आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
वारिस दे पंजाब संघटनेचा
प्रमुख, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला त्याच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधल्या मोगा
जिल्ह्यातल्या एका गावात पंजाब पोलिसांनी अटक केली. गेल्या महिन्यापासून अमृतपाल सिंह
फरार होता. चौकशीनंतर त्याला दिब्रुगढ तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील
युवकांना संघटित करुन मारहाण करणं, पंतप्रधान तसंच गृहमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणं,
अपहरण यासारखे गुन्हे अमृतपालच्या नावे दाखल आहेत.
***
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं ठाकरे
यांची सभा होणार आहे. या सभेस उपस्थित राहण्यासाठी खासदार संजय राऊत काल जळगावमध्ये
पोहचले.
***
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी
वाढविण्यासाठी विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असं प्रतिपादन राज्यपाल
रमेश बैस यांनी केलं आहे. स्तंभलेखिका, ब्लॉगर आणि आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना
शंकर यांनी लिहिलेल्या ''असेन्डन्स'' या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राजभवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते. विज्ञान
शिकवण्यासाठी तसंच त्यात मुलांना गोडी लागण्यासाठी ध्येयवादी आणि बांधिलकी असणाऱ्या
शिक्षकांची गरज आहे, असं राज्यपालांनी सांगितलं.
***
चंद्रपूर शहरात काल जोरदार
वाऱ्यासह पाऊस झाला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दाताळा शेतशिवारात एका शेतकऱ्याचा
वीज पडून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली. नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातही काल वादळी वाऱ्यासह जोरदार
पाऊस झाला. या ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे रोहित्र जळाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, येत्या
छत्तीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची
शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
***
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक खासगी ट्रॅव्हल बस
आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा
मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले.
//***********//
No comments:
Post a Comment