Monday, 31 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं १७ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे गटानं या गटाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि पी.एस.नरसिंव्हा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

****

२०२३२४ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. प्राप्तीकर परतावा भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे.

****

जयपूर एक्सप्रेस रेल्वेत आज पहाटे गोळीबाराची घटना घडली. ही गाडी पालघर स्थानकाजवळून जात असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचार्यांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यूमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

****

दोन दिवसीय अखिल भारतीय शिक्षण परिषदेचा काल दिल्लीत समारोप झाला. भारताला ज्ञानाधारित महाशक्ती बनविण्यासाठी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

****

 

शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणाऱ्या पहिल्या लेझर मशीनचं काल पुण्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचं हब होण्यास मदत होईल तसंच याचा फायदा शहरी ते ग्रामीण, सर्वच भागातल्या नागरिकांना होईल, असं ते यावेळी म्हणाले. 

****

भारतीय महिला हॉकी संघानं स्पेनचा ३ -० असा पराभव करत स्पॅनिश हॉकी महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तर भारताचा पुरुष हॉकी संघ या स्पर्धेत तिसर्या स्थानावर राहीला. काल झालेल्या तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात भारतानं नेदरलँडचा दोनएक असा पराभव केला.

****

No comments: