Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 June
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ जून २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक बातम्या
· नवव्या
जागतिक योगदिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
· योगाचा
जीवनशैलीत अंतर्भाव करण्याचं योग अभ्यासकांचं आवाहन
· जी
ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात
· यंदा
जानेवारी ते मे, या काळात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार
· पीकपेरणीच्या
अनुषंगानं कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं-कृषिमंत्र्यांचे निर्देश
· डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा येत्या २७ जूनला ६३ वा दीक्षांत समारंभ
आणि
· विशेष
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या गीतांजली नागवेकरला सुवर्ण पदक
सविस्तर बातम्या
नववा जागतिक योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या
कार्यक्रमाचं नेतृत्व करणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम
होईल. वसुधैव कुटुंबकम या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. देशभरात
या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या
उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुषमंत्री
सर्वानंद सोनोवाल, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान,
यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत योगदिनाचा कार्यक्रम होत आहे.
विधान भवनाच्या प्रांगणात, 'योगप्रभात विधान भवन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आहे.
मुंबईत आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस मरमुगाव या नौदल
जहाजांवर, विशेष योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यातल्या अमृत सरोवरांच्या स्थळी जागतिक योग दिवस साजरा
करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र
ठाकरे यांनी ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंतप्रधानांच्या
संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५, याप्रमाणे राज्यभरात दोन हजार ६५५ अमृत सरोवरं
तयार झाली आहेत. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज औरंगाबाद
इथं अनाथ बालकांसोबत जागतिक योग दिवस साजरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा
संकुलात सकाळी साडे सात वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
योगदिनाच्या औचित्यानं काल औरंगाबाद शहरातल्या बळीराम पाटील
विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम आणि योग दिंडी काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
****
जीवनशैली म्हणून योग स्वीकारल्यास क्षमतांमध्ये वाढ होते,
असं प्रतिपादन डॉक्टर चारुलता रोजेकर यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं क्रीडा भारती
या संस्थेतर्फे 'क्रीडा भारती योग पुरस्कार' देऊन त्यांना गौरवण्यात आलं, त्यावेळी
त्या बोलत होत्या. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
आतापर्यंत बावन्न हजार जणांना योग शिकवता आल्याबाबत डॉ रोजेकर यांनी समाधान व्यक्त
केलं.
****
औरंगाबाद इथले योग अभ्यासक डॉ विवेक चर्जन यांनी अष्टांग
योगाबद्दल माहिती देत, प्रत्येकाने योगमार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
Byte…
अष्टांग योग म्हणजे महर्षि
पतंजलींनी सांगितलेला योगमार्ग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान,
समाधी असे आठ नियम म्हणजे अष्टांग. मुलतः योगमार्ग हा कैवल्यप्राप्तीचा अध्यात्मिक
मार्ग असला तरी समाधीव्यतिरिक्त इतर अंगांचा व्यावहारिक जीवनात अत्यंत लाभदायक असा
परिणाम आहे. माझा जगासोबत कसा व्यवहार असावा याचे नैतिक नियम म्हणजे यम. वैयक्तिक आचरणाची
शिस्त म्हणजे नियम. यम आणि नियम आहेत मनाला स्ट्रेसफ्री ठेवण्यासाठी. आणि जीवनात शिस्त
आणण्यासाठी. आसन आहेत शारीरिक आरोग्यासाठी. प्राणायामामुळे सैरभैर धावणाऱ्या मनाला
नियंत्रित करता येते. तर प्रत्याहाराने कामातील एकाग्रता वाढते. धारणा आणि ध्यानामुळे
तणावाचे दुष्परिणाम दूर होतात. यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगमार्गाचा
अवलंब करायलाच हवा.
****
जी ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या चौथ्या
बैठकीला कालपासून पुण्यात सुरुवात झाली. जी 20 साठीचे भारताचे समन्वयक हर्षवर्धन शृंगला
यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं. प्राथमिक अंक आणि अक्षरओळख, हा विषय फक्त भारतासाठीच
नाही तर पूर्ण जगासाठी महत्त्वाचा असून त्यासाठी ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचं मत
त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या बैठकीला जी 20 देशांचे, तसंच आमंत्रित देशांचे पंच्याऐंशी
प्रतिनिधी उपस्थित आहेत. या परदेशी पाहुण्यांनी काल शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना
वाड्याला भेट दिली.
जी - 20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात समृद्ध शिक्षण
फेरी काढण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याअनुषंगानं घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची
माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणं आणि अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी
होण्याच्या दृष्टीनं ही फेरी काढण्यात आली. औरंगाबाद इथंही काल या निमित्ताने विद्यार्थ्यांची
शिक्षण फेरी काढण्यात आली.
****
येत्या एक जुलैला शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिकेवर
मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई पालिकेच्या
ठेवींची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करत, या उधळपट्टीविरोधात हा मोर्चा असल्याचं त्यांनी
सांगितलं. यावर प्रत्यूत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईकरांचा पैसा
मुंबईकडेच राहिला पाहिजे, यासाठी महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची विशेष तपास पथकामार्फत
चौकशीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरेंचं
याबाबतचं विधान म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे, असा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
बंजारा समाजाला भारतीय जनता पक्षच न्याय देऊ शकतो, असा
विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या
पदाधिकाऱ्यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस
बोलत होते. सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी असून, तांड्यांपर्यंत विकास पोहचवून बंजारा
समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या
प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बदलीसाठी अधिकारी पात्र
नाही, असा शेरा सचिवांनी दिला असतानाही पदोन्नती करण्यात आल्या, तसंच, वर्ग तीन आणि
चारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी या बदल्या केल्या,
असा आरोपही दानवे यांनी केला आहे.
****
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत
राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे यावर्षीच्या जानेवारी ते मे, या काळात
राज्यभरात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. कौशल्य,
रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. इच्छुक
उमेदवारांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट जीअव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी,
असं आवाहनही लोढा यांनी केलं आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात कौशल्य विकास साधल्यास, शहरी भागाकडे
होणारं स्थलांतर कमी होईल, असं लोढा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात
बोलत होते. हा विकास साधण्यासाठी व्यवसाय क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन, आणि
कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगानं कृषी विभागानं
शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावं, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल
सत्तार यांनी दिले आहेत. राज्यातल्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या यासंदर्भातल्या आढावा
बैठकीत ते काल बोलत होते. पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, यासाठी
कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी,
अशी सूचनाही सत्तार यांनी केली.
****
औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
त्रेसष्टावा दीक्षांत समारंभ येत्या सत्तावीस तारखेला होणार आहे. या समारंभात कुलपती
तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दोन इमारतींचं उद्घाटन आणि सुपर काँप्युटर अर्थात
महासंगणकाचं लोकार्पण होणार आहे. कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. या सोहळ्यात पदवीधरांना आणि दोनशे एक्क्याण्णव संशोधकांना पदव्या प्रदान
करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ’नवीन शैक्षणिक धोरण-२०२०’ मुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास कुलगुरु येवले यांनी व्यक्त
केला आहे. विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या महाविद्यालयांच्या
प्राचार्यांची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. ’नॅक’मूल्याकंनात ’ए’, ए प्लस आणि ए प्लस प्लस' दर्जा प्राप्त झालेल्या आठ महाविद्यालयांच्या
प्राचार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर
अशोक तेजनकर, तसंच अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित यांचा
यात समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश चौफेर
प्रगती करत असून, सर्वच क्षेत्रात देशानं मोठी प्रगती केल्यामुळे जगात भारताची प्रतिमा
उंचावली आहे, असं कर्नाटकचे भाजप नेते माजी मंत्री आमदार अरविंद लिंबावली यांनी म्हटलं
आहे. जालना इथं भाजपा महाजनसंपर्क अभियान आणि मोदी @ नाईन उपक्रमांतर्गत ते काल पत्रकार
परिषदेत बोलत होते. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही यावेळी वार्ताहरांशी
संवाद साधला.
****
२०२२ च्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसानं झालेल्या नुकसानाच्या
भरपाईपोटी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १३७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आमदार राणा जगजितसिंह
पाटील यांनी ही माहिती दिली. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी
दैनंदिन पाठपुरावा करणार असल्याचं रणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी घेतलेल्या
पीककर्जाचे येत्या ३० जूनपर्यंत नूतनीकरण करून घ्यावं म्हणजे त्यांना शून्य टक्के दरानं
नव्यानं कर्ज उपलब्ध होईल, असं परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी म्हटलं आहे.
आपली बँक शाखा गावात येईल, त्यादिवशी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन नूतनीकरणाचा
अर्ज करावा, असंही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांची पालखी बीड जिल्ह्यातून
मार्गक्रमण करत आहे. केज तालुक्यातल्या जवळबन इथं पालखीचा अश्व रिंगण सोहळा काल पार
पडला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चांदोबाचा लिंब इथं
उभं रिंगण तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बेलवाडी इथं काल रिंगण सोहळा साजरा
झाला.
दरम्यान, आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं विठ्ठल
रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. सात जुलै पर्यंत हे दर्शन सुरू राहणार असल्याचं
प्रशासनानं सांगितलं.
****
पंढरपूर इथं नव्याने विमानतळ करण्याचा प्रस्ताव तातडीने
राज्यशासनाला पाठवावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली
आहे. त्या काल सोलापूर इथं जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. पंढरपूर
तीर्थ क्षेत्र विकास आराखडा आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
जर्मनीत सुरु असलेल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्स
मध्ये ट्रॅक इव्हेंट या धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गीतांजली नागवेकरनं सुवर्ण पदक
पटकावलं. ८०० मीटर लेवल सी ट्रॅक इव्हेंट मध्ये गीतांजलीनं कॅनडा आणि युक्रेनच्या खेळाडूंना
मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
****
औरंगाबाद शहरातल्या गरवारे क्रीडा संकुलालगतच्या कलाग्राम
आणि परिसरातली जागा आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी हस्तांतरित
करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. गरवारे
क्रीडा संकुल विकासाबाबत आयोजित एका आढावा बैठकीत त्यांनी काल हे निर्देश दिले. प्रस्तावित
क्रिकेट स्टेडियमसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी चर्चा करणार असल्याची माहितीही
मनपा आयुक्तांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment