Saturday, 29 July 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २९ जूलै २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उमेद अभियानातल्या महिला स्वयं सहाय्यता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीनं वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानातही वाढ   

·      राज्यातल्या कृषी आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे प्रवेश  प्रक्रिया राबवण्याचा निर्णय

·      राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला आज तीन वर्ष पूर्ण, नवी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय शिक्षा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार

·      राजपूत भामटा या जमातीमधला भामटा हा शब्द वगळला जाणार नाही - इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचं स्पष्टीकरण

·      नांदेड जिल्ह्यातल्या ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद

      आणि

·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक

****

उमेद अभियानातल्या महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीनं वाढ करण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल विधानसभेत यासंदर्भात निवेदन देताना त्यांनी, प्रत्येक गटाला ३० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय जाहीर केला. या वाढीमुळे अतिरिक्त ९१३ कोटी रुपये निधीची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

कर्मचारी आणि चळवळीतल्या समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात देखील दुप्पट वाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. आता हे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये केलं जाणार आहे. गावपातळीवरच्या एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. यासाठी १६३ कोटी रुपये अतिरिक्त निधीची तरतूद  करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले,

"महिला बचत गट सक्षम करण्यासाठी जे उमेद आहे, त्यांना देखील जे सीआरपी आहे, ५४ हजार, त्यांचं मानधन तीन हजार रुपये होतं, ते वाढवून सहा हजार रुपये करण्यात आलं आहे. आणि महिला बचत गटाचा जो रिव्हॉल्विंग फंड होता, खेळतं भांडवल, ते १५ हजार रुपये होतं, आपण ते ३० हजार करणार आहोत."

राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट, म्हणजेच प्रति कुटुंब दहा हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. ही वाढीव मदत यंदाच्या जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीतल्या बाधितांना दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाच्या सैनिकांना आता १८० दिवस काम दिलं जाईल, त्यासाठी साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. आता होमगार्डना दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, ही अट शिथिल करण्यात आली असून, होमगार्डना कवायत भत्ता देखील मंजूर केला जाईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद अंतर्गत निवृत्त अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचारी यांचं मासिक निवृत्तीवेतन वेळेवर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं आश्वासन, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिलं. ते काल विधान परिषदेत आमदार नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, तसंच वित्त विभाग या तिन्ही विभागाच्या समन्वयातून एक अद्ययावत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येईल, तसंच विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनापूर्वी हा विषय मार्गी लावला जाईल, असं आश्वासन महाजन यांनी यावेळी दिलं.

****

शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवणाऱ्या महाबीज या राज्य सरकारच्या कंपनीचं बळकटीकरण करण्यासाठी व्यवस्थापनात बदल केला जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत केली. याबाबत सचिन अहिर तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बोगस बी-बियाणं, खतं आणि औषधाच्या विरोधात कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा या अधिवेशनातच संमत केला जाईल, असंही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन, ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातली कृषी महाविद्यालयं आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली. त्यात घेतलेल्या या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून, त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल, तसंच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणं शक्य होइल.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय शिक्षण परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून देशातल्या शिक्षण व्यवस्थेत झालेल्या बदलांचा या परिषदेत आढावा घेण्यात येणार आहे.

दरम्यान, यानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, तीन ते आठ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींना शिक्षण व्यवस्थेत घेण्याचं नियोजन केल्याचं सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार शिक्षकांसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य तयार केल्याची माहिती त्यांनी दिली.  

****

मणीपूर हिंसाचार तसंच सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेसचे अधीररंजन चौधरी यांनी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाबाबत पुढे कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात बोलताना, हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर दहा दिवसांत पुढची कार्यवाही करता येण्याची तरतूद असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, कामकाज आधी बारा वाजेपर्यंत, त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणीपूर मुद्यावर नियम २६३ अन्वये चर्चेची मागणी लावून धरली. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या आचरणाबाबत सभापतींनी नाराजी व्यक्त करत सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

आशुरा-ए-मुहर्रम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांच्या हौतात्म्याचा हा दिवस आहे. करबला इथं सत्य, धार्मिकता आणि न्याय टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मुहर्रम निमित्त आज ताजिया मिरवणुका काढण्यात येतात.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा एकशे तिनावा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

****

राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीमधला भामटा हा शब्द वगळला जाणार नाही, असं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. १९६१ मधला शासन निर्णय तसंच त्यानंतर १९९३ मध्येही राजपूत भामटा जमातीचा उल्लेख आहे. २००८ आणि २०१० मध्ये मागासवर्ग आयोगानं देखील भामटा हा शब्द काढता येणार नाही, असं सांगितलं होतं. त्यामुळे हा शब्द वगळला जाणार नसल्याचं सावे यांनी स्पष्ट केलं. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, भाई जगताप, नीलय नाईक आदींनी सहभाग घेतला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजनेनुसार, लिंगमळा-लालमाती या शहर हद्दीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीचा, नगरपरिषदेत समावेश करण्यात येईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. काल विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याकरता आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, या वस्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती, सामंत यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड, नांदेड, मुदखेड, किनवट, अर्धापूर, उमरी, लोहा आदी तालुक्यातल्या ५७ मंडळांमध्ये काल अतिवृष्टीची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. अनेक गावात पुराचं पाणी शिरलं, आणि विद्युत पुरवठा खंडीत झाला. पुरात अडकलेल्या अनेक लोकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे. बेल्लोरी - किनवट इथल्या बेलोरी नाल्यावरून एक व्यक्ती वाहुन गेली. मुखेड तालुक्यातल्या राजुरा इथल्या, वाहून गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला आहे. धर्माबाद तालुक्यातल्या बनाळी इथं स्थलांतरित करण्यात आलेले १५० नागरीक अजूनही धर्माबाद इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या निवाऱ्यात आहेत. नांदेड शहरातल्या बसवेश्वरनगर इथल्या परवा वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह काल सापडला, तसंच एका अज्ञात व्यक्तीचाही मृतदेह आढळल्याची माहीती प्रशासनानं कळवली आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यात काही भागात पुराचं पाणी घरात घुसून, तसंच घरांची पडझड होऊन नुकसान झालं आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल या गावांना भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. जनावरांचा मृत्यू, जमीन खरडून जाणं आदी नुकसानीचीही त्यांनी माहिती घेतली, आणी या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना, शासन नियमाप्रमाणे तातडीने द्यावयाच्या मदतीचं विनाविलंब वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ज्याठिकाणी पूल वाहून गेले आहेत, त्याठिकाणी संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातल्या धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूरसह दारणा, भावली धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यात अती पावसामुळे सुरगाणा- वासदा महामार्गावर उंबरठाणजवळील वांगण बारीत दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर सुरगाणा तालुक्यातल्या वांगणसुळे इथं देवराम भुसारे हा शेतकरी पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा इथले सहायक पुरवठा निरीक्षक तथा गोंडपिंपरी इथल्या शासकीय धान्य गोदामाचे प्रभारी निरीक्षक अमित गेडाम काल सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनासह वाहून गेले. त्यांची चारचाकी काही अंतरावर अडकली मात्र गेडाम यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

****

ग्रामस्तरावर उत्कृष्टपणे काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा प्रशासन सत्कार करेल, मात्र कामचुकार ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, विकास मीना यांनी दिला आहे. ग्रामस्तरावर होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात, ग्रामसेवकांच्या बैठकीत काल ते बोलत होते. ग्रामसेवकांनी निधी विकासात्मक कामावर खर्च करावा, शासकीय योजनेची गावात जनजागृती करावी, नियमित ग्रामसभा, मासिक सभा घ्याव्यात, आदी सूचना त्यांनी ग्रामसेवकांना दिल्या. जिल्ह्यातले पाच टक्के ग्रामसेवक निष्क्रिय असल्यानं त्याचा ग्राम स्तरावरील कामावर परिणाम दिसून येतो, असं मीना म्हणाले.

****

जपानची राजधानी टोकियोत सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यानं जपानच्या कोकि वातानाबे याला २१-१५, २१-१९ असं सरळ गेममधे पराभूत करत ही फेरी गाठली. त्याची उपांत्य फेरीतली लढत इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जोनाथन ख्रिस्ती याच्याशी होणार आहे. भारताच्या एच एस प्रणॉयचं एकेरीतलं तर पुरूष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.  

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची जनजागृती करण्यासाठी राज्य सरकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीनं काल उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्यं या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या बृहत आराखड्यातल्या विविध व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाची माहिती सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली.

****

 

No comments: