Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांचा
गदारोळ कायम; संसदेचं कामकाज सलग चौथ्या दिवशी बाधित.
·
केळी महामंडळासाठी पन्नास कोटी
रुपयांची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.
· ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचं मुंबईत निधन.
आणि
·
नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत यांना बालकुमार साहित्य संस्थेचा जीवन गौरव
पुरस्कार.
****
मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
संसदेचं कामकाज आज सलग चौथ्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच
काँग्रेस, द्रविड मुनेत्र
कळघम, संयुक्त जनता दल आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी
हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
दुसरीकडे राज्यसभेत, मणिपूरसारख्या संवेदनशील मुद्यावर चर्चा करण्यापासून विरोधी पक्ष पळ काढत आहे, असा आरोप
राज्यसभा नेते पियूष गोयल यांनी आज पुन्हा केला. सरकार या विषयावर
चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षांनी चर्चा करावी, असं आवाहनही
गोयल यांनी यावेळी केलं. यावर, पंतप्रधानांनी
सदनात या प्रकरणावर निवेदन द्यावं, असा आग्रह विरोधी पक्ष नेते
मल्लिकार्जुन खरगे यांनी धरला. यावर गदारोळ सुरू झाल्यानं राज्यसभेचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दोन वाजता कामकाज
सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणिपूर मुद्यावरच
बोलण्याचा आग्रह धरला, त्याला उपसभापती हरिवंश यांनी नकार
दिल्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्यानंतर राज्यसभेत अनुसूचित जमाती
सुधारणा विधेयक २०२२ वर चर्चा होऊन ते संमत करण्यात आलं.
****
संसदेच्या अधिवेशनात सातत्यानं
अडथळे आणत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर तीव्र टीका केली
आहे. अशा प्रकारचा
दिशाहीन विरोधी पक्ष आपण कधीही पाहिला नाही, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. ते आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत
बोलत होते. आगामी काळातही विरोधी पक्ष म्हणूनच काम करण्याची विरोधी
पक्षांची मानसिकता झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
केळी महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. केळी महामंडळ स्थापन
करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनानं घेतला असून, या
महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात
उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन दिलं.
****
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत
४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
****
शासकीय विश्रामगृहांमध्ये ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ॲप
विकसित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली.
पुढच्या अधिवेशनापूर्वी हे ॲप तयार करण्यात येईल, असं
त्यांनी सांगितलं. शासकीय विश्रामगृहांची दुरवस्था झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न
भाजपाचे भाई गिरकर यांनी विचारला होता
त्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. विश्रामगृहांची दुरुस्ती,
पुनर्बांधणी तसंच या सगळ्यात पारदर्शकता आणण्यासाठी नव्याने धोरण
तयार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
मुंबई पोलिस सेवेमध्ये कंत्राटी
पद्धतीनं पोलीस भरती करण्याचा निर्णय धोकादायक असून गृह विभागानं हा निर्णय त्वरित
मागे घ्यावा, अशी
मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाच्या
माध्यमातून केली. अशा पद्धतीनं भरती केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊ शकेल, अशी भीती व्यक्त करत, पोलीस हे सरकारच्या अखत्यारीतच असले पाहिजेत, असं
दानवे म्हणाले. काँग्रेसचे भाई जगताप यांनीही दानवे यांच्या या मागणीला अनुमोदन
दिलं.
****
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आपल्या खुमासदार शैलीतल्या लेखनानं कणेकर यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळं स्थान आणि आपला असा खास वाचकवर्ग निर्माण केला आहे. जवळपास सगळ्या मराठी वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. राजकारण, क्रीडा, सिनेमा, अशा विषयांवर त्यांनी केलेलं स्तंभलेखन लोकप्रिय झालं. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीषासन' या सदरांमधल्या त्यांच्या विनोदी लेखांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 'लगाव बत्ती’ या
त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे बहारदार वक्ते, अशी कणेकर यांची ओळख होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपलं वेगळेपण जपत महाराष्ट्राचं
सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला, कणेकर यांच्या निधनामुळे
महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,
असंही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात नमूद केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना, महाराष्ट्रानं खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू
लेखक गमावला असं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी कणेकर यांना श्रद्धांजलीपर संदेशात, क्रिकेट आणि
सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला, मात्र
त्यांच्या अजरामर साहित्यकृती आणि कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत
राहतील, असं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरात मुकुंदवाडी
इथं जलदगती
रेल्वे थांबत नसल्यानं प्रवाश्यांची आणि व्यापाऱ्यांची प्रचंड
गैरसोय होत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुकुंदवाडीला तपोवन एक्सप्रेस,
नंदीग्राम एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस
रेल्वे थांबवण्यात यावे अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.
त्याअनुषंगानं मुकुंदवाडी
इथं रेल्वे थांबा देण्यात यावा याकरता संबंधितांना तपशीलवार सर्वेक्षण करुन रेल्वे
थांबा देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचं केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी खासदार इम्तियाज जलील यांना पत्रानं कळवलं आहे.
****
नांदेड इथले ज्येष्ठ
साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना, बालसाहित्यातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जाणारा जीवन
गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य
संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, मानपत्र
आणि सन्मान चिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर
सावंत यांची बालसाहित्याची अठ्ठावीस पुस्तकं प्रकाशित झाली असून, २०२२ मध्ये कुंटूर इथे झालेल्या आणि २०१९मध्ये जळगाव इथं झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.
येत्या वीस तारखेला पुण्यात एका समारंभात डॉक्टर सावंत यांना हा पुरस्कार देण्यात
येणार आहे.
****
वाशीम जिल्ह्यातल्या बेलोर गावामध्ये
लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. वाशीम जिल्ह्यात १९ ते २३ जुलैदरम्यान
झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतीपिकांचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालं. या संकटकाळात कोणत्याही लोकप्रतिनिधीनं या भागाला भेट दिली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि मदत, पुनर्वसन
आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी एकही आमदार किंवा खासदार मात्र उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हा प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
औंढा नागनाथ शहरातल्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराच्या पूर्वद्वारासमोर असलेलं लोखंडी
प्रवेशद्वार अंगावर पडल्यामुळे सोमनाथ पवार या बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आज सकाळी सहा वाजता हा अपघात झाला.
****
बुलढाणा-मोताळा मार्गावर राज्य परिवहन
महामंडळाच्या बसचा अपघात होऊन वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. राजूर घाटात आज सकाळी या बसचं टायर फुटल्यामुळे
हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment