Thursday, 1 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      अहमदनगर जिल्ह्याचं 'अहिल्यादेवी होळकर' असं नामांतर करण्याची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·      केंद्र सरकारच्या नऊ वर्ष पूर्ततेच्या निमित्तानं देशभरात भाजपचं संपर्क अभियान सुरु

·      राज्यात आजपासून नाफेड आणि एन सी सी एफ च्या माध्यमातून उन्हाळी कांद्याची खरेदी

·      ३५० व्या शिराज्याभिषेक दिनानिमित्त आजपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन

·      जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या सूचना

आणि

·      औरंगाबादमधील संकेत कुलकर्णी खून प्रकरणी संकेत जायभायेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

****

देशात अन्नधान्याची साठवणूक वाढवण्यासाठी सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. जवळपास एक लाख कोटी रुपये खर्चाची ही योजना प्रायोगिक तत्वावर दहा राज्यांमध्ये सुरु होईल, या अनुभवाच्या आधारे देशातल्या सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू केली जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून ७०० लाख टन साठवणुकीची क्षमता सहकार क्षेत्रांत सुरु होणार आहे, आणि ही क्षमता सध्याच्या एक हजार ४५० लाख टनांवरून वाढून, पुढील पाच वर्षात दोन हजार १५० लाख टनांपर्यंत पोहोचेल, असं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन हजार टन क्षमतेच्या साठवणुकीसाठी गोदामं उभारली जाणार आहेत, असं ते म्हणाले.

 

एकात्मिक शहरी व्यवस्थापनाला चालना देणाऱ्या सी आय टी-आय आय एस टू पॉईंट ओ कार्यक्रमालाही काल  मंजुरी मिळाली. या कार्यक्रमासाठी एक हजार ८६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत स्पर्धात्मकतेच्या आधारे १८ शहरांची निवड करण्यात येईल, त्यानंतर या शहरांमध्ये एकात्मिक कचरा व्यवस्थापनासारख्या, चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांवर भर देण्यात येईल, सं ठाकूर यांनी सांगितलं. राष्ट्रीय शहरी प्रणालीला हवामान प्रशासनामध्ये क्षमता बांधणीसाठी १०६ कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, यामुळे चक्राकार अर्थव्यवस्था आणि स्वच्छ शहरांच्या मोहिमेला बळ मिळेल, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी होईल, असं ते म्हणाले.

****

अहमदनगर जिल्ह्याचं 'अहिल्यादेवी होळकर' असं नामांतरण करण्या येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाईंचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हिमालायाइतकं मोठं होतं, त्यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला दिल्यानं  जिल्ह्याचा मानही तेवढाच मोठा होणार आहे, असं ते म्हणाले. नामांतराची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आदिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राज्याचा कारभार करतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.’’

अहिल्यादेवींनी राज्य कारभाराचा आदर्श आपल्यासमोर ठेवला, त्यांनी भारताला दिलेली प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी सर्वोत्तम आणि अनुकरणीय असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीनं दहा कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अहिल्यादेवींनी कधीही कोणत्याच बाबतीत भेदभाव केला नाही, त्यांनी राज्याची आणि स्वतःची तिजोरी वेगळी ठेवली असं सांगितलं.

तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलं आणि शिल्पसृष्टीची पाहणी केली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त महिलांनी इतर महिलांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहित करावं, असं आवाहन, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. काल मुंबईत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींधल्या ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या २७ हजार ८९७ ग्रामपंचायतींमधल्या सुमारे ५५ हजार ७९४ महिलांचा, काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यात नांदेड जिल्ह्यातल्या दोन हजार ६२० महिलांचा समावेश आहे.

****

बारामती इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचं औचित्य साधून शासनाच्या वतीनं त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून काल ही घोषणा केल्याचं महाजन यावेळी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात कालपासून संपर्क अभियान सुरु करण्यात आलं. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात केलेली विविध कामं लोकांपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये अजमेर इथून सुरुवात केली.

भाजपच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. सबका साथ सबका विकास हा आपला मूलमंत्र असून, त्याचीच प्रचिती देशभरातल्या जनतेला येत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेसनं ५० वर्षांपूर्वी गरीबी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात काहीही केलं नाही. काँग्रेसच्या काळात किती प्रचंड भ्रष्टाचार होत असे, ते त्यांचे नेतेच स्वतः बोलून दाखवत असत, असं ते म्हणाले.

या अभियाना अंतर्गत काल राज्यात लातूरमध्ये खासदार सुधाकर श्रृंगारे तर बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह विविध भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सरकारची कामगिरी अधोरेखित केली.

जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यात निर्मल जल योजना राबवण्यात आली, या योजनेतून तीन लाख २७ हजार ८८६ घरांना नळजोडणी देण्यात आली आणि त्यासाठी तीन हजार ३८० कोटी रुपये खर्च आला असं श्रृंगारे यांनी सांगितलं. सरकारच्या इतर योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब, वंचित आणि शोषित वर्गाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आलं, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. या सरकारनं जगभरात भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचं काम केल्याचं त्या म्हणाल्या. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे विधान परिषदेतले गटनेते प्रविण दरेकर तसंच आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामाबद्दल माहिती दिली.

गेल्या नऊ वर्षात अनेक विकासकामांना वेग आला, भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली, असं खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.

औरंगाबाद इथं भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं जिल्ह्यात महिनाभर जनजागरण मोहिम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतीय राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन संस्था -नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघः एन सी सी एफ यांच्या संयुक्त विद्यमानं, आजपासून राज्यात उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. राज्यात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यातल्या देवळा इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते, या कांदा खरेदी योजनेची सुरुवात होत आहे. उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण रोखण्यासाठी पवार यांनी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना याबाबत निवेदन दिलं हेातं. त्या आधारे ही खरेदी करण्यात येणार आहे. नाशिकसह पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि अहमदनगर इथंही कांदा खरेदीला आजपासून सुरुवात होत आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त आजपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

केंद्र सरकारच्या अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव पुरवण्याच्या -ए डी आय पी योजनेअंतर्गत, उस्मानाबाद जिल्ह्यात एक हजार ६९८ लाभार्थ्यांना येत्या सहा जून पासून उपकरणांचं वाटप करण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. या शिबिरात वयोश्री योजनेअंतर्गत पात्र जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या उपकरणांचही लवकरच वितरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेसाठी गेल्या वर्षी ११ ते २१ ऑगस्ट दरम्यान दहा दिवस तालुकानिहाय तपासणी आणि मोजमाप शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाभरातून पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या शिबिरात भाग घेतला, त्यापैकी २ हजार ४१० लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७ पासून पंतप्रधान मातृत्व वंदन योजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत ५० हजार ११० गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या हे १०५ टक्के असून, या योजनेतून जिल्ह्यात मार्च २०२३ अखेर, १९ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांचा लाभ आरोग्य विभागानं दिला आहे. जिल्ह्यातल्या गावसूद इथल्या योजनेच्या लाभार्थी पल्लवी तेरकर यांनी या योजनेच्या लाभाविषयी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं –

“प्रधानमंत्री मातृयोजनेचा मला पाच हजाराचा लाभ झाला. पहिला एक हजाराचा टप्पा गरोदरपणाची नोंद झाल्यावर पडला. दुसरा टप्पा गरोदरपणाची पूर्ण तपासणी झाल्यावर दोन हजाराचा टप्पा पडला. बाळाचे लसीकरण झाल्यास दोन हजाराचा तिसरा टप्पा पडला. ह्या पाच हजाराचा लाभ मला आहारात फळं, पालेभाज्या, बऱ्याच काही वस्तू आणण्यासाठी झाला. त्यामुळे माझे बाळ सदृढ झाले. डिलेव्हरीमध्ये काही त्रास झाला नाही. यामुळे मी केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.’’

****

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल नांदेडचं जिल्हा सामान्य रुग्णालय, इंडियन डेंटल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं सायकल रॅली आणि प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अभय अनुरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांची तिरडी तयार करून तंबाखू विरोधी जनजागृती करण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी सूचना, औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहेत. काल मुंबईत पैठण तालुक्यातल्या जायकवाडी प्रकल्प टप्पा - एक बुडित क्षेत्रातल्या प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यावेळी उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या बैठकित सहभाग घेतला.

****

औरंगाबाद शहरात सहा वर्षांपूर्वी घडलेल्यासंकेत कुलकर्णी खून प्रकरणात आरोपी संकेत जायभाये याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १२ हजार रुपये दंड ठोठावला आहे. २३ मार्च २०१८ रोजी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची त्याचा मित्र संकेत जायभाये यानं एकतर्फी प्रेमातून कारखाली चिरडून हत्या केली होती. याप्रकरणात तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

****

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला, आजपासून सुरुवात होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून अधिकृत वेबपोर्टल विकसित करण्यात आल्याची माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बोलत होते. राज्यात पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

****

आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रातले कार्यक्रम अधिकारी उन्मेष वाळींबे काल सेवानिवृत्त झाले. त्यांनी आकाशवाणी औरंगाबाद आणि परभणी केंद्रातही प्रदीर्घ काळ काम केलं. उस्मानाबाद केंद्राच्या वतीनं त्यांना निरोप देण्यात आला.

****

अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनाच्या दृष्टीनं वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प पाणी सोडण्याचा शुभारंभ, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातलं निळवंडे धरण, दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. धरणाचा डावा आणि उजवा कालवा तसंच उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून, अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या १८२ गावांमधली, ६८ हजार ८७८ हेक्टर शेतजमिन ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

No comments: