठ लिपिक रामा लोखंडे आणि कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर
पांचाळ या दोघांना, तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना,
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या
जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवून दिल्याचं सांगत, बील कमी येण्याची सोय करून देण्याचा प्रस्ताव ठेवत
त्यांनी ही लाच मागितली होती.
****
बीड जिल्हा वीज प्रवण क्षेत्रात येत असल्यानं
दुर्घटना होऊ शकतात, त्या रोखण्याच्या दृष्टीनं वीज प्रवण क्षेत्रातली
गावं आणि ठिकाणं निश्चित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ
- मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या.
शासकीय कार्यालयं तसंच मोबाईल टॉवर अशा विविध ठिकाणी यापूर्वीच बसवण्यात
आलेल्या वीजरोधक यंत्रणांची सुसज्जता तपासणी महावितरणनं करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल पंजाब किंग्ज इलेव्हन संघानं राजस्थान रॉयल्स संघावर पाच धावांनी
विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघानं निर्धारित षटकात चार बाद १९७ धावा
केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला राजस्थानचा संघ २० षठकात सात गडी गमावत १९२ धावाच करु
शकला.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, काल विद्यापीठ पदवी परिक्षेच्या कामकाजाबाबत
घोषणा देत निदर्शनं करण्यात आली. पाचशे
रुपयात पेपर लिहिणाऱ्या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करा,
विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वेळेवर द्या, विद्यार्थ्यांचे
निकाल त्वरित लावा, अशा घोषणा यावेळी
देण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड
तालुक्यात झालेल्या अपघातातल्या मृतांच्या वारसांना पाच लाख
रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
अपघातातल्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी
केल्या आहेत. मुदखेड
तालुक्यात मुगट - इंजळी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकच्या भीषण अपघातात ५ जणांचा
मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात कोविड
१९ तपासण्या वाढवाव्यात आणि सगळ्या आरोग्य केंद्रावर कोविड संबंधी इतर तपासण्या कराव्यात, असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा
यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. शहरात कोविड १९ च्या पुन्हा वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
सगळे वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची बैठक मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली
काल झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश
दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या
एकशे अठ्ठावीस गावांची, जलयुक्त अभियान, योजनेसाठी निवड झाली आहे.
या गावांमध्ये तात्काळ विशेष ग्रामसभा आणि शिवार फेरी आयोजित करून कामाचा
आराखडा सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment